सर्च-रिसर्च : नववा ग्रह की कृष्णविवर?

सुरेंद्र पाटसकर
Wednesday, 15 July 2020

पृथ्वीपासून सर्वांत जवळचे कृषणविवर एक हजार प्रकाशवर्ष अंतरावर आहे. परंतु, एखादे कृष्णविवर आपल्या अगदी जवळ असू शकेल का? आपल्या सूर्यमालेच्या शेवजी एक कृष्णविवर असू शकेल, असा सिद्धांत काही शास्त्रज्ञांनी मांडला आहे. येत्या काही वर्षांत प्रत्यक्षात त्याचे निरीक्षण करता येऊ शकेल, असा विश्वास शास्त्रज्ञांना वाटतो.

पृथ्वीपासून सर्वांत जवळचे कृषणविवर एक हजार प्रकाशवर्ष अंतरावर आहे. परंतु, एखादे कृष्णविवर आपल्या अगदी जवळ असू शकेल का? आपल्या सूर्यमालेच्या शेवजी एक कृष्णविवर असू शकेल, असा सिद्धांत काही शास्त्रज्ञांनी मांडला आहे. येत्या काही वर्षांत प्रत्यक्षात त्याचे निरीक्षण करता येऊ शकेल, असा विश्वास शास्त्रज्ञांना वाटतो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आपली सूर्यमाला वेगवेगळ्या चित्रविचित्र गोष्टींनी भरलेली आहे. सूर्यमालेबद्दलचे संशोधन जसजसे होत आहे, तसतसे त्यांची माहिती आपल्याला होत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आपली सूर्यमाला अधिक चांगल्या पद्धतीने कळण्यास सुरवात झाली आहे. कुईपर बेल्टमध्ये असलेल्या अनेक लघुग्रहांची माहिती नव्याने होत आहे. गॉबलिन नावाचा नवा बटू ग्रहही आपल्याला सूर्यमालेच्या टोकाला आढळून आला आहे. फारआऊट नावाचा आणखी एक लघुग्रह दोन वर्षांपूर्वीच आढळला आहे. नव्याने सापडलेले हे सर्व लघुग्रह आकाराने अत्यंत छोटे आहेत. या लघुग्रहांच्या पलीकडे अवकाशातील अंधारात मोठा ग्रह अस्तित्वात आहे का? कदाचित तो नववा ग्रह असू शकतो, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. या ग्रहाचे वस्तुमान पाच ते दहा पृथ्वींएवढे असू शकते, असे शास्त्रज्ञांना वाटते. पण कदाचित हा नववा ग्रह नसेलही कदाचित. काही शास्त्रज्ञांच्या मते ते एक छोटे कृष्णविवर असावे. हारवर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी हे अंदाज वर्तविले आहेत. 

कृष्णविवराकडे सर्व वस्तू खेचल्या जातात, प्रकाशही तेथून परावर्तीत होत नाही. ज्या भागात कृष्णविवर असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे, त्या भागाची निरीक्षणे केल्यानंतर त्याबाबत काही सांगता येऊ शकेल. अनेकदा त्या भागातून एखादा धूमकेतू गेल्यानंतर निरीक्षणे घेणे सोपे होऊ शकते, असे या प्रकल्पात काम करणारे अमिर सिराज यांनी म्हटले आहे. व्हेरा सी. रुबीन प्रयोगशाळा पुढील काही महिने आठव्या ग्रहापलीकडील भागाची छायाचित्रे घेणार आहे. ‘लिगसी सर्व्हे ऑफ स्पेस अँड टाइम’ असे या प्रकल्पाचे नाव आहे. या प्रकल्पाद्वारे पुढील दहा वर्षांत विविध खगोलीय घटकांची निरीक्षणे नोंदविली जाणार आहेत. सुमारे ४० हजार नवे खगोलीय घटक या प्रकल्पाद्वारे शोधले जातील, असा अंदाज आहे. त्यातून सूर्यमालेच्या शेवटी नववा ग्रह आहे की कृष्णविवर हे स्पष्ट होऊ शकणार आहे. 

स्टीफन हॉकिंग यांच्यासारख्या काही शास्त्रज्ञांनी महास्फोटानंतर अनेक प्रामोर्डिअल ब्लॅक होल निर्माण झाल्याचा सिद्धांत मांडला आहे. त्यांचा आकार एखाद्या छोट्या चेंडूएवढा असेल, मात्र त्यांचे वस्तूमान काही पृथ्वींएवढे असू शकते, असे त्यांचे म्हणणे आहे. ‘लिगसी सर्व्हे ऑफ स्पेस अँड टाइम’ या प्रकल्पाद्वारे प्रामोर्डिअल ब्लॅक होल शोधण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे. कदाचित आपल्याच सूर्यमालेत त्यांचे अस्तित्व दिसून येऊ शकेल. व्हेरा रुबीन प्रयोगशाळेची बंधी सध्या चिलीमध्ये सुरू आहे. या वर्षअखेरीस ती कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. त्यानंतर २०२३पर्यंत ‘लिगसी सर्व्हे ऑफ स्पेस अँड टाइम’प्रकल्पाद्वारे निरीक्षणे घेतली जाणार आहेत. एखादे कृष्णविवर अथवा नववा ग्रह असल्याचे पुरावे त्यातून आपल्याला मिळू शकतील.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article surendra pataskar on Ninth planet krushnavivar