ढिंग टांग : दर्शनहेळामात्रें..!

ब्रिटिश नंदी
शनिवार, 15 जून 2019

ती विकारी संवत्सरातली ज्येष्ठ शुद्ध द्वादशी होती. तशी इतिहासात मुळी नोंदच आहे. ह्या दिवसाचे महत्त्व महाराष्ट्रात कोणाला ठाऊक नाही? सारा महाराष्ट्र हा दिवस साजरा करण्यासाठी उत्सुक होता. असो. सकाळीच एक सर येऊन गेली होती. हवा ढगाळ होती हे उघडच आहे. ढगाळ नसताना सर कुठून येणार? साधे लॉजिक आहे. सर येऊन जाताच साहेब उठले. डोकीवर चेपलेल्या उशीखालतीच त्यांनी डोळे उघडून बघितले. इतक्‍या लौकर उठून करायचे तरी काय? असा विचार करीत पुन्हा डोळे मिटण्याच्या आधीच त्यांच्या कानी मंजुळ स्वर पडले : ‘‘हॅप्पी बर्थडे साहेब!!’’

ती विकारी संवत्सरातली ज्येष्ठ शुद्ध द्वादशी होती. तशी इतिहासात मुळी नोंदच आहे. ह्या दिवसाचे महत्त्व महाराष्ट्रात कोणाला ठाऊक नाही? सारा महाराष्ट्र हा दिवस साजरा करण्यासाठी उत्सुक होता. असो. सकाळीच एक सर येऊन गेली होती. हवा ढगाळ होती हे उघडच आहे. ढगाळ नसताना सर कुठून येणार? साधे लॉजिक आहे. सर येऊन जाताच साहेब उठले. डोकीवर चेपलेल्या उशीखालतीच त्यांनी डोळे उघडून बघितले. इतक्‍या लौकर उठून करायचे तरी काय? असा विचार करीत पुन्हा डोळे मिटण्याच्या आधीच त्यांच्या कानी मंजुळ स्वर पडले : ‘‘हॅप्पी बर्थडे साहेब!!’’
आहा! आज आपला एक्‍कावन्नावा वाढदिवस. गेली एक्‍कावन्न वर्षे हा महाराष्ट्र आपल्या नवनिर्माणाची वाट पाहत उभा आहे. ए-क्‍का-व-न्न वर्षे! ह्या आकड्यात एक्‍काही आहे आणि नंबर वन्नसुद्धा!! ...खाडकन उशी बाजूला फेकत साहेब उठून बसले. नाही म्हटले तरी सूर्य कासराभर वर आला होता. म्हंजे आला असणार. बघितला कुणी? (बाहेर हवा ढगाळ होती, हा डिस्क्‍लेमर आधीच देऊन ठेवला आहे.) साहेबांनी उठून चहा मागवला. पण ते प्यायले मात्र नाहीत. अचानक त्यांना जाणवले. देवदर्शनासी जावे! देवाचिये द्वारी पळभरी बसावे. काही मागो नये. काही सांगो नये. फक्‍त बसावे...
‘‘हॅप्पी बर्थ डे साहेब!’’ उपरणे सावरत बाळाजीपंत अमात्यांनी पुन्हा एकवार शुभेच्छा दिल्या. एक पुष्पगुच्छही पुढे केला.
‘‘बरं बरं!’’ साहेब गुरगुरले.
‘‘गडाच्या पायथ्याशी एअरकंडिशण्ड मांडव घालण्यात आला असून अभीष्टचिंतनासाठी आपल्या प्रतीक्षेत चाहते गर्दी करो लागले आहेत..!,’’ बाळाजीपंतांनी माहिती दिली.
‘‘गर्दी! फू:!! लेकाचे गर्दी करतात, मते देत नाहीत!’’ साहेब घुश्‍शातच म्हणाले. हात उडवून ते म्हणाले, ‘‘गर्दीबिर्दी नंतर...आधी देवदर्शनाला जायचे आहे! गाड्या काढायला सांगा!!’’
‘‘देवदर्शनाला म्हंजे सिल्वर ओकच्या दिशेने गाडी घ्यायची का?’’ बाळाजीपंतांनी निरागसपणाने सवाल केला. तो करायला नको होता. साहेबांनी पुटपुटलेले काही भेदक शब्द कानाआड करून त्यांनी लगबगीने गाड्या काढायचा आदेश खालपर्यंत पोचवला.
...साहेबांच्या गाड्यांचा ताफा भरधाव सिद्धिविनायकाच्या दिशेने निघाला. रस्त्यावरील पादचाऱ्यांच्या भिवया उंचावल्या. काही लोकांचे तर जबडेच पडले. साहेब आज घराबाहेर पडले. निघाले...निघाले! कोठल्या मोहिमेवर निघाले?
साहेबांचे पाठोपाठ टीव्ही च्यानलवाल्यांच्या गाड्या धावत होत्या. साहेब निघाले...शिवाजी पार्काच्या नाक्‍यावर आले...सावरकर मार्गाला लागले...प्रभादेवीच्या मंदिराचा कळस दिसो लागला...साहेबांनी ब्रेक मारलान...आता हॉर्न मारलान...साहेबांनी गाडी पुढे काढली...हरेक क्षणाचा अपडेट ‘ब्रेकिंग न्यूज’ बनून समस्त महाराष्ट्रात प्रक्षेपित केला जात होता.
काळा सदरा परिधानलेले साहेब धीरोदात्त पावले टाकीत मंदिराकडे जाताना क्‍यामेऱ्यांनी टिपले.
‘‘साहेब, नारळ, हार, फुलं, दूर्वा....घ्या ना...पायातली चप्पल इथेच काढा!’’ कानावर आलेल्या हाळीनिशी साहेबांनी कान टवकारून पाहिले. महाराष्ट्रात कोण हरीचा लाल आपल्याला पायातली चप्पल काढायला सांगतो आहे? प्रचाराच्या काळात काय कमी काढल्या? पण सोबत आलेले बाळाजीपंतच त्यांना हाकारत होते. साहेब पुन्हा काहीतरी भेदक बोलणार होते, पण हे मंदिराचे आवार होते. साहेबांनी निमूटपणे चपला काढल्या.
...साहेबांनी डोळे भरून दर्शन घेतले. मंडपात काही काळ डोळे मिटून बसले. मनातल्या मनात आरतीदेखील म्हणून झाली. मनोमन त्यांनी हात जोडून महाराष्ट्राच्या नवनिर्माणासाठी बाप्पाला नवसांकडे घातले!! -‘‘बाप्पा, तुमच्या मनात काय आहे ते कळेल का? आज इतकी वर्षे गर्दी जमवितो आहे...पण मतांचा दुष्काळ कधी हटणार? तेवढं जमवा एकदा तरी!!’’
...तेवढ्यात नेमकी घंटा वाजली- ‘‘टण्ण्ण!!’’
...त्या घंटाध्वनीचा अन्वयार्थ लावत साहेब परतीच्या प्रवासाला लागले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial dhing tang british nandi article