याऽऽहूऽऽ...नेतन्याहूऽऽ! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
शनिवार, 20 जानेवारी 2018

इझरेलचे प्रधानसेवक श्रीमान बेन्यमिन नेतन्याहू ऊर्फ बीबी ह्यांनी बॉलिवूडला भेट दिली. होय, आम्ही त्यांना जिव्हाळ्याने बीबी ह्या लाडनामानेच संबोधतो. बीबी ह्यांना बॉलिवूडचे भारी वेड! किंबहुना, एकदा तरी बॉलिवूडला जायला मिळेल, ह्या अनिवार इच्छेपोटीच त्यांनी इझरेलचे प्रधानसेवकपद हासिल केले होते, असे म्हटले तरी चालेल. आमची आणि बीबी ह्यांची फार्फार जुनी वळखपहचान आहे. कान इकडे करा... बीबी ह्यांना हिंदी भाषा शिकवण्याची जबाबदारी आमच्यावर होती. आम्ही त्यांना हिंदी तर शिकवलीच, वर उरलेल्या तीन तासांत मराठीदेखील शिकवून टाकली! आहे काय नि नाही काय!!!

इझरेलचे प्रधानसेवक श्रीमान बेन्यमिन नेतन्याहू ऊर्फ बीबी ह्यांनी बॉलिवूडला भेट दिली. होय, आम्ही त्यांना जिव्हाळ्याने बीबी ह्या लाडनामानेच संबोधतो. बीबी ह्यांना बॉलिवूडचे भारी वेड! किंबहुना, एकदा तरी बॉलिवूडला जायला मिळेल, ह्या अनिवार इच्छेपोटीच त्यांनी इझरेलचे प्रधानसेवकपद हासिल केले होते, असे म्हटले तरी चालेल. आमची आणि बीबी ह्यांची फार्फार जुनी वळखपहचान आहे. कान इकडे करा... बीबी ह्यांना हिंदी भाषा शिकवण्याची जबाबदारी आमच्यावर होती. आम्ही त्यांना हिंदी तर शिकवलीच, वर उरलेल्या तीन तासांत मराठीदेखील शिकवून टाकली! आहे काय नि नाही काय!!! हिंदुस्थान ही जर नवी ताकद असेल, तर त्या ताकदीची भाषा जी की हिंदी, आलीच पाहिजे व ती भाषा फक्‍त हिंदी चित्रपट पाहूनच शिकता येते, हे आम्ही बीबी ह्यांना ठासून पटवून दिल्यानेच त्यांचे लक्ष बॉलिवूडकडे वळले.  आम्हांस आठवते त्याप्रमाणे ‘दीवार’ चित्रपटातील एका दृश्‍यात महानायक अमिताभ बच्चंजी ग्यारेजमध्ये गुंडांची वाट पाहत बसलेले असतात... ते दृश्‍य पाहून बीबींनी जागच्याजागी निर्णय घेतला. इझरेलच्या भूमीत बॉलिवूड आणायचेच. विशेषत: बच्चंजींचा तो जगविख्यात डायलॉग (‘पीटर, तुम लोग मुझे ढूंढते रहे, और मैं यहां तुम्हारा इंतजार कर रहा हूं...’) ऐकून तर त्यांचे हृदयपरिवर्तनच झाले. सदर चित्रपटातील हाणामारी पाहून बीबी ह्यांनी ‘मोसाद’चे प्रशिक्षणच बदलून टाकले, असे म्हणतात. (अज्ञांसाठी : मोसाद ही इझरेलची गुप्तचर संस्था आहे!! असंख्य हॉलिवूडपटांमध्ये ह्या संस्थेने बरेच काम केले आहे! असो!!) एका माणसाला अडीच मिनिटात बारा-पंधरा माणसे हवेत उडवता आलीच पाहिजेत, हा नवा ‘मोसाद’चा नियम झाला. शिवाय आज ‘मोसाद’मध्ये कमी उंचीची माणसे भर्ती करणे बंद करण्यात आले आहे म्हणे. अशी कितीक उदाहरणे देता येतील. उदाहरणार्थ, ‘सिंघम’...पण जाऊ दे ना! कशाला उगीच त्यांच्या कॉम्बॅट टेक्‍निकमध्ये शिरा?
आगऱ्यातील ताजमहाल पाहत असताना बीबी मंत्रमुग्ध झालेले पाहून नमोजींनी त्यांना हळूवारपणे विचारले, 'क्‍यों, बीबीभाई, सरस छे के नै? तमे महाराष्ट्र मां ओरंगाबाद जईये. त्यां बीबी का मकबरा छे...'

त्यावर बीबी म्हणाले, 'नरीभाई, मने मकबरा नथी...बोलिवूड जोईए!' त्या रात्रीच बीबींची बॉलिवूडला रवानगी करण्यात आली. सोबत अर्थात आम्ही होतोच.
'अमिताभ बच्चनसाहेबांना भेटता येईल का?' अत्यंत भक्‍तिभावाने ओथंबलेल्या सुरात त्यांनी आम्हाला विचारले.

'अलबत...का नाही?' आम्ही. श्रीयुत बच्चनजींची आमची उत्तम ओळख आहे, हे ऐकून त्यांना धक्‍काच बसला. बच्चंजींना अभिनयाचे धडे आम्हीच दिले होते, हे आम्ही त्यांना सांगितले असते, तर त्यांना चक्‍कर येण्याची शक्‍यता होती. म्हणून गप्प राहिलो. ताज हाटेलातील मेजवानीत बीबींनी साऱ्या बॉलिवूडकरांची मने जिंकली.
'शालोम बॉलिवूड...आय लव्ह बॉलिवूड!' असे त्यांनी म्हणताच उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या. 'आम्हीही आता बॉलिवूडमध्ये इंटरेस्ट घेतला आहे. बॉलिवूड तेल अवीवमध्ये अवतरले पाहिजे!' असे त्यांनी सांगताच टाळ्यांची संख्या वाढली.
'तुमच्या निर्मितीसाठी आम्ही बरीच रक्‍कम खर्च करू!' असे त्यांनी सांगितल्यावर तर काही निर्माते आनंदाने रडूच लागले. ते पुढे म्हणाले, ‘तुम्ही आमच्या देशात या! तुमचं शूटिंग नीट होईल, ही जबाबदारी आमची!!'
...शूटिंगचे नाव काढताच पिनड्रॉप शांतता पसरली! आम्ही बीबींच्या कानात कुजबुजलो, 'चित्रीकरण म्हणा, चित्रीकरण!'

Web Title: editorial dhing tang british nandi article