जोडीब्रेकर्स! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
बुधवार, 10 जानेवारी 2018

ऑनरेबल हिज हायनेस प्रेसिडेंट
श्री. पं. राहुलकुमारजी,
२४, अकबर रोड, नवी दिल्ली.
प्रत रवाना : मा. पीडी,
पत्ता : १२, तुघलक रोड,
नवी दिल्ली.

ऑनरेबल हिज हायनेस प्रेसिडेंट
श्री. पं. राहुलकुमारजी,
२४, अकबर रोड, नवी दिल्ली.
प्रत रवाना : मा. पीडी,
पत्ता : १२, तुघलक रोड,
नवी दिल्ली.

(महत्त्वाचे आणि गोपनीय)
विषय : राष्ट्रवादी कांग्रेससोबत पुन्हा आघाडी करण्याविषयीच्या दुर्बुद्धीबाबत.
आ. महोदय,
सा. न. विनंती विशेष. मी एक कांग्रेस पक्षाचा साधासुधा कार्यकर्ता असून गेली अनेक वर्षे पक्षाची निरलस सेवा केली आहे. काही काळ मी दिल्लीत मंत्रीदेखील होतो व टेनिस, बॅडमिंटन असे खेळ खेळण्यात माझा हातखंडा आहे. माझे(ही) शिक्षण परदेशात झाले असून मी सुशिक्षितदेखील आहे. काही काळ मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदही अत्यंत समर्थपणे हाताळले होते. ह्या संपूर्ण कारकीर्दीत मी पक्षाशी एकनिष्ठ राहून राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे उलटे करून ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पक्षाचा विस्तार व्हावा म्हणून मी जेवढे प्रयत्न केले तेवढे कोणीच केले नाहीत, हे महाराष्ट्रात कोणीही सांगेल!! पण दैवगती वेगळी असते. माझ्या निरलस सेवेचे बक्षीस म्हणून सध्या मी कराड येथे बस डेपोच्या आसपास वेळ घालवतो. पण ते जाऊ दे.

आपल्या समर्थ, परिपक्‍व आणि समंजस नेतृत्वाखाली गुजराथेत आपल्या पक्षाला भरघोस यश प्राप्त झाले आहे. (अभिनंदनाचे पत्र पाठवले होते, ते मिळाले असेलच.) त्यामुळे आपल्या महाराष्ट्रातील पक्षकार्यकर्त्यांचा उत्साह प्रचंड वाढला आहे. तेही साहजिकच आहे. कडकी लागलेल्या माणसाला दुकानदाराने मोड देताना चुकून दहा रुपये ज्यास्त दिले तर त्यास आनंद होणारच. गुजराथचा दिग्विजय हा केवळ आपल्या जबरदस्त वक्‍तृत्वशैलीच्या जोरावर मिळाला. गुजराथेत इतके यश मिळते, तर पुढील वर्षी महाराष्ट्रात आपण जवळपास सगळ्याच जागा घरबसल्या जिंकू शकू असा आत्मविश्‍वास आम्हा कार्यकर्त्यांना हल्ली वाटू लागला आहे. आपण महाराष्ट्रात इतक्‍या सभा घेतल्यात, तर माझ्या मते २८८ जागाही कमीच पडाव्यात, इतकी मते मिळतील असे वाटते. बघू या!!

शिवाय गुजराथप्रमाणेच महाराष्ट्रातही चिक्‍कार देवळे आहेत. (काळजी नसावी!!) त्याचाही फायदा पक्षाला होईल. एकंदरित महाराष्ट्रात पुन्हा सत्तेवर येण्यासाठी सध्याची परिस्थिती अत्यंत अनुकूल असून आम्ही सारे कार्यकर्ते एकजुटीने तयारीला लागलो आहोत. असे सारे छान छान असतानाच आपल्या पक्षातील काही विघ्नसंतोषी लोक चक्‍क पक्षविरोधी कारवाया करू लागले आहेत. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी मी हे आपणांस पत्र लिहीत आहे.

सध्याचे सरकार घालवण्यासाठी आपल्याला राष्ट्रवादीशी हातमिळवणी करावीच लागेल, असा सूर काही लोक लावत असून दुर्दैवाने आपले (इथले) अध्यक्ष त्या सुरात सूर मिसळू लागले आहेत. राष्ट्रवादीशी हातमिळवणी करण्यास नवनिर्वाचित कांग्रेसअध्यक्षांची काहीच हरकत नसल्याचे हे लोक म्हणत आहेत. हे खरे आहे का? नसावे!! राष्ट्रवादीसारखा अवसानघातकी मित्र नाही, हे मी अनुभवाने सांगतो. एखाद्या मित्राला आपण शंभर रुपये उसने दिले, ते परत मागायला गेलो तर ‘तूच माझे दोनशे देणे लागतोस’ असे सांगणारे जे तथाकथित मित्र असतात. त्यापैकी एक राष्ट्रवादी आहे!! माझ्या हाताला लकवा मारल्याची अफवा ह्याच लोकांनी मागल्या वेळी उठवली होती, हे कृपया ध्यानी ठेवावे. पण तो लकवा नसून चकवा होता, हे निवडणूक निकालात त्यांना कळलेच. पण आताशा त्यांनीच पुन्हा उचल खाल्ल्याने आपले पक्षबांधव हुरळून जाताना दिसू लागले आहेत. मी त्याच (लकवा मारलेल्या) हाताने हे पत्र लिहीत आहे, यात सारे काही आले!! तेव्हा सावध राहावे, ही विनंती.
कळावे. आपला. मा. मा. मु. पृबा. च.

Web Title: editorial dhing tang british nandi article