कल्याणदेवी! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

अथेन्सच्या वेशीवर येऊन
अजिंक्‍यवीर पेसिस्ट्रॉटसनं
हातातल्या भाल्यासारखाच
उंचावला स्वर, म्हणाला :
हे अथेन्सवासीयांनो, ऐका!
सम्राट मेगाक्‍लिसची सत्ता
मी उलथून टाकली आहे.
इथून पुढे माझं राज्य...’’

अथेन्सवासीयांनी जयजयकार केला.

अथेन्सच्या वेशीवर येऊन
अजिंक्‍यवीर पेसिस्ट्रॉटसनं
हातातल्या भाल्यासारखाच
उंचावला स्वर, म्हणाला :
हे अथेन्सवासीयांनो, ऐका!
सम्राट मेगाक्‍लिसची सत्ता
मी उलथून टाकली आहे.
इथून पुढे माझं राज्य...’’

अथेन्सवासीयांनी जयजयकार केला.

शेजारच्या शुभ्र अश्‍वावर आरूढ
उंचपुऱ्या लावण्यवतीकडे निर्देश
करून पेसिस्ट्रॉटस म्हणाला :
‘‘अथेन्सवासीयांनो, जयजयकार करा,
ह्या कल्याणमयी देवी अथीनाचा,
तिचं दर्शन घ्या! वंदन करा!
तिला रक्‍तवारुणीचा नैवेद्य चढवा.
कां की तीच तुमचं दैवत आहे...
इथून पुढे अथेन्समध्ये
स्वातंत्र्य, समता, बंधुता नांदेल.
अथेन्समधील घराघरांची धुरांडी
अहोरात्र सुवर्णाचा धूर ओकतील...
म्हणा, अथेन्सचा विजय असो!
देवी अथिनाचा जयजयकार असो!’’

देवी अथिना! देवी अथिना!!
प्रजा सुखस्वप्नांत गढली.
सडकेवर भिकारी उरला नाही.
सोहळ्याविना रात्र सरली नाही.
वारुणीचे नद वाहिले...
जल्लोषाचे चित्कार उठले....
सोहळ्याविना रात्र न सरली,
जयघोषाविना दिन न ढळला...
सावकार झाले सहृदय, आणि
बोथटले पहारेकऱ्यांचे पहारे.
विरोधकांच्या हाती साखळदंड,
आणि नरड्यात शेंदूर आला...
देवी अथिनाच्या भजनी
सारे रममाण की हो झाले!
पण-
कालांतराने कुजबूज वाढली.
सावल्यांची सळसळ सुरू झाली.
‘‘ही देवी अथिना कुठली? छे!
हिचं नाव फाये... परवापर्यंत
घरांगणात कपडे पिळत असे...
प्रसाधनाने कोणी देवी होते?
पेसिस्ट्राटस खोटारडा आहे,
सपशेल खोटारडा..!’’

कुजबुजीनं हलकल्लोळाचे
घेतले जगड्‌व्याळ रूप...
पेसिस्ट्राटसच्या महालाच्या
भिंतींचे निखळू लागले चिरे...
आणि एक दिवस-
पेसिस्ट्राटसच्या राज्याच्या वेशीवर
उभा राहिला आणखी एक योद्धा!

तात्पर्य : क्रांतीची बीजे नेहमीच
सामान्यांच्या कुजबुजीत असतात.

(महाकवी होमरच्या ‘ओडिसी’ ह्या
ग्रीक महाकाव्यातील उपकथेवर आधारित)

Web Title: editorial dhing tang british nandi article