मनसासे झिंदाबाद! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
मंगळवार, 16 जानेवारी 2018

किंक्रांतीच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्र नवनिर्माण साहित्य सेनेच्या स्थापनेची घोषणा करताना आम्हाला अत्यंत हर्ष होत आहे. आनंद होत आहे. समाधान वाटत आहे. माय मराठीचे पांग फेडण्यासाठी आम्ही हे अवघड शिवधनुष्य पेलले असून, त्यामुळे येत्या कांही दिवसांतच (पक्षी : बडोदे येथे होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या आत!) मराठी साहित्याचे संपूर्णपणे नवनिर्माण होऊन जाईल, यात आमच्या मनीं तरी शंका नाही.

किंक्रांतीच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्र नवनिर्माण साहित्य सेनेच्या स्थापनेची घोषणा करताना आम्हाला अत्यंत हर्ष होत आहे. आनंद होत आहे. समाधान वाटत आहे. माय मराठीचे पांग फेडण्यासाठी आम्ही हे अवघड शिवधनुष्य पेलले असून, त्यामुळे येत्या कांही दिवसांतच (पक्षी : बडोदे येथे होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या आत!) मराठी साहित्याचे संपूर्णपणे नवनिर्माण होऊन जाईल, यात आमच्या मनीं तरी शंका नाही. आमचे आराध्यदैवत ऊर्फ निश्‍चयाचा महामेरू ऊर्फ महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचे अध्वर्यु जे की श्रीमान चुलतराजसाहेब ह्यांनी सांगलीत औदुंबर येथील साहित्य सोहळ्यात काढलेल्या ज्वलज्जहाल उद्‌गारांपासून प्रेरणा घेऊन आम्ही हा साहित्य सेनेचा बेलभंडार उचिलला (पक्षी : उचलला) आहे. आमचा संकल्प सिद्धीस नेण्यास अवघे मराठी साहित्यिक सिद्ध(हस्त) आहेत.

सातव्या-आठव्या शतकापासून आजतागायत मराठी साहित्यिकांची युनियन बांधावी, हा विचार कोणालाच कां बरे सुचला नाही? वास्तविक मराठी टिकली तर मराठी माणूस टिकेल, मराठी माणूस टिकला तर महाराष्ट्र टिकेल, आणि महाराष्ट्र टिकला तर राष्ट्र टिकेल, इतके हे साधे सोपे समीकरण होते. तथापि, आलजिबऱ्यात मराठी माणूस हरहमेश कमी पडत आला असल्याने व पर्यायाने समीकरण हा विषय गणित विभागात मोडत असल्याने मराठी साहित्यिक ह्या भानगडीपासून प्राय: दूरच राहिल्याचे आजवरचे चित्र आहे. पण आता हे बदलेल... बरं!!

साहित्यिकांनी योग्य त्या प्रकारे मराठीची मशागत केलेली नाही, ही आमच्या(ही) ऊरातील खंत आहे. जगात किंवा भारतात किंवा महाराष्ट्रात किंवा मुंबईत किंवा गेलाबाजार दादरमध्ये इतके सारे घडत असताना मराठी साहित्यिक गप्प कां? हा शंभरनंबरी सवाल श्रीमान चुलतराजसाहेबांच्या मुखातून औदुंबर येथे उमटला. अखिल महाराष्ट्राचाच तो हुंकार होता असे म्हटले पाहिजे. त्याचे उत्तर म्हणूनच आम्ही आज ‘मनसासे’ची स्थापना करीत आहो.

महाराष्ट्रात गेले कित्येक महिने काही ना काही घडते आहे. नोटाबंदी झाली! (च्या ** * ***!!), जीएसटी आला!!(**** *!!) बुलेट ट्रेनचा कट रचला गेला!! (मो** ** *!!) नगरसेवकांच्या पळवापळवीपासून गुलाबी बोंड अळीपर्यंत अनेक विषय आले आणि गेले. पण (एवढे होऊनही) मराठी साहित्यिक हूं की चूं करीत नाहीत, ही काय भानगड आहे? मधल्या काळात दिवाळी येऊन गेली, तेव्हा मराठी साहित्यिकांनी दिवाळी अंकात भरपूर लिखाण करून पैसे (भरपूर हा शब्द इथे टाळला आहे. डोण्ट वरी!) मिळवले; पण एकही लिखाण वर नोंदवलेल्या घडामोडींच्या संदर्भात नाही!! मराठी साहित्यिकांनी हा अप्पलपोटा दृष्टिकोन सोडावा आणि मराठी साहित्याच्या नवनिर्माणात सामील व्हावे, असे आवाहन आम्ही या ठिकाणी करीत आहो.
‘‘ज्यांना लिहिता येते त्यांनी लिहिले पाहिजे! विशेषत: माताभगिनींनी वर्तमानपत्रात पत्रे आणि लेख लिहावेत...’’ असे प्रेरक व मार्गदर्शक उद्‌गार श्रीमान साहेबांनी औदुंबरात काढले. ते ऐकून महाराष्ट्रातील तमाम माताभगिनी भराभरा कुकर लावून मेजाशी लिहीत बसल्या आहेत, असे मनोहर मानसचित्र आमच्या नेत्रांसमोर उभे राहिले. ह्या महाराष्ट्रातील स्त्रिया लिहू लागल्या तर क्रांती घडेल, ह्याबद्दल आमच्या मनात शंका नाही. तुम्हीही घेऊ नये!! परिणामत: आम्ही महाराष्ट्र साहित्यिक नवनिर्माण साहित्यिक सेनेच्या महिला शाखेचा शुभारंभही ह्याच क्षणी, इथेच करीत आहो!! एखादा जटिल प्रश्‍न सोडवायचा असेल तर तो दोन प्रकारे सोडविता येतो. एक, हात जोडून. दुसरा, हात सोडून!! पण यापुढे साहित्यिकांनी पुढाकार घेतला तर लिखाणाचा तिसरा मार्गही उपलब्ध होण्याची संधी आहे. तेव्हा त्वरा करा! आजच नावनोंदणी करा!! महाराष्ट्र नवनिर्माण साहित्य सेनेचा विजय असो!!

Web Title: editorial dhing tang british nandi article