काळोखाय नम: (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
गुरुवार, 4 जानेवारी 2018

भिंतीवरील कभिन्न सावलीप्रमाणे
वाकून ऑथेल्लो ओरडला दु:खभराने...
"पुट आऊट द लाइट,
अँड देन पुट आऊट द लाइट!
विझवू दे मला आधी हा दिवा,
मग मालवू दे ही शांतपणे
तेवणारी मंद ज्योत...
माझ्या निरागस डेस्डेमोनाची...
हे कृत्य शक्‍य आहे,
फक्‍त अज्ञाताच्या काळोखातच.
तेव्हा काळोख करा रे
आधी कुणीतरी!''

भिंतीवरील कभिन्न सावलीप्रमाणे
वाकून ऑथेल्लो ओरडला दु:खभराने...
"पुट आऊट द लाइट,
अँड देन पुट आऊट द लाइट!
विझवू दे मला आधी हा दिवा,
मग मालवू दे ही शांतपणे
तेवणारी मंद ज्योत...
माझ्या निरागस डेस्डेमोनाची...
हे कृत्य शक्‍य आहे,
फक्‍त अज्ञाताच्या काळोखातच.
तेव्हा काळोख करा रे
आधी कुणीतरी!''

बंद करा...बंद करा तत्काळ
या "सा रम्या' नगरीतील
दिवाबत्ती, झुंबरे आणि दीपदाने.
बंद करा...बंद करा तत्काळ
येथला बेशर्म, गर्म बाजार
आंधळ्या देहभोगाचा,
दुर्धर रोगाचा आणि
बुभुक्षितांच्या "स्वाहा'चा.
नष्ट करा...नष्ट करा तत्काळ
तुमच्या विझवट्या फुंकरीने
तेवणारी ज्योत नि ज्योत,
-तुमच्या आमच्या आत्म्यासकट!

उघडून टाका ती सारी
तावदाने सताड,
खोला कमानदार दरवाजे,
सजवा उंबरठे रातोरात
...तेवढा काळोख घ्या घरात.
-घरातला प्रकाश बाहेर जावो
-बाहेरचा अंधार घरात येवो!
म्हणा नवे असूर्यसूक्‍त उच्च कंठरवात
करा समूहगान कळिकाळाच्या महिम्याचे...
रचा नव्या अंधारऋचा
काळोखरसपूर्ण क्रांतिगीते,
गेला बाजार एखादी
(पन्नास रुपयेवाली)
एल्गाराची कविता तरी!

धुंडाळा पोटमाळ्यावरचे
प्राचीन दस्तावेज, आणि
हुडका त्यात दडून बसलेली
निमित्तांची विषैल पिलावळ...
ऊर्जेचा प्रत्येक स्रोत होवो नष्ट
काळोखाचे कौतिक होवो पुष्ट

शतसूर्यमालिकांच्या दीपावली विझोत
उजेडाच्या झाडांची सरपणे होवोत

कारण-

आम्ही असोशीने जपून ठेवली आहेत
काळोखाची बेटे पिढ्यान्‌ पिढ्या अजूनही.
बर्करार आहे आमच्यातील गरळयुक्‍त आम्ल.
वारसाहक्‍काने नोंदवून घेतले आहेत
आम्ही भाऊबंदकीचे पुरावे
सातबाऱ्याच्या उताऱ्यावर!

फाटक्‍या पदरात, थंड चुलीत
जातीपातींच्या दुबेळक्‍यात
परंपरांच्या सांदीफटीत
जातिनिहाय उत्सवांच्या उतरंडीत
जपून ठेवले आहेत आम्ही
काळोखाचे खजिने.

जशी ज्योतीने पेटते ज्योत, तसाच
काळोखाने वाढतो काळोख
म्हणून म्हटले,
पुट आऊट द लाइट, अँड देन
पुट आऊट द लाइट.
विझवू दे मला आधी हा दिवा,
मालवू दे ही शांत ज्योत...

ॐ तमाय नम: ॐ अंधाराय नम: ॐ काळोखाय नम:
ॐ भ्रांति: भ्रांति: भ्रांति:

Web Title: editorial dhing tang british nandi article