...आठवणीतील (कन्नड) गाणे! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
मंगळवार, 23 जानेवारी 2018

प्रिय चंद्रकांतप्पा, अतिशय घाईघाईत ही चिठ्ठी लिहीत आहे. डाव्होसला जाण्यासाठी पुढचे विमान पकडायचे आहे. तिथल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीला आपल्या साऱ्यांचे तारणहार आणि कॉमन दैवत जे की श्रीश्री नमोजी (नमोनम:) ह्यांनी महाराष्ट्रातून मला न्यायचे ठरवले. त्याप्रमाणे ब्याग भरून घाईघाईने निघालो आहे. पण तुम्ही कुठला नवा घोळ घालून ठेवला आहे? कळल्यापासून हादरून गेलो आहे.

प्रिय चंद्रकांतप्पा, अतिशय घाईघाईत ही चिठ्ठी लिहीत आहे. डाव्होसला जाण्यासाठी पुढचे विमान पकडायचे आहे. तिथल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीला आपल्या साऱ्यांचे तारणहार आणि कॉमन दैवत जे की श्रीश्री नमोजी (नमोनम:) ह्यांनी महाराष्ट्रातून मला न्यायचे ठरवले. त्याप्रमाणे ब्याग भरून घाईघाईने निघालो आहे. पण तुम्ही कुठला नवा घोळ घालून ठेवला आहे? कळल्यापासून हादरून गेलो आहे.
...गेल्या काही तासांपासून मला अगम्य भाषेत फोन येऊ लागले आहेत. नुसते कुडकुड कुडकुड कुडकुड ऐकून अक्षरश: कान किटले. प्रारंभी वाटले की मोबाइल नेटवर्कचा नित्याचा घोळ असेल! (मोबाइल फोनवर नाही का अशी मधूनच कुडकुड ऐकू येत? तसेच!) पण तो गैरसमज होता. सगळे फोन कर्नाटकातून येत होते!! ""चंद्रकांतप्पा, कुडकुड कुडकुड कुडकुड...'' थोड्या वेळाने मी अक्षरश: घाबरून कुडकुडू लागलो. शेवटी बारामतीकर दादाजींचा फोन आला तेव्हा खरा प्रकार कळला. दादाजी फार रागावून बोलत होते. कर्नाटक बॉर्डरवर जाऊन तुम्ही कानडीत गाणेबिणे म्हटलेत, अशी तक्रार त्यांनी केली. सुरवातीला मी "व्वा! क्‍या बात है' अशीच दाद देऊन मोकळा झालो; पण ते माझ्या कानात ओरडले की, ""व्वा, काय व्वा? वाऽऽ रेऽऽ...तुमचे चंद्रकांतप्पा तिकडे कानडीत गाणे म्हणताहेत, कानडीत!!''
""क्‍काय? गाणे?'" मीही किंचाळलो.
""कानडीत!'' ते म्हणाले.
"" हो...पण चक्‍क गाणे?'' मी म्हणालो.
...मघापासून हेच चालू आहे. तुम्ही काहीही करा, पण गाऊ नका, असे तुम्हाला मी पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगितले होते ना? हल्ली तर मंत्रिमंडळाच्या बैठकीत तुम्ही घसा खाकरलात तरी माणसे सरसावून बसू लागली आहेत. गाणे मीदेखील म्हणतो. किंबहुना महम्मद रफीची गाणी मी रफीपेक्षाची चांगली म्हणतो, असे मला मध्यंतरी कोणीतरी म्हणाले होते. (आठवा : त्तारीऽऽफ करू क्‍क्‍या उसकीऽऽ...जिसनेऽऽ तुम्हें बनाऽऽया..!) पण गाता गळा आहे म्हणून मी जातो तेथे गाणे म्हणत नाही. आपण पुढारी लोक जर अशी गाणी म्हणू लागलो तर गाणाऱ्यांनी काय करायचे? तुम्ही तिकडे जाऊन कानडीत गाणे म्हटल्यामुळे महाराष्ट्राचा अपमान झाला असून, चंद्रकांतप्पांचा ताबडतोब राजीनामा घ्या, असे बारामतीकरदादा म्हणत होते. काय करू? डाव्होसहून परत येईपर्यंत मराठीतसुद्धा गाणे म्हणू नका, अशी माझी नम्र सूचना आहे. आल्यावर तुमचे काय करायचे ते पाहू. कळावे.
आपला, फडणवीसनाना.
* * *
प्रिय नानासाहेब फडणवीस, नमस्काराऽऽ...तुम्ही खुशाल परदेश दौऱ्यावर जा! इथे काहीही होणार नाही, झालेच तर मी ते बघून घेईन!! कर्जमाफीचे मीच बघून घेतले आणि रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांचेही मीच काय ते केले!! तेव्हा जस्ट डोण्ट वरी!!
नानासाहेब, गाण्याच्या क्षेत्रात सध्या प्रचंड कांपीटिशन वाढली आहे. नवोदितांना प्रस्थापितांच्या प्रखर विरोधाला तोंड देतच आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागते, हे आपल्याला माहीतच आहे. विरोधकांनी माझा "सुमन कल्याणपूर' करण्याचा डाव रचला आहे, तो मी हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही!! माझे कानडीत गाणे म्हणणे ह्या लोकांना आवडले नाही, हा निव्वळ ह्या लोकांचा जळकूपणा आहे. लोक ह्यांची भाषणे ऐकून घेत नाहीत आणि माझ्या गाण्याला टाळ्या मिळतात, हे खरे ह्यांचे दु:ख आहे. आपले गुरू नमोजी प्रत्येक राज्यात जाऊन भाषणाच्या पहिल्या चार ओळी तिथल्या भाषेत बोलतात. त्यांना कोण राजीनामा मागणार?
...महाराष्ट्रात तर "कानडा राजा पंढरीचा' असेच म्हटले आहे. आता ज्यांच्या पंढरीचा राजाच कानडा आहे, त्या मराठी माणसाला कानडीत बोलल्याबद्दल बोल लावणे, कितपत योग्य आहे? तेव्हा तुम्ही डाव्होसला जा, मी कर्नाटकात जातो... काळजी करू नये.
आपला, चंद्रकांतप्पा.

Web Title: editorial dhing tang british nandi article