हवामानबदल : अन्नान्न-दिशा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Environment

अन्न म्हणजे पूर्णब्रह्म. पण, हवामानबदलाचे अतिघातक परिणाम त्याच्यावर उत्पादक ते उपभोक्ता ह्या साखळीतल्या प्रत्येक पायरीवर होतात. हवामानबदलामुळे उद्‌भवणारे दुष्काळ, पूर, उष्णतेच्या लाटा आणि खराब हवेशी इतर तीव्र अरिष्टे अन्नाची उत्पादकता आणि मातीचे आरोग्य बिघडवतात. परिणामी अन्नटंचाई. त्यामुळे होणारी महागाई.

हवामानबदल : अन्नान्न-दिशा!

अन्न म्हणजे पूर्णब्रह्म. पण, हवामानबदलाचे अतिघातक परिणाम त्याच्यावर उत्पादक ते उपभोक्ता ह्या साखळीतल्या प्रत्येक पायरीवर होतात. हवामानबदलामुळे उद्‌भवणारे दुष्काळ, पूर, उष्णतेच्या लाटा आणि खराब हवेशी इतर तीव्र अरिष्टे अन्नाची उत्पादकता आणि मातीचे आरोग्य बिघडवतात. परिणामी अन्नटंचाई. त्यामुळे होणारी महागाई. त्यामुळे उत्पादकांचे खालावलेले जीवनमान, ग्राहकांची कमी होणारी क्रयशक्ती आणि अन्न आणि त्याची प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना वाईट दिवस, असे हे चक्र सुरू होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अन्नटंचाईचे परिणाम अत्यंत विषमतेने सर्वहारा वर्गाला सर्वाधिक सोसावे लागतात. जागतिक बॅंकेच्या अंदाजानुसार २१००पर्यंत मक्‍याचे उत्पादन २० ते ४५ टक्‍यांनी, गव्हाचे पाच ते ५० टक्‍क्‍यांनी आणि भाताचे २० ते ३० टक्‍क्‍यांनी कमी होईल. भरीस भर म्हणून की काय, आपल्याकडच्या डाळींची, भाताची, गव्हाची उत्पादकताही जगाच्या मानाने कमी आहे.आजमितीला आपण सुमारे १०.६१ कोटी टन भात ४.४ कोटी हेक्‍टर जमिनीतून पिकवतो. म्हणजे २.४ टन प्रति हेक्‍टर. भात पिकवणाऱ्या ४७ राष्ट्रांमध्ये त्यामुळेच आपण २७व्या क्रमांकावर आहोत. (चीन ४.७ टन/हेक्‍टर, ब्राझील ३.६ हेक्‍टर). हीच आकडेवारी गहू उत्पादनात जरा बरी आहे. आपण प्रति हेक्‍टर ३.१५ टन, ४१ देशांमध्ये १९वा क्रमांक.(चीन ४.९ टन प्रति हेक्‍टर, ब्राझील ३.६ टन प्रति हेक्‍टर)

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पर्यायी पिके कोणती?
कील डेविस, अश्विनी छत्रे इत्यादींनी नुकत्याच केलेल्या संशोधनात आढळले, की हवामानबदलात चिवटपणे तगणारी, उत्पादकतेवर कमी परिणाम होऊ देणारी भारतीय पिके म्हणजे ज्वारी, बाजरी आणि मका. सर्वाधिक परिणाम भातावर होतो. अनेक वर्षांच्या आकडेवारीला अनेक गुंतागुंतीचे निकष लावून त्यांनी हे संशोधन पार पाडले आहे. ह्या पिकांखाली असलेली जमीन वाढवली तर बदलत्या हवामानामुळे आपल्या पीक उत्पादनातील हेलकावे कमी होतील; शेतीआधारित हरितगृह वायू उत्सर्जनेही कमी होतील. ह्या पिकांना पाणी आणि ऊर्जा कमी लागते; २०५० पर्यंत १.६ अब्ज होणाऱ्या आपल्या लोकसंख्येच्या पोषणाचा प्रश्नही काहीसा आटोक्‍यात यायला मदत होईल, असे त्यांचे प्रतिपादन आहे. त्यासाठी अन्य एका संशोधनानुसार आपल्या अन्न उत्पादन आणि साठवणव्यवस्था बदलाव्या लागतील. ह्यात खते कमी वापरणे आणि वाया जाणाऱ्या धान्याचे व्यवस्थापन येते.

लोकांच्या वर्तनांत त्यांनी महत्त्वाचा बदल सुचवला आहे; तो म्हणजे अधिकाधिक अन्न वनस्पतीयुक्त असणे.कारण, मांसाधारित अन्न जास्त खाल्ले गेले, की माणूस आणि पशू दोघांनाही धान्य पुरवावे लागते. त्यामुळे जंगलतोड वाढते. अंतिम परिणाम म्हणजे हरितगृह वायू उत्सर्जने वाढतात. भारतीय लोकांच्या अन्नात डाळींचे प्रमाण कमी होत चालले असून, प्रक्रिया केलेल्या अन्नाचे प्रमाण मात्र वाढते आहे, याविषयी अनेक संशोधक चिंतित आहेत.

पॅकेज/प्रोसेस केलेले अन्न हे पारंपरिक आहारपद्धतीपेक्षा खूप जास्त कचरा निर्माण करते. परिणामी, कचरा टाकण्याच्या जागा (लॅंड-फिल्स) भरून वाहू लागतात. त्यातून उत्सर्जने होतात. उत्पादित अन्नाला साठवणीत रासायनिक (जड धातू मिसळणे, कीटकनाशकांचे अंश, मायकोटॉक्‍सिन्स इत्यादी) आणि सूक्ष्मजीवशास्त्रीय (जिवाणुजन्य आणि परजीवींची वाढ) अशा दोन्ही प्रकारचे धोके असतात. साठवण शास्त्रीय पद्धतीने केल्यास हे धोके टळतात. भारत गेल्या ४०-५० वर्षांत अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण झाला आहे, हे खरेच.

सुमारे ३० कोटी टन धान्य आपण उत्पादित करतो. अतिरिक्त सात-आठ कोटी किलोचा साठाही असतो. तरीही नागरिकांनी त्यांच्याकडील उपलब्ध जागेत (बाल्कनी, गच्ची, बाग इत्यादी ठिकाणी) शक्‍य ती अन्न लागवड करावी. अन्नाचा ‘प्रवास’ जितका कमी होतो, तितकेच त्याचे कार्बन पदचिन्ह कमी होऊन हवामानातील बिघाड कमी होतो.

Edited By - Prashant Patil

Web Title: Editorial Article Write Sahntosh Shintre Climate Change

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :IndiaChina
go to top