
एमओएफचा वापरत माहिती साठविण्यासाठी, औषधांमध्ये, ऊर्जा उपकरणांमध्ये होऊ शकतो. जास्त ऊर्जा साठवू शकणाऱ्या एमओएफचा शोध घेण्याचे आव्हान असणार आहे.
सर्च-रिसर्च : सौरऊर्जाही साठविता येईल अनेक महिने
खनिज इंधनाचा वापर कमी करून स्वच्छ ऊर्जेच्या वापराचे उद्दिष्ट जगातील प्रत्येक देशाने ठरविले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा शोध घेण्यात येत आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून सौरऊर्जा साठविता येईल का, याचे प्रयत्न सुरू आहेत; त्यात काही प्रमाणात यश आले आहे.
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
ब्रिटनमधील लँकेस्टर विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी स्फटिकासारखा पदार्थ तयार करण्यात यश मिळविले आहे. या स्फटिकांमध्ये अनेक महिने सौरऊर्जा साठविता येऊ शकेल, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. विशेष म्हणजे, हे स्फटिक सर्वसाधारण तापमानाला साठवता येऊ शकतील आणि आवश्यकता भासेल तेव्हा त्यातील ऊर्जा वापरता येऊ शकेल. म्हणजेच, उन्हाळ्याच्या दिवसांत सौरऊर्जा साठवता येईल व थंडीच्या दिवसांत गरजेनुसार ती वापरता येऊ शकेल.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
रोजच्या वापरासाठी...
या ऊर्जा साठवणुकीच्या नव्या पद्धतीचा उपयोग अनेक उपकरणांमध्ये, दुर्गम भागांत किंवा घरांतही रोजच्या वापरासाठी पर्यावरणपूरक ऊर्जा मिळविण्यासाठी होऊ शकेल. एखाद्या इमारतीला या स्फटिकांचा तरल पडदा लावता येऊ शकेल किंवा मोटारीचे ‘विंडस्क्रीन’ या नव्या स्फटिकांचे तयार करता येऊ शकतील. या सगळ्यांद्वारे ऊर्जा साठविली जाऊ शकेल व कडाक्याच्या थंडीच्या काळात वापरता येईल.
हा स्फटिकासारखा पदार्थ ‘मेटल ऑरगॅनिक फ्रेमवर्क’ (एमओएफ) पासून तयार करण्यात आला आहे. यात धातूंचे आयन कार्बनच्या रेणूंनी जोडले जातात. यातून त्रिमितीय रचना तयार होते. एमओएफचे वैशिष्ट्य म्हणजे तयार झालेला पदार्थ हा सछिद्र असतो. म्हणजे त्यात इतर छोटे रेणू सामावले जाऊ शकतात. त्याचा या गुणाचा वापर करूनच त्यात ऊर्जा साठविण्याचे प्रयोग शास्त्रज्ञांनी केले आहेत. यापूर्वी जपानमधील शास्त्रज्ञांनीही एमओएफ पदार्थांवर प्रयोग केले होते. त्यांनी त्याला ‘डीएमओएफ१’ असे नाव ठेवले होते. परंतु, त्यांनी त्या पदार्थांचा वापर ऊर्जा साठवणुकीसाठी करता येईल का, याचे प्रयोग केले नव्हते. लँकेस्टर विद्यापीठातील संशोधकांनी ऊर्जा साठवणुकीच्या प्रयोगांवर भर दिला. त्यांनी एमओएफसोबत अॅझोबेन्झेन रेणूंचा संयोग घडवून आणला. अॅझोबेन्झेन हे संयुग मोठ्या प्रमाणावर प्रकाश शोषून घेते. त्याचे रेणू ‘फोटोस्वीच’प्रमाणे काम करतात. पाहिजे तेव्हा त्यातून ऊर्जा मिळवता येऊ शकते. प्रयोगाच्या वेळी शास्त्रज्ञांनी हा पदार्थ अतिनील किरणांच्या प्रकाशात ठेवला. त्यामुळे अॅझोबेन्झेनच्या रेणूंनी त्यांचा आकार बदलला. याचाच अर्थ त्यात स्थितीज ऊर्जा दीर्घकाळ सर्वसामान्य तापमानाला (रूम टेंपरेचर) साठवता येऊ शकते. जेव्हा त्याला पुन्हा उष्णता देण्यात आली, तेव्हा त्या रेणूंमधील ऊर्जा बाहेर पडली. याचा वापर इतर पदार्थ किंवा साहित्य उष्ण करण्यासाठी होऊ शकतो. किमान चार महिने अशा प्रकारे ऊर्जा साठविता येऊ शकते, असे सिद्ध झाले. याआधीही फोटोस्वीचच्या माध्यमातून ऊर्जा साठविण्याचे प्रयोग झाले होते. मात्र, बहुसंख्य प्रयोगात फोटोस्वीच हे द्रवरूपात असणे गरजेचे होते. आता एमओएफ संयुगे घनरूपात उपलब्ध झाल्याने अनेक उपकरणांमध्ये त्याचा वापर करता येणे शक्य होणार आहे.
एमओएफचा वापरत माहिती साठविण्यासाठी, औषधांमध्ये, ऊर्जा उपकरणांमध्ये होऊ शकतो. जास्त ऊर्जा साठवू शकणाऱ्या एमओएफचा शोध घेण्याचे आव्हान असणार आहे. जॉन ग्रिफिन, किरन ग्रिफिथ्स आणि नाथन हाल्कोविच यांनी केलेले हे संशोधन जर्नल केमिस्ट्री ऑफ मटेरिअल्स या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आले.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
Web Title: Search Research Article Aboout Energy Stored Crystal
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..