कालचा दिवस आमचा (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी 
सोमवार, 2 एप्रिल 2018

दाराची घंटी वाजली. उघडले. समोर पोष्टमनकाका घाम पुसत उभे होते. त्यांनी मान वर न करता आमचे नाव पुकारले. आम्ही "ओ' दिली. "सही कराऽऽ' असे त्यांनी फर्मावले. आम्ही हातात टपाल घेतले. उत्सुकतेने उघडले. आम्हाला कोण हल्ली असली पत्रेबित्रे पाठवते? कागद उघडला... 

दाराची घंटी वाजली. उघडले. समोर पोष्टमनकाका घाम पुसत उभे होते. त्यांनी मान वर न करता आमचे नाव पुकारले. आम्ही "ओ' दिली. "सही कराऽऽ' असे त्यांनी फर्मावले. आम्ही हातात टपाल घेतले. उत्सुकतेने उघडले. आम्हाला कोण हल्ली असली पत्रेबित्रे पाठवते? कागद उघडला... 

"प्रिय, आधी कबूल केल्याप्रमाणे दिनांक 01-04-2018 रोजी आपल्या बचत खात्यात रु. 15,00,000 फक्‍त जमा करण्यात आले आहेत. सदरील रक्‍कम अदा करणेत दफ्तरदिरंगाई झाली, ह्याबद्दल क्षमस्व. तथापि, वरील रकमेवरील तीन वर्षांचे व्याज द.सा. 12 टक्‍क्‍यांनी लौकरच भरणा केले जाईल, ह्याची हमी येथे देणेत येत आहे. कृपया नोंद घ्यावी व पोचपावती द्यावी. आपला. नमोजी. दिल्ली सरकार, नवी दिल्ली, ल्यूटन...'' 

...अगं बाबौ! आमचा आमच्या डोळ्यांवर विश्‍वास बसेना. खरेच कां हे घडते आहे? खरेच का आम्हाला पंधरा लाख रुपये मिळाले? खरेच का अच्छे दिन आले? छे, छे !! हे स्वप्नच असणार. हल्ली अपचनाचा त्रास फार वाढला आहे. मागल्या खेपेला आमच्या स्वप्नात कायम मधुबाला नटी मोरावर बसून यायची !! डागतरांनी तेव्हा जंताचे औषध दिले होते. मग ती स्वप्ने थांबली. असो. 

आत्ताही आम्ही स्वत:स चिमटा घेऊन पाहिला...आम्ही चमकून इकडे तिकडे पाहिले. चाळीत महाप्रचंड किंकाळी घुमली होती. ती आमचीच होती. हात्तिच्या !! म्हंजे हे स्वप्न नव्हते तर... ओहो ! 

दारात पोष्टमनकाका उभेच होते. आता त्यांनी खिश्‍यातून टुवाल काढून मानेवरचा घाम जोराजोरात पुसला. ""चला, लौकर साहेब...' ते पुटपुटले. हल्ली आम्हाला कोण साहेबबिहेब म्हणतो? 

आमचे मध्यमवर्गीय मन आभाळात उडूं-फडफडूं लागले. पण हा कागद खोटा असला तर? पण हातात तर सरकारी सहीशिक्‍क्‍याचा आफिशियल कागद होता. 

"साहेब, लौकर आटपा... सही करा आणि निघू द्या आम्हाला. अजून खूप लोकांना पत्र द्यायचीत !'' स्पीडपोष्टाची डाक घेऊन दाराशी उभे असलेले पोष्टमनकाका गंभीरपणाने म्हणाले. "पंध्रा पंध्रा लाख आणून हातात दिले, तरी मान्सं भर दुपारी पाणीसुद्धा विचारत नाहीत' असे पोष्टमनकाका स्वत:शीच पुटपुटले. आम्हाला विलक्षण आप्राधी वाटले. काय हे आपले वागणे अं? साधी माणुसकी नाही, अं? चार पैसे गाठीला आले की माणसाने इतके माजुर्डे व्हावे, अं? 

...लगबगीने आत जाऊन आम्ही माठातील पाणी आणून पोष्टमनकाकांना दिले. वर "थॅंक्‍यू हं' म्हटले. पाणी पिऊन समाधानाने पिकलेली मिशी पुसत त्यांनी "एंजॉय' असा तोंडभरून आशीर्वाद दिल्यागत हात उंचावला आणि ते पाठमोरे होऊन चालू लागले.

"हो ओ ओ हो...हो ओऽ हो...संदेसे आते है...'' ह्या बॉर्डरगीताची भावभरी धून आमच्या मनात रुंजी घालून डोळ्यांच्या कडा ओलावून गेली. सारांश, सरकारी कागद खरा होता... 

हा फ्रॉड तर नव्हे? हल्ली फ्रॉड फार बाहेर येऊ लागले आहेत. ब्यांकेत लाखालाखांचे फ्रॉड करून परदेशाचे विमान पकडण्याची जणू चढाओढ लागली आहे. तशा टाइपचा हा फ्रॉड नसेल ना? की कोणीतरी हा चावटपणा केला असेल? मन काळजीने काळवंडले. पण थोडा वेळच... 

असला भलता चावटपणा कुणी वर्षानुवर्षे थोडीच करते? फ्रॉड करणारा इसम पत्र पाठवून काय साधेल? अशा सकारात्मक विचारांना भराभरा (मनातल्या मनातच) अंकुर फुटले. कोणाकडेही हात न पसरता आयुष्यात पहिल्यांदा पैसे भेटले !! भले शाब्बास !! अच्छे दिन म्हंटात ते हेच नाही तर काय? मन शांत झाले. ही गोष्ट कुण्णाशीही बोलायची नाही, असे (मनोमनच) ठरवले, आणि आम्ही पुढील निवडणुकीसाठी सज्ज झालो... 

...आम्हाला जसे पत्र आले तसे काल तुम्हालाही आले का? 

Web Title: esakal editorial dhing tang article