माकड आणि माणूस! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
शुक्रवार, 26 जानेवारी 2018

सांप्रतकाळी गेले काही दिवस मानवाच्या उत्क्रांतीबाबत देशभर उलटसुलट चर्चा होत असून, माणूस माकडापासून उत्क्रांत झाला की माकड माणसापासून असा वाद रंगला आहे. आम्हाला हा संपूर्ण वादच अत्यंत पोकळ, उथळ आणि उच्छृंखल (म्हंजे नेमके काय म्हायत नाय!) वाटतो. आमचे परममित्र आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास खात्याचे राज्यमंत्री जे की सत्यपाल सिंहसाहेब द ग्रेट ह्यांनी मानवी उत्क्रांतीचा प्रचलित सिद्धांत ही शुद्ध थाप असून, उपनिषदे व पुराणांमध्ये माणूस माकडापासून उत्क्रांत झाल्याचा एकही पुरावा नसल्याचे ठासून सांगितले. त्यांच्यावर हल्ली फार टीका होते आहे, ह्याचे आम्हाला भयंकर दुःख झाले आहे.

सांप्रतकाळी गेले काही दिवस मानवाच्या उत्क्रांतीबाबत देशभर उलटसुलट चर्चा होत असून, माणूस माकडापासून उत्क्रांत झाला की माकड माणसापासून असा वाद रंगला आहे. आम्हाला हा संपूर्ण वादच अत्यंत पोकळ, उथळ आणि उच्छृंखल (म्हंजे नेमके काय म्हायत नाय!) वाटतो. आमचे परममित्र आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास खात्याचे राज्यमंत्री जे की सत्यपाल सिंहसाहेब द ग्रेट ह्यांनी मानवी उत्क्रांतीचा प्रचलित सिद्धांत ही शुद्ध थाप असून, उपनिषदे व पुराणांमध्ये माणूस माकडापासून उत्क्रांत झाल्याचा एकही पुरावा नसल्याचे ठासून सांगितले. त्यांच्यावर हल्ली फार टीका होते आहे, ह्याचे आम्हाला भयंकर दुःख झाले आहे. साधा विचार करा, प्राचीनकाळी माणसे विमानाने इथून तिथून उडत असत. ब्रह्मास्त्रे, पर्जन्यास्त्रे आदी आदी अस्त्रांचा शोध लावत व ते शोध नीट लागले आहेत की नाही, हे तपासण्यासाठी युद्धेबिद्धेही करत. अशी प्रगत माणसे माकडाचे नातलग कसे असू शकतील?

माकडापासून माणूस उत्क्रांत झाला, हा सिद्धान्त म्हंजे चार्ल्स डार्विन नामे एका तथाकथित फिरंगी शास्त्रज्ञाने विज्ञानाची केलेली निव्वळ माकडचेष्टा आहे, असे आमचे ठाम प्रतिपादन आहे. आमच्या ह्या प्रतिपादनाचा काही लोकांना निराळाच वास येईल. पण अशी मंडळी निव्वळ देशद्रोही आहेत, असेच आम्ही म्हणू!!
डार्विन साहेबांनी पाचेक वर्षांची समुद्र सफर करून "ओरिजिन ऑफ स्पेसीस' नावाचे एक चोपडे लिहिले. ह्या बोटीच्या सफरीवर ते वारंवार आजारी पडत अशा नोंदी आहेत. त्याअर्थी त्यांना बोट लागत असावी! तब्बेत बरी नसतानाही ते गालापागुस बेटांवर फेरी मारायला फेरीतून गेले आणि आचरटासारखा काहीच्या काही सिद्धांत मांडून परत आले, असे सांगण्यात येते. तब्बेत बरी नसतानाच असले सिद्धांत सुचतात, हे उघड आहे. कुठला तंदुरुस्त माणूस "माझे खापर पणजोबा अंजिराच्या झाडावर राहात होते', असे उघडपणे सांगेल? एकही नाही!! पण डार्विन साहेब हे इंग्रज साहेब होते. त्यांनी सांगितले!! त्यांचे म्हणणे नेटिव्हांनी निमूटपणे ऐकून घेतले. इंग्रजांच्या बाबतीत मानवी उत्क्रांतीचा डार्विन साहेबाचा सिद्धांत लागू पडतही असेल. कारण मध्ययुगात इंग्रजांना लाल तोंडाची माकडे असे म्हटले जात असे. इंग्रजांनी जे सांगितले, तेच आपण सत्य मानून पुढे क्रमिक पुस्तकांतून शिकत व शिकवत आलो आहोत. हे सारे त्या मेकॉलेमुळे झाले, असा सिंहसाब द ग्रेट ह्यांचा दावा आहे. तो आम्हालाही मान्य आहे. मेकॉलेच्या घातक शिक्षणपद्धतीचे चटके आम्हीही खाल्ले आहेत. बालपणी शाळेत असताना झिंझांथ्रोपस, आस्ट्रेलोपिथेकस, होमो इरेक्‍टस आणि होमो सेपियन असले टप्पे पाठ करकरून आमच्या "व्हर्टिब्रा'ला बांक आला होता. हे सारे थोतांड शिकविणारे जांभळे मास्तर मात्र वान्नराच्या वंशातले असावेत, असा दाट वहीम आल्याने आम्ही आंधळेपणाने डार्विनच्या सिद्धांतावर विश्‍वास ठेवला. इतकेच नव्हे, तर हा सिद्धांत तोंडपाठ केल्यानंतर आम्ही (मागल्या बाजूला) हळूचकन हात फिरवून शेपूट चाचपून पाहिल्याचे स्मरते. (वाचकांसाठी अर्जंट खुलासा : नव्हते!!) पुढे वाढत्या वयापरत्वे शेपटाचा विचार गळून पडला आणि शेपटे बघत हिंडण्याच्या सवयीमुळे काहीवेळा अनवस्था प्रसंगही ओढवला. पण तो विषय उत्क्रांतीचा नाही, सबब त्याचा ऊहापोह येथे नको.

माकडापासून माणूस निर्माण झाला, असे मानणाऱ्यांची धन्य होय!! आम्ही त्यातले नाही!! उलटपक्षी आम्ही असे सिद्ध करून दाखवू शकतो, की माणसापासून माकड उत्क्रांत झाले!! ह्या सिद्धांतासाठी आम्ही कैक उदाहरणे दाखवून देऊ शकतो.
...सिंहसाब द ग्रेट ह्यांना समक्ष भेटून आम्ही आमचा पाठिंबा व्यक्‍त केल्यावर खुश होऊन त्यांनी आम्हाला एक अर्धवट खाल्लेला पेरू दिला. एवढेच.

Web Title: editorial dhing tang british nandi article