जो भजे हरी को सदा..! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

‘‘तुमच्या कचेरीबाहेर भज्यांची टपरी चालवणारा मनुष्यमात्र रोज दोनशे रुपये कमावून घरी जात असेल, तर त्याला कमाई म्हणायचे की नाही? बोला... मग आमच्या नमोजींचे काय चुकले?’’ डाव्या गालावर डाव्या हाताची तीन बोटे टेकवून साक्षात आलमगीर अमितशहा ऊर्फ मोटाभाई आम्हाला विचारत होते, तेव्हा आमचे लक्ष उजवीकडील सैपाकघराच्या दिशेने येणाऱ्या स्वादभऱ्या सुगंधाकडे होते. बरोबर वळखलेत... भज्यांचा वास दर्वळत होता. होय, आम्ही राजधानी दिल्लीतील खाविंदांच्या ‘११ अशोका रोड’मध्ये बसलो होतो. अहाहा, भजीयाऽऽ..!!

‘‘तुमच्या कचेरीबाहेर भज्यांची टपरी चालवणारा मनुष्यमात्र रोज दोनशे रुपये कमावून घरी जात असेल, तर त्याला कमाई म्हणायचे की नाही? बोला... मग आमच्या नमोजींचे काय चुकले?’’ डाव्या गालावर डाव्या हाताची तीन बोटे टेकवून साक्षात आलमगीर अमितशहा ऊर्फ मोटाभाई आम्हाला विचारत होते, तेव्हा आमचे लक्ष उजवीकडील सैपाकघराच्या दिशेने येणाऱ्या स्वादभऱ्या सुगंधाकडे होते. बरोबर वळखलेत... भज्यांचा वास दर्वळत होता. होय, आम्ही राजधानी दिल्लीतील खाविंदांच्या ‘११ अशोका रोड’मध्ये बसलो होतो. अहाहा, भजीयाऽऽ..!!
‘पकोडे बनाकर दो सो रुपये कमाने को रोजगार कहोगे के नहीं कहोगे...’ असा तिखट, खारट आणि मिरचीयुक्‍त सवाल नमोजींनी केल्यानंतर वातावरण कढईतील तेलाप्रमाणे उकळू लागले आहे. भजी हा आमचा फार्फार पूर्वीपासून वीक पाइंट आहे. एक प्लेट भजी (मिरचीसकट) आमच्या पुढ्यात सर्कवणाऱ्या कोणाचेही आम्ही तुरंत भक्‍त होवोन जातो... अगदी कुणाचेही!!

‘‘अलबत अलबत! निश्‍चितच ही कमाई आहे..’’ आम्ही रुकार भरला. दोनशे रुप्पय ही रक्‍कम तितकीशी बरी नाही, असे आम्ही म्हणणार होतो, पण बोललो नाही. कां की भजी तळणाऱ्या भजकाला कोट्यवधी रुपयांची माया मिळो, अशाच भरपेट सदिच्छा आम्ही एरव्ही देतो. भजी तळणारा इसम हा अन्नपूर्णेचाच एक अवतार आम्ही मानतो. आमच्या कचेरीबाहेरील अण्णा लालेलाल रंगाची कांदा भजी टॉप काढतो. (कांता बज्जी २० रु. प्लेट) त्या अण्णास आमचे शतप्रतिशत वंदन असो. सारा देश आणि देशबांधव एकमेकांसमवेत एकदिलाने आणि एकमुखाने भजी खात आहेत, असे रम्य चित्र आमच्या नजरेसमोर आले.
‘‘सभ्य अने मेहनती माणस भजिया खाए छे... जे दिवस आ देशनां बांधव एकमेकांना भजी भरवतील, तो सुभ दिवस!!’’ मोटाभाईंनी ऐलान केले. ‘अच्छे दिन’ आता खरोखर येणार, ह्याबद्दल आमच्या मनात खमंग खात्री पटली.

‘‘मला वाटतं, आपण मुद्रा योजनेच्या आणि मेक इन इंडियाच्या अंतर्गत पकोडे प्रोडक्‍शन वाढवावे! पकोडे एक्‍सपोर्टही होऊ शकतात..,’’ आम्ही शक्‍कल सुचवली. जपानमध्येही भजी-पकोडे बनवण्याची चाल आहे. तिथं त्याला टेंपुरा म्हणतात (म्हणे!) जपानी टेंपुऱ्याची चव अजून आम्ही चाखली नाही, पण बुलेट ट्रेनच्या बदल्यात आपण त्यांना पकोडे दिले तर काय वाईट आहे? तसे पाश्‍चात्त्यांमध्येही त्यांस फ्रिटर्स असे म्हणतात. तिथंही जहाजांनी भजी पाठवता येतील, असेही आम्ही सुचवून ठेवले.
बाय द वे, भजी ह्या खाद्यपदार्थाबद्दल आमचा प्रदीर्घ अभ्यास आहे. भजी तळणे ही क्रिया दिसते तितकी सोपी नाही. भज्यांची रेसिपी सांगावयाला सोपी, परंतु तळावयास कठीण! भज्यांचे अनेक प्रकार असतात. उदाहरणार्थ : कांदा भजी, बटाटा भजी, गोल भजी आणि केळा भजी. अर्थात, हे झाले ढोबळ भज्यांचे प्रकार. (ढोबळी मिरच्यांची भजी वेगळी!!) भज्यांचे मूळ पुराणांतरीदेखील सांपडते. गीर्वाण भाषेत भज्यांस ‘पक्‍वट’ असे म्हणत असत. उदा. बकासुराने गाडाभर पक्‍वटांचा फन्ना उडवला. (वाचा किंवा पहा : महाभारत) आता गाडाभर भजी खाणे हे चांगले लक्षण नाही, असे कोणीही म्हणेल. पण गाडाभर नव्हे, तरी गाडीभर भज्यांचा समाचार घेणारी मनुष्यमात्रें आम्ही पाहिली आहेत.

‘‘शुं वात करे छे? जपानमां पकोडा गमे छे?’’ मोटाभाईंचा चेहरा उजळला.
‘‘चोक्‍कस!’’ आम्ही.
आमच्यावर खुश होऊन मोटाभाईंनी एक प्लेट भजी मागवली. कालांतराने आमच्या समोर भज्यांचा छोटासा ढीग होता. सोबत तळलेली मिरचीदेखील!! आमची ब्रह्मानंदी टाळी लागली नसती तरच नवल.
‘जो भजे हरी को सदा, सोहि परमपद पाएगाऽऽ...’ हे भजन गुणगुणत आम्ही तेथून बाहेर पडलो. भजनाला भजन का म्हणतात तेही कळले. असो.

Web Title: editorial dhing tang british nandi article