महापौर निवास : पहिला दिवस! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

सकाळच्या वेळी महापौरांना अचानक जाग आली. पाखरांची किलबिल ऐकत ते पडून राहिले. तेवढ्यात त्यांच्या कानावर परिचित अशी समुद्राची गाज पडली. त्यांना हायसे वाटले. समुद्राचा केवढा आधार आहे, आपल्या मुंबईला!..आणि मुंबईच्या महापौरांनाही!! पण आज समुद्राच्या लाटा अशा रोंरावत का येत आहेत? सुनामि आली आहे का? गडबडीने उठून महापौर खिडकीशी गेले. हात्तिच्या...आपण आता नव्या निवासात आलो असून समोर पाटणवाला मार्गावरून ट्रक आणि बसेस जाताहेत!! समुद्राची गाज इथे कुठली? इथे ट्रक-बशींचे रोंरावणे...आता ह्या वाहतुकीच्या गाजेची सवय करायला हवी. शिवाजी पार्कावरचा बंगला कालच खाली करून आपण भायखळ्याच्या जिजामाता उद्यानात राहायला आलो आहोत, ह्या वास्तवाची जाणीव महापौरांना झाली. काहीशा खिन्न मनःस्थितीतच त्यांनी दात घासले. तेवढ्यात त्यांना ‘हुप्प हुप्प’ असा आवाज आला. कोण ते? त्यांनी इकडे तिकडे पाहिले. माकडांच्या पिंजऱ्यातून हा पुकारा झाल्याचे त्यांनी ओळखले. तेवढ्यात मोराने टाहो फोडला. म्याओ, म्याओ! ‘बॉक बॉक’ असे कुणीतरी जोरात ओरडले. काल आपल्या गाड्या पहिल्यांदा उद्यानाच्या आवारात शिरल्या तेव्हा असाच आवाज हरणांच्या पिंजऱ्याच्या दिशेने ऐकू आल्या होत्या.
‘‘जंगलात वाघाची चाहूल लागली, की हरणं असा कॉल देतात..’’ कुणीतरी माहिती दिली होती. आपल्याला कुणीतरी वाघ समजते आहे, ही भावना सुखद होती. पण...एकंदरीत अवघड आहे!  रोज सकाळी ह्या प्राण्यांच्या आवाजाने जागे व्हायचे, तेही मुंबईत! आता त्याचीही तयारी करायला हवी...

गेले काही महिने समुद्राशेजारचा बंगला खाली करण्यासाठी तगादा चालला होता. आज जाऊ, उद्या जाऊ करत शेवटी एकदाचे इथे आलो. शेवटी शेवटी तगादा किती वाढला होता! लॅंडलाइनचा फोन उचलणे मुश्‍कील झाले होते. चुकून उचललाच, तर ‘‘हे काय? अजून तुम्ही तिथेच? निघा!!’’ ही दर्डावणी ऐकू यायची. ‘तुमची सोय झक्‍कास फॉरेस्ट रिझॉर्टमध्ये करतो, पण इथून निघा!’’ असे आश्‍वासन मिळाल्यावर शेवटी तयार झालो. फॉरेस्ट रिझॉर्ट म्हणजे हे...जिजामाता उद्यान!!
एक बरं आहे की ह्या उद्यानात फार प्राणी उरलेले नाहीत. बरेचसे पिंजरे रिकामे आहेत. गेंडे, हत्ती, पेंग्विन, वगैरे ठीक आहे. बिचारे फार आवाज करत नाहीत. पण माकडे आणि मोर फार उच्छाद मांडतात. महापौर ‘आपल्यात’ राहायला आले आहेत, ह्या आनंदात जिजामाता उद्यानातले प्राणी चित्कारत असतील का? महापौरांनी बंगल्याबाहेर येऊन परिसर न्याहाळला. आणखी काही प्राणी इथे शिफ्ट होणार असल्याची खबर होती. दोन-तीन वर्षांपूर्वी कोरियातून पेंग्विन आणून ठेवले होते. गेले वीसेक वर्षे ह्या उद्यानात पट्टेरी वाघ नव्हता. आता औरंगाबादेतून एक सोडून दोन-दोन वाघ आणून ठेवणार असल्याचे कळते. आणा बापडे! एक वाघ ऑलरेडी आलाय म्हणावे! आता उरलेला एकच आणा!!

आणा काय वाघबिघ आणायचे ते! सिंह आणा, गेंडे आणा, पाणघोडे आणा!! आणा, आणा!! जोवर ही मंडळी पिंजऱ्यात आहेत तोवर ठीक आहे. जिराफ वगैरे उंच मानेचे प्राणी मात्र इथे आणू नका हे सांगून ठेवलेले बरे! नाहीतर एक दिवस पहिल्या मजल्यावरल्या खिडकीतून जिराफ डोकावून भिवया उंचावतोय, आणि महापौरांची गडबड उडाली आहे, असे चित्र दिसेल!!
...जाऊ द्या. एकूण काय तर हो-ना करता करता अखेर आमची ‘झू’मध्ये रवानगी झाली. ‘झू’मध्ये राहणारा जगातला पहिला महापौर म्हणून (तरी) निदान आपले नाव इतिहासात कायम राहील...असो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com