esakal | यू-टर्न, झेड टर्न वगैरे! (ढिंग टांग)
sakal

बोलून बातमी शोधा

dhing tang

यू-टर्न, झेड टर्न वगैरे! (ढिंग टांग)

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान
वेळ : आरामशीर! प्रसंग : मजेशीर!
पात्रे : नेहमीचीच...राजाधिराजी उधोजीराजे आणि त्यांचा कडवा फर्जंद मिलिंदोजी!
...........................
महालाच्या अंत:पुरात राजाधिराज उधोजीराजे आरामात बसले आहेत. त्यांना सगळ्याचाच कंटाळा आला आहे. कंटाळून ते मोटार ड्रायव्हिंगची प्रॅक्‍टिस (खुर्चीत बसल्या बसल्या) करत आहेत. तोंडानेच गिअर बदलण्याचा, इंजिनचा आवाज काढणे चालू आहे. त्याचाही कंटाळा आल्यावर ते आपला कदीम सेवक मिलिंदोजी फर्जंद ह्यास बोलावतात. अब आगे...
उधोजीराजे : (कणखरपणाने) कोण आहे रे तिकडे?
मिलिंदोजी : (आरामात चालत येत) बोहोला!
उधोजीराजे : (संतापून) गर्दन मारली जाईल!
मिलिंदोजी : (आश्‍चर्यानं) आन ती का बरं?
उधोजीराजे : (मिशीवरून बोट फिरवत) मुजरा राहिला!
मिलिंदोजी : (जीभ चावत मुजरा करत) चुकी जाहाली, माफी असावी!...घ्या!! कशापायी बलावणं धाडलंत?
उधोजीराजे : (संतापून उपरोधाने) आपल्याला आम्ही डिस्टर्ब केलं काऽऽ..?
मिलिंदोजी : (दातात काडी घालत) जरा कामात हुतो!
उधोजीराजे : मग आम्ही काय इथे... रिकामे आहोत का?
मिलिंदोजी : (थंडपणाने) ऱ्हायलं! कशापायी आवाज दिला? काय हुकूम?
उधोजीराजे : हां! मला एक सांग, तू गाडी चालवतोस?
मिलिंदोजी : (थंडगार आवाजात) टेम्पो!
उधोजीराजे : (करवादून) तेच ते रे!! सिग्नल तांबडा असल्यावर तू काय करतोस?
मिलिंदोजी : काय करनार? शिस्तीत फुडं निघून जातो! आम्हा मावळ्यांना शिग्नल बिग्नल काही नसतोय, राजे!
उधोजीराजे : (नाद सोडत) पुढच्या सिग्नलला तुला उजवीकडे वळायचं असेल तर?
मिलिंदोजी : नीट वळतोय की! उजवीकडं जायाचं आसंल तर लेफ्ट मारन्यात काय पॉइण्ट आहे?
उधोजीराजे : (खासगी आवाज काढत)... आत्ता कसं बोललास? रिव्हर्स घेतलायस कधी?
मिलिंदोजी : (दातातली काडी काढत) थुथुक...आमच्या घराच्या गल्लीतनं टेम्पो मागल्या मागं काढताना रिव्हर्स घ्यावाच लागतोय, मालक!
उधोजीराजे : (आनंदातिरेकात) ह्याचा अर्थ तुला गाडी रिव्हर्समध्ये घेता येते! कबूल? मग आता सांग...समजा, तुझं पैशाचं पाकिट घरीच ऱ्हायलं, असं तुझ्या मध्येच लक्षात आलं तर काय करतोस?
मिलिंदोजी : (बेदरकारपणे) हॅ:!! त्याला काय हुतंय? पैशे लागतात कुठे आपल्याला? सबै भूमी शीरीराम की!!
उधोजीराजे : (पुन्हा नाद सोडत) बरं ते जाऊ दे! लायसन्स विसरलास घरी...तर?
मिलिंदोजी : (हाताच ठेंगा दाखवत) हायेच कोनाकडे हितं लायसन? कोन इच्यारतंय आपल्याला?
उधोजीराजे : (आणखी एक गंमतीदार सुचून) टेम्पोमधल्या मालाची डिलिव्हरी वेळेत व्हावी, म्हणून कधी लेन कटिंग केलं आहेस?
मिलिंदोजी : (ठामपणाने) लेन कटिंग केल्याबिगर ड्रायव्हिंगच करता येनार नाही, राजे! झिग झॅग झेड- टर्न, सटासट एस- टर्न, गोलंगोल ओ-टर्न...सगळ्या टर्न घेऊन टायमात डिलिव्हरी करतोय आम्ही!!
उधोजीराजे : (घायकुतीला येऊन) तुला एकंदरित वाहतुकीचे नियम फारसे माहीत नाहीत का रे?
मिलिंदोजी : म्हाईत आहेत, पन लागू नाहीत!!
उधोजीराजे : (खुशालत) शाब्बास! आहेस खरा मर्द मावळा टेम्पोचालक! कुठे शिकलास रे ड्रायविंग?
मिलिंदोजी : (लाजत) तुमच्याकडं बघून बघूनच जी!!
उधोजीराजे : (संतापातिरेकानं) मग माझ्या यू-टर्नची इतकी काय चर्चा करतायत लेकाचे? डेड एण्ड दिसू लागला तर माणूस यू-टर्न घेतोच ना? आँ?

loading image