सर्च-रिसर्च : डासानेच डेंगी रोखावा!

राहुल गोखले
Saturday, 19 September 2020

डेंगीची साथ भारताला आणि जगाला नवीन नाही.जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार दरवर्षी जगभरात सुमारे३९कोटी लोकांना डेंगीची लागण होते आणि एकट्या भारतात गेल्या वर्षी दीड लाख लोकांना डेंगीने गाठले होते.

डेंगीची साथ भारताला आणि जगाला नवीन नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार दरवर्षी जगभरात सुमारे ३९ कोटी लोकांना डेंगीची लागण होते आणि एकट्या भारतात गेल्या वर्षी दीड लाख लोकांना डेंगीने गाठले होते. डासांमुळे डेंगी पसरतो हे सर्वश्रुत आहे आणि डासांची उत्पत्ती होऊ न देणे हा त्यावरील उपाय मानला जातो. मात्र काही संशोधकांनी यावर वेगळा उपाय सुचविला आहे. संशोधकांनी काही डासांच्या शरीरात विशिष्ट जिवाणू सोडला आणि त्या डासांना इंडोनेशियातील एका गावात सोडले. वस्तुतः हेही डासच. मात्र त्या डासांनी काय कमाल केली याचे निष्कर्ष नुकतेच जाहीर करण्यात आले.

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

यामागे असणारे संशोधन उल्लेखनीय आहे. वोलबेकिया नावाचे जिवाणू हे या अभ्यासाच्या केंद्रस्थानी होते जे अनेक प्रकारच्या किटकांमध्ये नैसर्गिकरीत्या आढळतात. डासदेखील त्याला अपवाद नसले, तरीही एडिस इजिप्ती नावाच्या प्रजातीचे डास जे चिकनगुनिया किंवा डेंगीच्या साथीला कारणीभूत असतात त्यांमध्ये मात्र हे जिवाणू नैसर्गिकरीत्या आढळत नाहीत. २००८ मध्ये ऑस्ट्रेलियामधील काही संशोधकांनी असे सिद्ध केले होते, की एडिस इजिप्ती प्रजातीच्या डासांमध्ये वोलबेकिया हा जिवाणू असेल तर ते डेंगी पसरवू शकत नाहीत. याचे कारण डेंगी विषाणू या जिवाणूच्या उपस्थितीत डासाच्या शरीरात पुनरुत्पादन सहजासहजी करू शकत नाही. या प्रयोगाचे प्रत्यक्ष परिणाम काय आहेत याचा वेध घेण्यासाठी संशोधकांनी इंडोनेशियातील एका गावाची निवड केली आणि त्याची विभागणी चोवीस क्षेत्रांमध्ये केली. वोलबेकिया जिवाणू सोडलेले डास संशोधकांनी त्यापैकी बारा क्षेत्रांमध्ये सोडले. यामागील तर्क असा होता की जिवाणूग्रस्त डासांचा त्या त्या परिसरातील असे जिवाणू नसलेल्या डासांशी संकर होऊन जे पुनरुत्पादन होईल त्यात कालांतराने अशा पिढ्या निर्माण होतील ज्यांच्यात नैसर्गिकरीत्या हा जिवाणू असेल. कालांतराने अशी अवस्था येईल जेव्हा डासांच्या संख्येच्या मोठा भाग हा अशा जिवाणू असलेल्या डासांचा असेल. ज्या बारा क्षेत्रांत असे डास सोडण्यात आले होते आणि ज्या बारा क्षेत्रांत असे डास सोडण्यात आलेले नव्हते, तेथील डेंगी प्रकरणांचा तौलनिक अभ्यास करण्यात आला. दोन्ही गटांत नेहमीचे डेंगी प्रतिबंधक उपायही योजण्यात आले होतेच. सुमारे २७ महिने हा प्रयोग आणि निरीक्षण चालू ठेवण्यात आले. प्रयोग करण्यात येणाऱ्या क्षेत्रांची एकूण लोकसंख्या सुमारे सव्वा तीन लाख होती. प्रयोगांती असे सिद्ध झाले की ज्या क्षेत्रांत वोलबेकिया-संसर्गित डास सोडण्यात आलेले नव्हते, त्या तुलनेत ज्या क्षेत्रांत ते सोडण्यात आले होते तेथे डेंगीचे प्रमाण तब्बल ७७ टक्‍क्‍यांनी कमी होते. याचाच अर्थ जो तर्क केला होता तो खरा ठरला की कालांतराने त्या परिसरातील सर्वच डासांच्या पिढ्यांमध्ये नैसर्गिकरीत्या वोलबेकिया जिवाणू आढळेल आणि असा डास माणसाला चावला तरी तो डेंगी पसरवू शकणार नाही.

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

इंडोनेशियात केलेल्या प्रयोगांमध्ये डेंगीसदृश लक्षणे आढळणाऱ्यांवरही बारीक लक्ष ठेवण्यात आले. आठ हजारांवर रुग्ण यात होते आणि ते कुठे राहतात, त्यांनी कुठे प्रवास केला होता काय आणि ते डेंगी-पॉझिटिव्ह आहेत काय इत्यादी माहिती गोळा करण्यात आली. डेंगीचे प्रमाण ७७ टक्‍क्‍यांनी कमी झाल्याचा जो निष्कर्ष काढण्यात आला तो निश्‍चितच उत्साहवर्धक होता. जे एका गावात झाले त्याची पुनरावृत्ती अन्य देशांमध्ये आणि शहरांमध्ये झाली तर जगाला डेंगीपासून मुक्ती मिळण्यास मोठी गती मिळेल, असे कॅलिफोर्निया-बर्कले विद्यापीठातील संशोधक निकोलस ज्वेल यांनी म्हटले आहे. डेंगीला आटोक्‍यात आणण्यासाठी अनेक उपाय केले जातात. वास्तविक डासामुळे डेंगी पसरतो. परंतु काट्याने काटा काढावा या धर्तीवर ज्या डासामुळे डेंगी होतो त्या डासानेच डेंगी रोखावा असा हा अभिनव उपाय आहे असेच म्हटले पाहिजे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: search research article about Dengue