ईव्हीएम : एक गूढ! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

स्थळ : लंडन.
वेळ : काय फरक पडतो?
प्रसंग : ईव्हीएमच्या गूढकथेचे अभिवाचन.

...आमच्या समोर एक काळी आकृती बसली होती. खोलीत दिवा मंद होता. नारायण धारप ह्यांच्या गूढकथेत असतो तसा लालसर प्रकाश सर्वत्र पसरला होता. (आठवा : खोलीच्या कोपऱ्यात ते काळंकरडं काहीतरी वळवळलं...वगैरे.) दार करकरत उघडलं. कुणीतरी गलिच्छ ढेकर दिल्याचा आवाज आला. तो बहुधा त्या काळ्या आकृतीच्या दिशेनेच आला असावा. (आमचा आपला एक अंदाज!) उंच पाठीच्या खुर्चीत बसलेली ती व्यक्‍ती नखशिखांत काळ्या कापडाने झांकलेली होती. तोंडावर बुरखा होता. आम्ही आपली खुर्ची पकडून बसलो होतो. आमच्या शेजारी प्रचंड गूढ चेहरा करून आणखी एक व्यक्‍ती बसली होती. पण तिच्या चेहऱ्यावर बुरखा नव्हता. त्याऐवजी आमचे कांग्रेसी वकील मित्र कप्पिल सिब्बल (दोन्ही डब्बल) ह्यांचा मुखवटा त्या व्यक्‍तीने चढवला होता. असली बरीच भुते आमच्या घरी बाटलीबंद आहेत, अशा आशयाचे गूढरम्य स्मित तेथे आम्हाला आढळून आले.
‘’आपलं नाव?,’’ आम्ही. पण इथे उगीचच सिब्बलसाहेब दचकले. ‘कोण मी?’ असे त्यांनी विचारलेही. पण...
‘‘मी सायबर शुजा!,’’ तोंडावरल्या बुरख्याआडून आवाज आला. बुरख्याआडून आला असावा, असा आमचा आपला एक अंदाज! कुठून आवाज आला, ह्याची आम्ही ग्यारंटी काय द्यावी?
‘‘आपण काय करता?,’’ हे आम्हीच. इथे सिब्बलसाहेब पुन्हा जाम दचकले. ‘कोण मी?’ असे मात्र त्यांनी विचारले नाही.
‘‘मी सायबर हॅकर आहे..,’’  बुरख्याआडच्या व्यक्‍तीने अभिमानाने सांगितले. ह्या आवाजात, मी युगांडाचा ग्रामविकास मंत्री आहे, असे त्यांनी सांगितले असते, तरी चालले असते!  बाकी सायबर हॅकर हा प्रकार भलताच जोरदार असावा. सगळे झांकून एवढा मोठा उद्योग करायचा, म्हणजे केवढे टेरिफिक करिअर असेल, अं? आमच्या मनात आदरयुक्‍त भीती दाटून आली.
‘‘ईव्हीएमबद्दल काय सांगणार होता?,’’ आम्ही. सिब्बलसाहेबांचा दचकण्याचा तिसरा टाइम आला तो इथे! ‘कोण मी?’ हे त्यांनी गुळमुळीत हातवाऱ्यांनिशी विचारले, इतकेच.
‘‘हेच की ते एक बंडल यंत्र आहे. ह्या यंत्रामुळे निवडणुका जिंकणं जाम सोपं जातं!,’’ सायबर शुजा म्हणाला. आम्ही अविश्‍वासाने पाहत राहिलो. काहीही फेकाफेक करतात! पण शेजारच्या सिब्बलसाहेबांनी पार्लमेंटात मारतात तसा डोळा मारुन ‘हे खरंच आहे!’ अशा आशयाची मान डोलावली.
‘‘ईव्हीएममुळे ब्रिटनचे पंतप्रधान चर्चिलसाहेबांचा निवडणुकीत पराभव झाला होता, हे विसरू नका!’’ सायबर शुजा म्हणाला. आम्ही च्याट! सिब्बलसाहेबांनी इथे आमची बाही पकडून ‘ऐका, ऐका!’ असे खुणावले.
‘‘चर्चिलसाहेबांच्या काळात ईव्हीएम होतं?,’’ आम्ही येड्यासारखा प्रश्‍न विचारला.
‘‘नव्हतं...तेच म्हणतोय मी!’’ सायबर शुजा म्हणाला. आम्ही पुन्हा च्याट!
‘‘२०१४चं इलेक्‍शन कमळ पार्टीनं ईव्हीएमच्या जोरावरच जिंकलं! अहो, ‘एकगठ्‌ठा व्होट मिळवा’ ह्याचाच शॉर्टफॉर्म आहे ईव्हीएम!,’’ सायबर शुजाने खुलासा केला. ओह! आमची तिसऱ्यांदा च्याट पडण्याची पाळी होती. सिब्बलसाहेबांनी पुन्हा ‘हे खरंच आहे’ अशा आशयाची मान डोलावली.
एकंदर हे भिकार यंत्र फक्‍त निवडणुका जिंकण्याच्या लायकीचे आहे, बाकी त्याचा लोकशाहीला काहीही उपयोग नाही, हे आमच्या हळूहळू लक्षात येऊ लागले. कमळवाल्यांचा आम्हाला संताप आला. काय ही धडधडीत धोखाधडी?
‘‘डोण्ट वरी, कमळवाल्यांच्या सरकारची एक्‍सपायरी डेट उलटली आहे! पुढलं इलेक्‍शन ते जिंकणार नाहीत!,’’ सायबर शुजा म्हणाला. सिब्बलसाहेबांनी टुणकन उडी मारुन त्याला एक टाळी दिली. आणि का कुणास ठाऊक, हातभर जीभ काढून दाताखाली चावत तिथून निसटले.
म्हटले ना, ईव्हीएम हे एक गूढच आहे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com