रिपोर्ट कार्ड! (ढिंग टांग)
खरा चोर रात्री हातात छोटा दगड घेऊन झोपतो अशी एक थिअरी आहे. म्हणजे हातातला खडा गळून पडला की त्याला कळते की जग शांत झोपी गेले आहे. आता आपल्या कामाला लागावे! मग तो निवांत चोरीबिरी करून निघून जाऊन घरी दिवसभर झोपतो. अगदी तस्सेच झाले. इतके दिवस आम्हाला पत्ताच नव्हता. ‘जागुनी ज्याची वाट पाहिली, ते सुख आले दारी’ हे पाहण्याची संधी आम्ही वाया की हो दवडली! अरेरे!!
खरा चोर रात्री हातात छोटा दगड घेऊन झोपतो अशी एक थिअरी आहे. म्हणजे हातातला खडा गळून पडला की त्याला कळते की जग शांत झोपी गेले आहे. आता आपल्या कामाला लागावे! मग तो निवांत चोरीबिरी करून निघून जाऊन घरी दिवसभर झोपतो. अगदी तस्सेच झाले. इतके दिवस आम्हाला पत्ताच नव्हता. ‘जागुनी ज्याची वाट पाहिली, ते सुख आले दारी’ हे पाहण्याची संधी आम्ही वाया की हो दवडली! अरेरे!!
ज्याची वाट पाहा पाहा पाहावी, ते माणूस हलक्या पावलांनी घरी यावे, गपचूप हांतरुणात शिरून झोपी जावे आणि आपल्याला अगदी पत्ता म्हणून लागू नये, अगदी तस्से झाले. आम्ही अच्छे दिनांबद्दल बोलतो आहो!! अच्छे दिन येणार येणार म्हणून ओरडत बसलो आणि ते केव्हा आले हे आम्हाला कळलेचि नाही!! हे म्हंजे कडकीत होर्पळणाऱ्या मनुष्याच्या उशीखालीच दहा हजाराची चवड मिळाल्यासारखे!! असो!
आमचे तारणहार आणि प्रधानसेवक श्रीश्री नमोजी ह्यांनी ५५ महिन्यांच्या कार्यकाळाचे रिपोर्ट कार्ड दिमाखात आमच्या हाती ठेवले आणि कमरेवर हात ठेवून रुबाबात सांगितले, ‘‘पालकहो, करा सही!!’’ रिश्ते में तो हम उनके बाप होते है, हे खरे असले तरी शहंशाह मात्र नमोजीच!! आम्ही कुठले शहंशाह? आम्ही साधे मतदार!! असो, असो!
...बाकी रिपोर्ट कार्डातील पैकीच्या पैकी मार्क बघून आम्हाला विलक्षण अभिमान वाटला. एवढे मार्क आमच्या गेल्या बेचाळीस पिढ्यात कोणी मिळवले नव्हते.
‘‘रोजगार- फुल मार्क, स्वच्छता- फुल मार्क, महागाई नियंत्रण- फुल मार्क...सुरक्षा- सगळेच्या सगळे...एक मार्क इकडचा तिकडे नाही, बापहो!, करा सही डोळे झांकून!,’’ नमोजींनी गर्वोन्नत छाती आणखी फुगवून आम्हाला आज्ञा केली. आम्ही रिपोर्ट कार्डाकडे पाहात राहिलो. खरेच का हे मार्क खरे आहेत? गेल्या चाचणी परीक्षेत पाच पेपरात एकसाथ गचकलेल्या विद्यार्थ्याने वार्षिक परीक्षेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याचे रिपोर्ट कार्ड घरी आणल्यावर काय करायचे असते, ह्याचा (बाप म्हणून) आम्हाला अजिबात अनुभव नव्हता. ‘आपले पाल्य कु. अमूक अमूक अत्यंत वांड असून त्याचे अभ्यासात मुळीच लक्ष नाही. शाळेतील त्याचे वर्तन असेच राहिल्यास त्याच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यास भाग पडेल. सबब, पालकांनी तांतडीने प्राचार्यांची समक्ष भेट घ्यावी,’ अशा चिठ्ठ्यांना सरावलेल्या पालकांना असली रिपोर्ट कार्डे म्हणजे प्राणांतिक धक्काच असतो. पुन्हा असो.
‘‘तिथे ठेव रिपोर्ट कार्ड... नंतर सही करतो!’’ आम्ही बचावाचा पवित्रा घेतला. मनात म्हटले आधी खात्री करून घेतलेली बरी!! हे रिपोर्ट कार्ड नक्की आपल्या पाल्याचेच आहे ना?
‘‘आत्ताच्या आत्ता सही करा!’’ नमोजींनी ठणकावले. ‘मुकाट्याने’ हा शब्दप्रयोग त्यांनी केला नाही इतकेच. नाहीतरी आम्ही तसे मुकाटच होतो व राहू!!
‘‘एकही मार्क कसा गेला नाही? कोणी तपासले पेपर?’’ आम्ही जाब विचारला.
‘‘कोणी म्हंजे? हे काय विचारणं झालं?’’ नमोजी.
‘‘असे मार्क देतात का तुमच्या शाळेत? काहीतरी गडबड वाटते..,’’ आम्ही स्पष्टपणे चाचरत म्हणालो.
‘‘अस्सेच देतात! मी सांगतो ना!! सगळे पैकीच्या पैकी मार्क मिळवलेत, त्याचं काहीच कौतुक नाही का तुम्हाला?’’ ‘विक्रमादित्याने हट्ट सोडला नाही’ ह्या चालीवर नमोजींनी आक्रमक पवित्रा घेतला.
‘‘आहे ना...पण-,’’ आम्ही हताश होऊन अखेर सही करण्यासाठी पेन हातात घेतले.
आमच्या खांद्यावर थोपटत त्यांनी दिलासा दिला, ‘‘मी निक्षून सांगतो, मार्कात काहीही गडबड नाही... मी स्वत:च दिले आहेत मार्क!! करा सही!!’’