सर्च-रिसर्च : उजेडाचा असाही उपक्रम

डॉ. जयंत गाडगीळ
गुरुवार, 9 एप्रिल 2020

‘कोरोना’ने मोठ्या प्रमाणावर कहर केलेल्या इटलीमध्ये हजारो नागरिकांनी एक उपक्रम २४ व २५ मार्चला केला. लॉकडाउनने घरात जखडलेल्या हजारो नागरिकांना अलेस्सांद्रो फारिनी आणि लुका पेरी यांनी एका मोठ्या विज्ञान प्रयोगात सामील करून घेतले. हे दोघे, विज्ञानातील संशोधक आणि लोकांपर्यंत विज्ञान पोहोचवणारे कार्यकर्ते. त्यांनी आणि त्यांच्या संस्थांनी ‘सायन्स ऑन द बाल्कनी’ असा उपक्रम राबवला आहे. अशा अनेक उपक्रमांपैकी हा एक.

‘कोरोना’ने मोठ्या प्रमाणावर कहर केलेल्या इटलीमध्ये हजारो नागरिकांनी एक उपक्रम २४ व २५ मार्चला केला. लॉकडाउनने घरात जखडलेल्या हजारो नागरिकांना अलेस्सांद्रो फारिनी आणि लुका पेरी यांनी एका मोठ्या विज्ञान प्रयोगात सामील करून घेतले. हे दोघे, विज्ञानातील संशोधक आणि लोकांपर्यंत विज्ञान पोहोचवणारे कार्यकर्ते. त्यांनी आणि त्यांच्या संस्थांनी ‘सायन्स ऑन द बाल्कनी’ असा उपक्रम राबवला आहे. अशा अनेक उपक्रमांपैकी हा एक.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मोबाईलसाठी त्यांनी इंटरनेटवर एक ॲप ठेवले होते. ते सर्वसामान्य नागरिकांनी डाउनलोड करायचे होते. नागरिकांनी करायचे इतकेच, की विशिष्ट वेळेला घरातील दिवे बंद करून सज्जात यायचे. मोबाईलवरचे ते ॲप वापरून रस्त्यावरच्या प्रकाशाचे मापन करायचे (ल्युमिनोसिटीचे मापन) आणि ती आकडेवारी एका जागी अपलोड करायची. हे प्रकाशमानाचे मापन कसे करायचे हे समजून घेण्यासाठी २३ मार्चला सगळ्यांनी एका वेळेस ते प्रयत्न करून समजून घ्यायचे होते.

त्यानंतर २४ व २५ मार्चला ठराविक वेळेला मापन करायचे होते. सर्वसामान्य माणसांची मदत घेऊन  विज्ञानातील प्रयोगात त्यांना सहभागी करण्याचा हा एक विक्रम असावा, असे या बातमीत म्हटले आहे. बस्स एवढेच. पण त्यामुळे नेमके काय काय घडले ? पहिले म्हणजे विज्ञानातले प्रयोग करणे हे सर्वसामान्य माणसाच्या आवाक्‍यातले आहे हे दाखवून देणे. प्रयोग करण्यातला एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे मापन करणे, ते करण्याची पात्रता सहजी मिळवता येते, हे सगळ्यांना समजले. मोबाईलवरच्या सुविधा वापरून आपल्याला अनेक गोष्टी करता येतात, पण शास्त्रीय प्रयोग करता येतो, हा शोध नागरिकांना लागला. आपल्याला जे काही मोजता येते, त्यात प्रकाशाची तीव्रता मोजता येते हे कळाले.

आता, हे प्रकाशाचे मापन का करायचे, असा पुढचा प्रश्न. खगोलविज्ञानात रात्रीच्यावेळी अवकाशाचे वेध घेण्यासाठी निरीक्षण करणाऱ्या यंत्राच्या बाजूला जितका जास्त अंधार असेल तेवढे अवकाश स्पष्ट दिसते. (जसे आपल्यालासुद्धा, अनेक आवाजाच्या कोलाहलात दिवसा ऐकू न येणारे आवाज उत्तररात्री किंवा पहाटे अनेक छोटे आवाज, पक्ष्यांची किलबिल किंवा लांबवरून येणारा ट्रकचा आवाज ऐकू येतो.) अलीकडील काळात मानवी प्रगतीमुळे आणि सुविधेसाठी, व्यावसायिक वापरासाठी वगैरे मोठ्या प्रमाणावर पृथ्वीवर उजेड असतो. त्यामुळे खगोलशास्त्रात संशोधन करायला अडचणी येतात. (पुण्यातील लोकांना रात्री उल्कावर्षाव पाहायला खूप लांबवर जावे लागते, हे त्याचेच उदाहरण.)

मग येतो पुढचा प्रश्न, खगोलशास्त्रज्ञांना निरीक्षणे करता यावीत, या साध्या कारणासाठी शहरवासीयांनी अंधारात राहायचे काय?  तर त्यावरचे उत्तर किंवा प्रतिवाद करण्यासाठी पुढची माहिती. अशा वाढत्या प्रकाशामुळे आपल्या झोपेच्या दर्जावर परिणाम होऊन रोगप्रतिकारशक्ती कमी होते. फुले फुलण्याच्या निसर्गचक्रावर परिणाम होतो व पर्यावरणावरही त्याचा वाईट परिणाम होतो, ही माहिती कळाली.

तसेच कमी प्रकाश राहावा म्हणून अनावश्‍यक दिव्यांचा वापर टाळावा, असे प्रबोधनही झाले. कोणतीही माहिती संदिग्ध शब्दांत सांगून घबराट पसरवण्यापेक्षा ती आकडेवारीत मांडता आली, तिची तुलना करता आली तर वास्तव अधिक चांगले समजते. ही वैज्ञानिक तत्त्वे लोकांना कळाली. एका मोठ्या वैज्ञानिक समूहाचे आपण भाग आहोत, ही संघटितपणाची जाणीव झाली. गंमतही आली. घटकाभर ‘कोरोना’च्या भयापासून दूर जाता आले, हाही जाता जाता फायदा झाला. आपल्यापुरते बघायचे तर योग्य ती इच्छा असल्यास दिवे लावून किंवा घालवूनही अंतरीचा ज्ञानदिवा पेटता ठेवता येतोच, हेदेखील ही बातमी वाचून समजले. मात्र त्यासाठी ‘विवेकाची ठरेल ओल, ऐसे बोलावे बोल’ अशी सोहिरोबांनी सांगितलेली परंपरा आपलीशी करून घ्यावी लागेल, एवढाच काय तो मुद्दा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article jayant gadgil on light