परिवर्तन! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

प्रिय नामदार मित्र, निवडणूक प्रचाराच्या सभा आटोपून परतलो असताना काल रात्री सुमारे अडीच वाजता अचानक मला (स्वप्नात) दृष्टांत झाला. एक तेजस्वी आकृती समोर आली आणि म्हणाली, ‘‘वत्सा, तुझ्या मनात खूप विखार भरला आहे. तो काढून टाक. साऱ्या जगताकडे प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळ्याने पहा! हे जग तुला प्रेमानेदेखील जिंकता येईल. तसाही तू जिंकणारच आहेस. (असे ती आकृती खरंच म्हणाली. ‘मन की बात’ सांगत नाही!!) पण प्रेमाने जिंकलास तर त्यात मजा आहे. लोक तुला प्रचंड शिवीगाळ करतात असे कळले. मला माहीत नाही, कारण प्रचार सुरू झाल्यापासून मी कानात बोळे घालून ठेवले आहेत....तेव्हा ‘प्रेम’ ही अडीच अक्षरे लक्षात ठेव. शपथविधीसाठी शुभेच्छा! (हेही ती आकृती खरंच म्हणाली. कुणाची शपथ घेऊ?) एवढे बोलून ती आकृती अंतर्धान पावली आणि मी तासा-दोन तासांनी) जागा झालो.

नामदार मित्रा, दृष्टांताचा किस्सा हा काही माझा जुमला नाही. मला नेहमी असे दृष्टांत होत असतात. पण ह्या पर्टिक्‍युलर दृष्टांतानंतर मला तुम्हा सर्वांची खूप आठवण आली. आपण यंदा एकमेकांना किती किती शिव्या दिल्या नै? मनातल्या मनात मला खूप वाईट वाटले. पण काय करू? तुमच्या पक्षाचे लोक मला उचकवतात आणि मग मी तोंड उघडतो. कधी कधी उलटे घडते हेही खरे!! पण आता आपण हे थांबवूया. माझ्या मनात तुमच्याबद्दल अपार प्रेम आहे, ह्याची खात्री बाळगा!! तुमच्या संपूर्ण खानदानाबद्दलच मला प्रचंड आपुलकी आहे. ह्या देशासाठी तुम्ही किती किती सोसले आहे!! म्हणून यंदा निवडणूक आटोपली की तुम्ही सारी मंडळी राजकारण सोडून दुसरीकडे जावे. शांतपणे आयुष्य व्यतीत करावे. तुम्हा सर्वांना सुखाने जगता यावे, ह्यासाठीच तर माझा अट्टहास चालला आहे. संपूर्ण नामदार कुटुंबाला उत्तम दीर्घायुरारोग्य मिळो व त्यांचे उर्वरित आयुष्य शांती-समाधानात जावो, ही प्रभुरामचरणी प्रार्थना.
आपला प्रेमळ
चौकीदार.
* * *

प्रिय चौकीदारजी, तुमचे पत्र वाचून मला दुसरा धक्‍का बसला. कारण पहिला धक्‍का रात्री अडीचच्या सुमारासच बसला होता. तीच तेजस्वी आकृती माझ्याही स्वप्नात आली होती. माझ्या डोक्‍यावर हात फिरवून ती म्हणाली, ‘‘बाळा, किती राबतोस? गरीब जनतेचा किती विचार करतोस? तुझ्या संपूर्ण कुटुंबाने ह्या जनतेसाठी आपली कुडी खर्चली. तुमची ही कौटुंबिक सेवा योग्य त्या ठिकाणी पोचली आहे बरे!! पण निवडणुकीत तुम्ही त्या चौकीदाराला फार नावे ठेवलीत, हे काही बरे झाले नाही. एका माणसाला इतके का टोंचून बोलतात? गरीब घरातून आलेला एक माणूस स्वकर्तृत्वावर इतका मोठा चौकीदार होतो, त्याचे तुम्ही कौतुक करायला हवे. तू स्वभावाने खूप चांगला मुलगा आहेस. (असे ती आकृती खरंच म्हणाली!) तुझं भवितव्य उज्ज्वल असून लौकरच तुझा राज्याभिषेकही होईल. (असेही त्यांनी म्हटले...आईच्यान!!)  पण चौकीदाराचाही सन्मान ठेव हो! तथास्तु!!’’ असे म्हणून ती दिव्य आकृती अंतर्धान पावली.

ताबडतोब कार्यकत्यांची मीटिंग घेऊन ह्यापुढे चौकीदाराला शिवीगाळ करायची नाही, असा आदेश दिला आहे. आजतक हुआ सो हुआ!! चौकीदारानेसुद्धा आयुष्यातली ४५ वर्षे देशासाठी तप:साधना केली आहे. त्यांनीही खूप भोगले आहे. आता आपण त्यांना विश्रांती देऊया. गुजराथेत त्यांना एक छोटेसे घर बांधून देऊ या किंवा त्यांची राहण्या-जेवण्याची सोय (फुकट) करूया. ह्या इलेक्‍शननंतर आम्ही तसेच करायचे ठरवले आहे. चौकीदार, तुम्हाला मी नमन करतो. कळावे,
आपला
नामदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com