मनोमीलनाकडे...! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

प्रिय अहो, सौ. कमळाबैचा शिर्साष्टांग नमस्कार.
फार दिसात गाठभेट नाही. ‘दोन ध्रुवावर दोघे आपण, तू तिकडे अन मी इकडे’ हे जुने गाणे गुणगुणत कसेबसे दिवस काढत्ये आहे. ‘आता आपण वेगळे राहू आणि गुपचूप भेटत जाऊ’ असे तुम्ही सांगितल्याने हे दिवस आले!! (गेले नाहीत, आले, आले!!) मी म्हणून तुमचे ऐकले. दुस्री कोणी असती तर आकाशपाताळ एक केले असते. ‘लोक काय म्हणतील?’ अशी भीती बाळगून का सौंसार करता येतो? जाऊ दे. पण मी म्हंटे की जगापासून लपून असे दिवाभीतासारखे किती दिवस जगायचे? आता बै कंटाळा आला...मी पुन्हा आपली (आपल्या) घरी येते. मी नसल्यापास्नं घराचा तुम्ही अग्दी उकिर्डा करून ठेवला असेल, असे वाटते. मला येऊन (पदर खोचून) आवराआवर करणे भाग आहे.
दोन्ही घरातून विरोध झाला की प्रेमी युगुलाला लपून छपून भेटावे लागते; पण आपल्या सौंसाराला पंचवीसाहून ज्यास्त वरसें झाली. ह्या वयात (काही) माणसे एकमेकांपासून लपून छपून उद्योग करतात. एकमेकांना टाळतात. आपण कशाला टाळायचे? आपले मनोमीलन झाले नाही तर आपल्या प्रापर्टीची किती वाट लागेल, हे बरे समजून असावे. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ असे होईल. तेव्हा स्वबळाच्या बाता मारणे बंद करा, आणि निमूटपणे मला ‘आपली’ म्हणा. कारण मी तुमच्या स्वबळाचाच भाग आहे, हे विसरू नका!! आणखी किती समजूत काढायची एका माणसाची? दुसरा कुणी असता तर...जाऊ दे!! आपले मनोमीलन  (पक्षी : तिकीट वाटप) कधी होते, ह्याची आतुरतेने वाट पाहणारी.  आप की अपनी. कमळा.
ता. क. : दिवसाढवळ्या मनोमीलन हं! तिकीट वाटपासाठी एकदा तरी दिवसा भेटू गडे!!
* **
कमळाबाई-
‘तुमचा आमचा संबंध संपला, आता आम्ही आमचे मुखत्यार!’ असे वारंवार सांगूनही तुमच्या डोसकीत उजेड म्हणून पडत नाही, ह्याला काय म्हणावे? आहात तेथेच राहा, येथे परत येण्याच्या भानगडीत कृपा करून पडू नका. आम्ही यापुढे स्वावलंबीच राहणार आहो. स्वबळाच्या आमच्या प्रतिज्ञेपासून आम्हाला कुठलीही अप्सरा विचलित करू शकणार नाही. (खुलासा : मी अप्सरा म्हटले आहे, नोंद घ्यावी!!) तुम्ही तर कोण्या झाडाचा पाला!! मुद्दा राहिला तिकीट वाटपाचा. आमची सर्व तिकिटे वाटून संपली आहेत. तुमच्यासाठी एकसुद्धा शिल्लक नाही. तेव्हा मनोमीलनाचा (पक्षी : तिकीट वाटप) प्रश्‍नच उद्‌भवत नाही. तुम्ही गेल्यानंतर मी घर नीट आवरून ठेवले आहे. उलट तुम्ही असतानाच चिक्‍कार पसारा झाला होता. असो. कृपया पुन्हा भेटू नका.  उधोजीराजे.
* * *
प्रिय अहो, कोप्रापास्नं नमस्कार.
इतक्‍या प्रेमाने आम्ही पत्र पाठवावे, आणि त्याला तुम्ही त्याचा चोळामोळा करावा, हे शोभले का तुम्हाला? दर्वेळी तुम्ही अस्सेच वागतां!! मी म्हणून बापडी सहन करते. आता मला घराबाहेर काढून कुठल्या अप्सरेची वाट पाहताय? कळतात बरे ही बोलणी!! इतकी काही मी ‘ही’ नाही!! तुमचे सगळे बैजवार व्हावे म्हणून मी पंचवीस वरसे खस्ता खाल्ल्या. तुमची नाही नाही ती बोलणी खाऊन टिकून ऱ्हायले. त्याचे हे असे पांग फेडता? माणसाने कृतघ्न किती असावे ह्याला काही लिमिट!! ते काही नाही, तुमच्या बोलण्यात नव्या अप्सरेचा उल्लेख आल्यामुळे मी तातडीने ब्याग भरून तिकडे यायला निघत्ये आहे. आल्येच!  तुमची कमळा.
ता. क. : घराची चावी अजूनही माझ्या कमरेला आहे हे विसरू नका. कधीही येऊन धडकेन!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com