हेच ते अच्छे दिन! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

प्रधानसेवक श्रीमान नमोजी ह्यांची ९५ मिनिटांची म्यारेथॉन मुलाखत सवासो करोड जनतेने टीव्हीस नाक लावून पाहून घेतली. वास्तविक मुलाखतीची घोषणा झाली, तेव्हा पोटात केवढा गोळा आला होता; पण सुदैवाने कोठलीही अनर्थकारी घोषणा मुलाखतीदरम्यान झाली नाही. सदर ९५ मिनिटांच्या मुलाखतीत प्रधानसेवकांनी जनतेच्या मनातील साऱ्याच प्रश्‍नांना सडेतोड उत्तरे दिली आणि विरोधकांची तोंडे साफ बंद केली, ह्याची आता सर्वांना खात्री पटली असेल... आम्हाला पटली!!
प्रधानसेवकांचे मौन हा एक आमच्या चिंतेचा विषय होता. इतके सारे घडूनही आणि प्रधानसेवक भारतातच असूनही गप्प कां? हा प्रश्‍न आम्हाला प्रचंड सतावत असे. सारे विरोधक दोन दिवसांआड पत्रकार परिषदा घेत असताना प्रधानसेवकांनी साधे चहालासुद्धा (पत्रकारांस) कां बोलावू नये? आमचे पक्षाध्यक्ष श्रीयुत मोटाभाई ह्यांनाही आम्ही छेडले असता, त्यांनी आमच्याकडे चष्म्यातून असे काही रोखून पाहिले की बस्स...!

पंच्च्याण्णव मिनिटांच्या मुलाखतीनंतर पुरते समाधान झाल्याच्या आनंदात आम्ही प्रधानसेवकांच्या निवासस्थानी ‘७ लोककल्याण मार्ग, नवी दिल्ली’ येथे तडक पोचलो. एरवी योगासने करीत बसलेले प्रधानसेवक झक्‍कास पाय हलवत, ढोकळा खात आरामात टीव्हीवर स्वत:चीच मुलाखत बघत एन्जॉय करत होते.
‘‘नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!,’’ नम्रपणे हात जोडत आम्ही म्हणालो.
‘‘ हां, हां!.. हेप्पी न्यू इयर टू यू टू!,’’ सोफ्यावर पाय हलवत बसलेले प्रधानसेवक मज्जेत म्हणाले.
‘‘बाकी तुमची मुलाखत छान झाली...,’’  आम्ही.
‘‘थेंक्‍यू! बेसो, खमण खावो!!,’’ प्रधानसेवक खुशीत म्हणाले.
‘‘अखेर तुम्ही मौन सोडलंत तर...बरंच झालं!,’’ आम्ही कृतज्ञतेने म्हणालो. त्यांच्या मौनामुळे आम्हाला गेले काही महिने घराबाहेर पडणे मुश्‍किल झाले होते. नोटाबंदीच्या वेळेलासुद्धा... जाऊ दे. कशाला आता त्या दुखऱ्या आठवणी आळवायच्या?
‘‘ढोकळा घ्या ने...,’’ प्रधानसेवकांनी आग्रह केला. बशीत ढोकळ्याची एकच वडी होती. आम्ही हात पुढे करण्याच्या आत प्रधानसेवकांनी चपळाईने ती वडी उचलून तोंडात टाकली आणि गंमत केल्यासारखे ते हसले. ‘हू मूव्हड माय ढोकळा?’ असा तत्त्वशील चेहरा करून आम्ही नुसतेच उभे राहिलो.
‘‘तुमच्या ९५ मिनिटांच्या मुलाखतीने कांग्रेसवाले गारद झाले असतील, गारद!,’’ आम्ही दिलखुलास दाद दिली. कांग्रेसवाल्यांनी हाय खाऊन पाणी मागितल्याचे मनोहारी चित्र आमच्या भक्‍तिनेत्रांसमोर तरळले...
‘‘कोंग्रेसनी उप्पर सर्जिकल स्ट्राइक किधा!,’’ खिदळत प्रधानसेवक म्हणाले. आम्हीही त्यांना टाळी देण्यासाठी हात उगारला.
‘‘पण नेमकी वर्षारंभीच हा मुलाखत बाँब टाकण्याचं काय कारण?,’’ निव्वळ कुतूहलापोटी आम्ही विचारले.
‘‘सवासों करोड जनतेला न्यू इयर विश द्यायच्या होत्या ने!,’’ प्रधानसेवकांनी खुलासा केला. बरे झाले! थर्टी फर्स्टच्या रात्री मुलाखतीची घोषणा झाली असती, तर जनतेच्या घशाला कोरड पडली असती...
‘‘युरिया, गॅस सबसिडी, बांबू लागवड वगैरे योजनांचा उल्लेखही नसलेली ही तुमची पहिलीच मुलाखत..,’’ आम्ही आमचे सूक्ष्म निरीक्षण त्यांच्यासमोर उघड केले. त्यांनी त्यावर डोळे मिचकावले.
‘‘अरे हुं तो जनताने प्रेमना प्रतीक छूं!! हवे काइ प्रोब्लेम नथी... फक्‍त हंड्रेड डेज उरले आहेत! पछी इलेक्‍शनच येणार ने,’’ बोटांवर आकडेमोड करत प्रधानसेवक म्हणाले. हे ऐकून आमचा आनंद पोटात मावेना...
‘‘आभार!,’’ असे म्हणून शतप्रतिशत दंडवत घालून आम्ही लगबगीने तेथून निघालो.
...आमच्या लाखो वाचकांनो!! तुम्हीही सुटकेचा नि:श्‍वास टाका... कां की आता फक्‍त शंभर दिवस उरले आहेत! प्रधानसेवकांची म्यारेथॉन मुलाखतही होऊन गेली आहे. पुन्हा कुठलीही भयंकर घोषणा (इतक्‍यात) होण्याची शक्‍यता नाही. अच्छे दिन म्हणतात ते फक्‍त शंभरच होते... ते आले!! तेव्हा खरोखर हॅप्पी न्यू इयर!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com