Wild-Animal
Wild-Animal

पर्यावरण : वन्यजीव तस्करीचे संकट

चेन्नईच्या विमानतळावर या वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये सीमा शुल्क विभागाचे अधिकारी बॅंकॉकवरून आलेल्या प्रवाशांच्या सामानाची तपासणी करत होते. त्याच वेळी सामानातून कसला तरी आवाज येत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यापैकी एका बॅगेत बिबट्याचं एक छोटं पिल्लू होतं. अर्थात, अशा प्रकारे वन्यजीव तस्करी पकडण्याची ही नक्कीच पहिली घटना नव्हती.

यापूर्वीही अनेकदा अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. वन्यजीव तस्करी ही आपल्या देशापुरती मर्यादित नाही. पण, गेल्या काही वर्षांपासून आपल्या देशात वन्यजीव तस्करीच्या घटना वाढल्याचं निरीक्षण संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात ठळकपणे नोंदलं आहे. चीन व आग्नेय आशिया ही वन्यजीव तस्करीची मुख्य बाजारपेठ आहे. नेपाळ, बांगलादेश, भूतान, श्रीलंका, म्यानमार या देशांतही याची पाळंमुळं पोचली आहेत, याचं भान ठेवलं पाहिजे. वाघ, बिबट्या, गेंडा, हत्ती अशा वन्यप्राण्यांबरोबरच मुंगूस, साप, कासव, हरीण, अस्वल या आणि अशा प्राण्यांची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याचं दिसून आलं आहे. बिबट्याची कातडी, त्यांची हाडं व शरीराचे इतर भाग, गेंड्याची शिंगं, हस्तिदंत, कासव, समुद्री घोडे, सापाचे विष यांची तस्करी केली जाते. मुंगूस केस, सापाची कातडी, कस्तुरी हरीण कस्तुरी, अस्वल अशी अमूल्य वन्यजीव संपत्ती भारतात आहे. त्यांच्या सुरक्षिततेवर अधिक भर देणं, ही आता काळाची गरज ठरत आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्यातला धोकाही वाढतोय
अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर अमली पदार्थांच्या तस्करीची एक-एक धक्कादायक माहिती पुढं येत आहे. त्या पार्श्वभूमीवर वन्यप्राण्यांची तस्करी ही समस्यादेखील राज्यात गंभीर स्वरूप धारण करत असल्याचं स्पष्ट दिसतं. कमी वेळेत जास्त पैसा कमवण्याचं साधन म्हणून याकडं पाहिलं जातं. त्यामुळे अनेक तरुण मुलं या जाळ्यात अडकली जातात. विशेषतः राज्यातील पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोकणात वन्यजीव तस्करीचे गुन्हे सातत्यानं समोर येत आहेत. वन्यजीव तस्करीचे गुन्हे आज नव्यानं नोंदले जात आहेत, असं मुळीच नाही. पण, त्याचे वाढते प्रमाण हे काळजीचं मुख्य कारण आहेच; त्याचबरोबर ज्या अमानुष पद्धतीनं वन्यजीवांची शिकार केली जाते, ते जास्त भयंकर आहे. त्यामुळे वन्यजीव तस्करीकडे नव्या दृष्टीनं पुन्हा एकदा संवेदशीलतेनं पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोकणातून प्रामुख्यानं खवले मांजर, मांडूळ, कासव आणि बिबटे यांच्या तस्करीचे गुन्हे नोंदले गेले आहेत. इतकेच नाही तर, याव्यतिरिक्त तितर, पोपट, वेगवेगळ्या आकर्षक परदेशी पक्ष्यांबरोबरच चंदन, बांबूसारख्या विविध वनस्पतींचीदेखील मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते. 

सह्याद्री ही महाराष्ट्राची प्राचीन ओळख आहे. महाराष्ट्राचा मानबिंदू आहे. सह्याद्रीच्या विस्तीर्ण पर्वतरांगांमधील पश्‍चिम घाट हा जैवविविधतेचा हॉटस्पॉट मानला जातो. अनेकविध वन्यप्राण्यांचा हा अधिवास आहे. तिथंही आता तस्करांचा शिरकाव झाला आहे. सजावट, औषधनिर्माण, खाण्यासाठी प्राण्यांची तस्करी होते. स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून याची मागणी असते. वन्यजीवांच्या संरक्षणासाठी आणि भविष्यातील पिढीला वन्यजीव संपत्ती हस्तांतरित करण्यासाठी ही तस्करी थांबविण्यासाठी तातडीनं ठोस पावलं उचलली पाहिजेत. त्यासाठी वन विभाग, पोलिस, वन्यजीव प्रेमी, पर्यावरणावर काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था यांनी एकत्रित काम करण्याची गरज आहे. तस्करीच्या या घटना वेळेतच न रोखल्यास नजीकच्या भविष्यात वन आणि वन्यजीव हा पर्यावरणातील अत्यंत संवेदनशील घटक म्हणून पुढे येईल. ही वेळ येऊ नये, यासाठी आत्तापासून नियोजनबद्ध पावलं टाकणं, हाच शहाणपणा ठरेल.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com