सर्च-रिसर्च : स्टोनहेंजचे गूढ उलगडले !

stone
stone

विज्ञान-तंत्रज्ञानाचा उपयोग इतिहास संशोधनासाठीही होतो. त्याची उदाहरणेही देता येईल. इंग्लंडच्या विल्टशायरमधील स्टोनहेंज हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. ते निओलिथिक (नवपाषाण) युगातील एक स्थान आहे. ‘युनेस्को’ने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्टोनहेंजचा समावेश केलाय. येथे लाखो पर्यटक दरवर्षी भेट देतात. आकाराने अजस्र आणि वजनाने अत्यंत जड असलेले पत्थर येथे विशिष्ट पद्धतीने उभारलेले आहेत. त्यांची गोलाकार मांडणी गूढ असून, ती पूर्वनियोजित पद्धतीने केलेली आहे. स्टोनहेंजची उभारणी दीड हजार वर्षांमध्ये टप्याटप्यांत झाली आहे. ही एक दफनभूमी आहे, तसेच एक पवित्रस्थान आहे. या स्थळामध्ये काहीतरी रहस्य आहे. ते उलगडण्याचा प्रयत्न पुरातत्त्व संशोधक करीत आहेत. हे प्राचीन अवशेष चार ते पाच हजार वर्षांपूर्वीचे आहेत. या विलक्षण अवशेषांचे संशोधन करणे गुंतागुंतीचे असल्यामुळे हा विषय आंतरविद्याशाखीय झालाय.

 स्टोनहेंजच्या मैदानात बहुतांशी वालुकाश्‍म आहेत. अवशेषांमध्ये दोन प्रकारच्या शिळा आहेत. मोठे दगड (सरसेन्स) सुमारे २५ टन वजनाचे आहेत. काही दगडांची उंची ८ ते १३ मीटर आणि व्यास १० मीटर आहे. त्याहून लहान असलेले दगड (ब्ल्यू स्टोन) २ ते ५ टनांचे आहेत. ते ओलसर झाले की त्यांच्यावर निळसर झाक येते. हे दगड तीस ते सव्वादोनशे कि. मी. अंतरावरील वेल्स भागातून आणले असावेत. इतके जड दगड नियोजित जागी हिमनगांचा वापर करून जलमार्गाने आणले असावेत. विल्यम स्ट्युक्‍ली या इंग्लिश संशोधकाने स्टोनहेंजचे डिझाईन खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी योजले आहे, असे सांगितले होते. खगोलशास्त्रज्ञ जेराल्ड हॉकिन्सने १९६३ मध्ये ग्रहणांचे दिवस निश्‍चित करण्यासाठी स्टोनहेंजचे प्रयोजन असावे असे म्हटले होते. त्यादृष्टीने बांधकामाच्या रचनेचे संशोधन केले गेले आणि त्याचा संबंध ग्रह-तारे यांच्याशी येतो का, हे तपासले गेले. तसे आढळले नाही. मात्र वर्षातील आयन (सूर्याच्या दक्षिणायन आणि उत्तरायण) दिनांशी स्टोनहेंजच्या शिळांचा संबंध आहे. वर्षातील सर्वात मोठा दिवस २२ जून आणि सर्वात लहान दिवस २२डिसेंबर. स्टोनहेंज येथे २२ जून रोजी विशिष्ट दगडामागून सूर्योदय होतो. तसेच २२ डिसेंबर रोजी विशिष्ट उंच दगडामागून सूर्यास्त होतो. या दोन्ही दिवशी संशोधक स्टोनहेंजसंबंधीच्या शोधनिबंधांचे सादरीकरण करतात. दगडी अवशेषांपासून तीन कि.मी. अंतरावरील जागी दोन कि.मी. व्यासाच्या वर्तुळावर गोल खड्डे आहेत. ते खणण्यासाठी हरणांच्या शिंगांचा वापर करण्यात आला.  स्टोनहेंज आणि परिसरात दहा हजार वर्षांमधील मानवाची संस्कृती आणि वाटचाल दिसून येते. त्याचे संशोधन करताना सुदूर संवेदन, मेटल डिटेक्‍टर, त्रिमिती लेसर, मॅग्नेटोमीटर, कार्बन-१४ कालमापन आदी आधुनिक उपकरणे वापरली आहेत. येथून दीड कि.मी. अंतरावरील क्षेत्राचे उत्खनन केल्यावर वेगळी संस्कृती तेथे नांदत होती, असे संकेत मिळाले आहेत.    

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 स्टोनहेंज कुणी बांधले हा अनुत्तरित प्रश्न होता. तेथे जाऊन उपासना करणाऱ्या डुईडस्‌ आणि सेल्टिक लोकांनी बांधले असे म्हणतात. पण हे लोक तुलनात्मक नजीकच्या काळातील आहेत. या मैदानात ३५० हाडे आणि १२,५०० अश्‍मयुगीन हत्यारे सापडली. जैविक अवशेषांचे कालमापन केले, तेव्हा ती साडेचार हजार वर्षांपूर्वीची होती असे निष्कर्ष मिळाले. येथील अवशेषांमध्ये जे मानवी डीएनएचे नमुने मिळाले, त्याचे रासायनिक पृथक्करण करण्यात आले. ते नमुने पश्‍चिम युरोपमधील शेतकऱ्यांशी मिळतेजुळते होते. त्यांच्यामधील डीएनए मेसोलिथिक आणि निओलिथिक काळातील लोकांशी साम्य दर्शवतात. याचा अर्थ स्टोनहेंजचे नमुनेदार दगडी बांधकाम साडेचार हजार वर्षांपूर्वी झाले असणार. हे निष्कर्ष २२जून २०२० रोजी स्टोनहेंजमध्ये भरलेल्या सभेत शोधनिबंधाच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले. स्टोनहेंजचे संशोधन यापुढे अधिक व्यापक होत जाणार आहे.

(Edited by : Kalyan Bhalerao)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com