पर्यावरण : कोई ताजा हवा चली है अभी...

दिल्लीतील हवा प्रदूषणाची तीव्रता दर्शवणारे संग्रहित छायाचित्र.
दिल्लीतील हवा प्रदूषणाची तीव्रता दर्शवणारे संग्रहित छायाचित्र.

बेसुमार वेगाने वाढणाऱ्या प्रदूषणाचे थेट आपल्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम आपण रोज उघड्या डोळ्यांनी बघत आहोत. वाढलेला दमा असो, उच्चप्रतीची प्रतिजैविके वापरूनही बरा न होणारा न्यूमोनिया असो, की फुफ्फुसाच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण या आणि अशा प्रत्येक असाध्य आजाराचे मूळ हवेच्या प्रदूषणात असल्याचे एव्हाना विज्ञानाने सप्रमाण सिद्ध केलेय. केवळ जिवंत माणसांवरच नाही, तर जन्माला येणाऱ्या पुढील पिढीवरही हवेतील विषारी वायूंमुळे एकप्रकारे विषप्रयोग सुरू झाला असल्याचे संशोधन वैद्यकीय नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले आहे. शुद्ध हवा हा आता मूलभूत मानवी अधिकार व्हावा, अशी मागणी पर्यावरण क्षेत्रातील स्वयंसेवी संस्थांनी केली आहे. हवेच्या गुणवत्तेची स्थिती किती बिघडत चालली आहे, हेच यावरून अधोरेखित होते.

मुंबई, दिल्ली, कोलकता, चेन्नई या महानगरांमधूनच नाही, तर पुणे, नागपूर, इंदूर, हैदराबाद, जयपूर, लखनौ अशा शहरांमध्ये रोज लाखोंच्या संख्येने वाहने रस्त्यांवर येतात. त्यांच्या धुरातून विषारी घटक बाहेर पडतात. यातून शहरांमधील हवेची गुणवत्ता घसरते. त्यातून फक्त मानवच नाही, तर प्रत्येक सजीव अडचणीत येत आहे.

हे प्रदूषण कमी करण्याचे प्रयत्न वेळोवेळी झाले. कधी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला चालना देऊन, कधी ‘बीआरटी’सारखा प्रयोग करून, कधी स्कायबस, मोने रेल, मेट्रो अशा पर्यायी व्यवस्थेची शृंखला विकसित करून प्रदूषणाची पातळी कमी होईल, असा विश्वास वाटत होता. पण, या सर्व प्रयत्नांचा ‘लसावि’ फारसा समाधानकारक दिसत नाही. ‘मेट्रोनंतर दिल्लीतील प्रदूषणाची पातळी नेमकी किती कमी झाली,’ या स्वयंसेवी संस्थांनी विचारलेल्या प्रश्नावर आजही ठोस उत्तर मिळत नाही. आता इलेक्‍ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याची भूमिका सरकारने घेतली आहे. ‘फेम १’ (फास्टर ॲडॉप्शन ॲन्ड मॅन्युफॅक्‍चरिंग ऑफ हायब्रीड ॲन्ड इलेक्‍ट्रिक व्हेईकल) आणि ‘फेम २’ या माध्यमातून इलेक्‍ट्रिक बस रस्त्यावर आणण्यास स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्राधान्य दिले आहे. त्याच्या पहिल्या टप्प्यात केंद्र सरकारने पुणे आणि मुंबई महापालिकांना प्रत्येकी दहा इलेक्‍ट्रिक बस दिल्या आहेत. अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर एकाच वेळी प्रदूषण कमी करण्याचे प्रयोग सुरू असल्याचे दिसते. याचे यशापयश सध्यातरी कोणतेही मापदंड लावून मोजता येत नाही.

तरीही, हवेच्या प्रदूषणाची पातळी फारशी कमी झाल्याचे रोज जाहीर होणाऱ्या विषारी वायूंच्या आकड्यावरून दिसत नाही. मात्र, देशभर पाळल्या गेलेल्या अलीकडील ‘जनता कर्फ्यू’नंतर प्रदूषणाची पातळी झपाट्याने कमी झाल्याचे दिसून येते. फक्त शहरांमधूनच नाही, तर अतिप्रदूषित महानगरांमधील प्रदूषणाची पातळी कमी झाल्याचे स्पष्ट दिसते. भारतीय उष्णकटिबंधीय हवामान संस्थेतर्फे (आयआयटीएम) ‘सफर’ (सिस्टिम ऑफ एअर क्वॉलिटी ॲन्ड वेदर फोरकास्ट ॲन्ड रिसर्च) प्रकल्पातून मुंबई, दिल्ली, पुणे आणि अहमदाबाद या शहरांतील हवेची गुणवत्ता नियमितपणे मोजली जाते. त्याचे निष्कर्षही हेच सांगतात.

‘कोरोना’च्या उद्रेकामुळे देश सध्या लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे रस्त्यांवर, महामार्गांवर येणाऱ्या वाहनांचे प्रमाण कमी झाले आहे, रेल्वेगाड्या यार्डात थांबल्या आहेत, तर विमानांची उड्डाणे बंद आहेत. थोडक्‍यात हवा प्रदूषणाचे सर्वच मार्ग बंद झाले आहेत. शहरांच्या गजबजलेल्या ठिकाणी इतर वेळी फक्त वाहनांचे, त्यांच्या हॉर्नचे कर्णकर्कश्‍श आवाज कानावर पडत होते, तेथे पक्ष्यांचा किलबिलाटही असतो, याची जाणीव यामुळे झाली. जेथून नाकावर रुमाल बांधल्याशिवाय शरीरात जाणारा कार्बन कमी होत नाही, अशा ठिकाणी रात्री रातराणीचा सुगंध दरवरळत असतो, हेही लॉकडाऊनच्या निमित्ताने कळाले. हे आपण अशा प्रसंगी करू शकतो, तर इतर वेळीही निश्‍चितच करू शकतो. पण त्यासाठी गरज आहे इच्छाशक्तीची.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com