सुंदोपसुंदी! (ढिंग टांग)

सुंदोपसुंदी! (ढिंग टांग)

(मामुंच्या डायरीचे पान)

आजची तिथी : हेमलंबीनाम संवत्सरे श्रीशके १९३९ पौष कृ. चतुर्थी.
आजचा वार : आभार देवा आज शुक्रवार!
आजचा सुविचार : सुवर्णकाराचेनि मुशी। कांचन पडिले फशी।
तेव्हाच शोभे ठुशी। गळ्यामाजी!! - संतकवी नाना.
(अर्थ : सुवर्णकाराच्या मुशीत तावून सुलाखून निघालेल्या सोन्याचीच ठुशी नावाचा अलंकार होतो व तो कुणाच्या तरी गळ्यात शोभतो.)

नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे.) नव्या वर्षात नवी डायरी लिहायला घ्यायची म्हणून एक तारखेपासून वाट पाहात होतो. अखेर आज रोजी मुहूर्त लागला. काय हे!! ह्याला हॅप्पी न्यू इयर कसे म्हणणार? नव्या वर्षाची सुरवात काही बरी झाली नाही, हे मात्र खरे. सरकारी कामाचा खोळंबा झाला त्याचे एवढे काही नाही, पण ‘नमो नम:’ ह्या सिद्धमंत्राच्या जपात चार दिवस खंड पडला. १०८ गुणिले ४ किती? जाऊ दे. हेही दिवस जातील!! अनुभवाच्या मुशीत माणूस सोन्यासारखा लखलखून उठतो. पण सोनाराचे शंभर घाव खाल्ल्यानंतर असा लोहाराचा एकच हातोडा खाणे नाही म्हटले तरी जिव्हारी लागते.  गेले पाच दिवस उसंत म्हणून नव्हती. जमाव पांगवण्यासाठी हवालदाराने दांडके घेऊन इकडे तिकडे धावावे, तसे पुढाऱ्यांना पांगवण्यासाठी मला धावावे लागत होते. ह्या महाराष्ट्रात पुढाऱ्यांची लोगसंख्या किती वाढली आहे? महाराष्ट्रात जनता कमी आणि पुढारीच ज्यास्त झाले आहेत, असा वहीम मला हल्ली येतो आहे.

प्रत्येक जण मला येऊन विचारत होता, ‘‘साहेब, पहिला दगड कोणी मारला? नाव सांगा!!’’ आता मला काय माहीत असणार? शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची पहिली मागणी कोणाच्या मुखातून आली हे सांगता येईल का? आमच्या नागपुरात खर्रा खाऊन पहिली पिंक कोणी टाकली, हे सांगता येईल का? ‘सबका साथ, सबका विकास’ ही घोषणा सर्वप्रथम कोणी दिली, हे सांगता येईल का? नाही, नाही, नाही!!
काल मंत्रालयात भेटेल तो माणूस माझ्याकडे बघून हळहळत होता. मी संयमी चेहरा ठेवून वावरत होतो. लोक कुजबुजत होते. ‘सिच्युएशन’, कंट्रोल, स्ट्रिक्‍ट ऑर्डर्स असले शब्द तेवढे ऐकू येत होते. मंत्रालयातल्या लिफ्टमनने नेहमीप्रमाणे सलाम मारला. मी मान हलवली.

‘‘तुमचा स्वोभाव फार नरम पडतो, साहेब!’’ तो.
‘‘अज्जिबात नाही! मी खमक्‍या आहे, खमक्‍या. खटासी खट आणि...’’ बोलायला गेलो, पण पुढचे आठवेना!
‘‘ठकासी ठकाठक ठकाठक ठकाठक...तेच तं सांगतोय म्या. अस्सं पायजेल!’’ लिफ्टमनने टाळी मागितली. मी दुर्लक्ष केले. मुख्यमंत्र्याला अशी टाळी मागते का कुणी?
‘‘पन आपला सवाल एकच आहे, साहेब!’’ लिफ्टमन मान हलवून म्हणाला. मी काही बोललो नाही.
‘‘इच्यारु का?’’
‘‘नको! पहिला दगड कोणी मारला? हेच ना?’’ मी चिडून म्हणालो.
‘‘ छ्या, काय संबंद? म्या इच्यारत हुतो की येवढा राडा झाला, तुम्ही एकलेच दांडकं घिऊन फिरतायसा! तुमचे पंचवीस वरसाचे मित्र कुटं हाईत सध्या?’’ लिफ्टमनने विचारले. तेवढ्यात सहावा मजला आला आणि मी निघालो
पहिला दगड कोणी मारला ह्याचे उत्तर ठाऊक नाही, पण पहिला दंगलग्रस्त कोण हे मला कळले आहे!! मीच!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com