दूरदृष्टी आणि दिव्यदृष्टी! (ढिंग टांग!)

dhing tang
dhing tang

"आत्ताच काय ते मागून घ्या... पुढल्या वर्षी सरकार बदलणाराय!'' फर्गसन रोड (अर्थात पुणे) इथल्या "वाडेश्‍वरा'च्या छत्रीखाली बसून बापटकाकांनी जाहीर केले आणि आमच्या पोटात खड्डाच पडला. ""भगवान के लिए ऐसा मत कहो'' असे आम्ही आक्रंदून म्हणणार होतो, पण मुखातून चुकून अविश्‍वासदर्शक सवाल गेला, ""क्‍काय? क्‍वॉय? कॅय? क्‍याय..य...य...'' (खुलासा : हा इको इफेक्‍ट आहे. "काय' एकच होता.) वेटिंगसाठी उभ्या असलेल्या पन्नास पुणेकरांनी आमच्याकडे चमकून पाहिले. "आमच्याकडे (अजूनही) क्रेडिट कार्ड स्वीकारले जात नाही', असे सांगितल्यावर गिऱ्हाइके (पुण्यात) जसे करतात, अगदी तस्सा आमचा "क्‍काय?' थोडा मोठ्यांदा गेला होता.
"खरं सांगतोय... पुढल्या वर्षी इल्ला प्पो!! आत्ताच काय ते मागून घ्या... भुरुक, भुर्रर्र फुर्रक...,'' बापटकाका म्हणाले. वाक्‍याचा शेवटचा ध्वनी हा सांबाराच्या भुरक्‍याचा होता.
""एक रस्समवडा, एक इडलीवडा मिक्‍स, एक मिसळपाव, दोन पेसारट्‌टू आणि दोन प्लेट अप्पे... शेवटी पेशल चहा दोन कप!'' जगाचा अंत जवळ आल्याप्रमाणे आम्ही भराभरा ऑर्डर सोडली. आत्ताच काय ते मागून घेतलेले बरे!! कल हो ना हो!!
""...आणि वर स्ट्राबेरी ज्यूस नको का?'' बापटकाकांनी पुणेरी आवाजात विचारले. त्याकडे आम्ही तितक्‍याच पुणेरी पद्धतीने दुर्लक्ष केले. सोपे आहे, (पुण्यात) प्रॅक्‍टिसने जमते.
""...पण काका, काकाऽऽ! आपण पन्नास वर्षं राज्य करायला आलो होतो ना? मग आता इतक्‍यात...'' आम्ही कळवळून विचारले. विमा न काढलेल्या मरणासन्न बापाला मुलग्याने विचारावे, तसा आमचा सूर थोडा चढा लागला होता हे खरे. पण आमचा त्याला इलाज नव्हता.
""मी सांगतो... पुढल्या वर्षी सरकार बदलणार आहे!! लिहून ठेवा,'' पुढ्यातल्या डोश्‍याची निर्दयपणे घडी घालत बापटकाका म्हणाले.
""पण का हा असा अपमृत्यू... अं?'' भटारखान्याच्या दिशेने पाहात आम्ही दु:खातिरेकाने म्हणालो.
""मी सांगतो म्हणून! ह्या टेबलावर बसून केलेलं माझं प्रत्येक भाकित आजवर खरं ठरलं आहे म्हणून! हवं तर आमच्या काकडे महाराजांना विचारा!! चटणी आण रे बाळा...'' शेवटची आज्ञा सेवेकऱ्याला होती, हे आम्हाला किंचित उशिरा कळले.
""तेव्हा कुठलं भाकित होतं?'' आम्ही. कुतूहल शोधाची जननी आहे नं!
""हेच की काकडे महाराजांचं भाकित खरं ठरेल..!'' बापटकाकांनी थंडपणाने आता इडली समोर ओढली होती. खुलासा : बापटकाका थंड, इडली नव्हे!
""मग आमच्या अच्छे दिनांचं काय?'' आम्ही.
""पुढल्या वर्षी!.. आहा!!'' बापटकाका. "आहा' इडलीला उद्देशून होता.
""मग आता आमच्यासारख्या हाडाच्या कार्यकर्त्यांनी कुणाकडे पाहायचं?'' आमच्या आवाजात साता जन्माची काकुळत होती.
""ट्यॉचॉ ऑसॉ ऑहेऽऽ... इथं दुर्बिणीनं शोधून प्रामाणिक कार्यकर्ते मिळत नाहीत! मग काय होणार? आमचे "चंपा' शोधून ऱ्हायलेत ना कार्यकर्ते!! एक मिळेना धड..'' खांदे उडवत बापटकाका म्हणाले. "अरे, आम्ही मेलोय काऽऽऽ' असे आकांताने आम्हाला ओरडायचे होते, पण आमचा आवाजच उमटला नाही. आम्हाला आठवले! "हल्ली प्रामाणिक कार्यकर्ते दुर्बिणीने शोधावे लागतात,' असे मध्यंतरी चंदूदादा कोल्हापूरकर-पाटील ऊर्फ चंपा (हे त्यांचे राजकीय लाडनाम बरं!!) म्हणाले होते. त्यांच्या दुर्बिणीच्या कांचा साफ करण्याची गरज असल्याचे आम्हाला तेव्हा प्रकर्षाने जाणवले होते इतकेच.
""मग आता आम्ही काय करावं?'' आम्ही असहाय होऊन सवाल केला.
""तुम्ही?..तुम्ही निघा तूर्तास!'' बापटकाका पटकन म्हणाले. चहाचा अखेरचा घोट घेऊन तडक काउंटरवर जाऊन बिल भरून निघूनसुद्धा गेले.
...आम्हाला उठणे भागच होते. चंदूदादांची दूरदृष्टी आणि बापटकाकांची दिव्यदृष्टी हीच आपल्याला तारून नेईल, ह्या श्रद्धेपोटी आम्ही अजूनही इडलीची वाट पाहत आहो! येईल तेव्हा येईल!! नमो नम:!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com