सर्च-रिसर्च : ‘नेचर’चे प्रशंसनीय पाऊल

सर्च-रिसर्च : ‘नेचर’चे प्रशंसनीय पाऊल

कोरोना विषाणूच्या उद्रेकाबाबत किंवा त्याच्यामुळे उद्‌भवणाऱ्या कोविद-१९ (covid-१९) या आजाराबद्दल भीतीचे वातावरण शमण्याची चिन्हे नाहीत. त्यात या विषाणूचा उद्रेक चीनमधून झाल्यामुळे मृतांची लागण झालेल्यांची नेमकी संख्या किती, याबाबत माहिती येते, तीही संशयास्पद समजली जाते. या आजाराविषयी प्रचंड खरी, खोटी माहिती प्रसारित होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने तर दोन फेब्रुवारीला इशारा दिला आहे, की कोरोना विषाणूच्या उद्रेकासोबत त्याच्या विषयीच्या माहितीचाही प्रचंड उद्रेक (मॅसिव्ह इन्फोडेमिक) झाला आहे. ‘मॅसिव्ह इन्फोडेमिक’ म्हणजे माहितीची प्रचंड उपलब्धता. (किंवा प्रचंड माहितीची साथ!) या उद्रेकातील माहिती खरी किती व या माहितीचे स्रोत याची खातरजमा करणे कठीण आहे. 

दर काही वर्षांनी असा विषाणूंचा उद्रेक होतच आहे आणि बहुतेक वेळा त्याचे उगमस्थान चीन आहे. त्यामुळे सगळेच संशयास्पद समजले जाते. भरीस भर म्हणजे दोन भारतीय शास्त्रज्ञांचा कोरोना विषाणूसंदर्भातील शोधनिबंध वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने तो त्यांना मागे घ्यावा लागला. असे उद्रेक कधी, कोठे उद्‌भवतील, याविषयी काहीच सांगता येत नसले; तरी अशा साथींविरुद्ध लढण्यासाठी प्रत्येक देशाची आरोग्यव्यवस्था सदैव तत्पर व सक्षम असावी लागते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे याविषयी संशोधन करणाऱ्या संशोधकांनी माहितीची देवाणघेवाण केली पाहिजे. शोधपत्रिकांनी (रिसर्च जर्नल) या संदर्भातील शोधनिबंध सहज उपलब्ध (ओपन ॲक्‍सेस) होतील अशी व्यवस्था केली पाहिजे. म्हणजे, खोट्या माहितीस आळा बसू शकेल.  यादृष्टीने ‘नेचर’ या प्रख्यात वैज्ञानिक शोधपत्रिकेने पहिले पाऊल टाकले आहे. ‘नेचर’च्या प्रकाशकांनी अन्य काही शोधपत्रिकांच्या प्रकाशकांबरोबर विचारविनिमय करून संयुक्त भूमिका घेतली आहे. त्यानुसार अशा साथींच्या आजारासंबंधीचे तज्ज्ञांनी परीक्षण केलेले (पियर रिव्ह्यूज) शोधनिबंध त्वरित मुक्तपणे सर्वांना उपलब्ध केले जातील (किमान अशा साथीच्या काळात तरी). तसेच ते लेखक, प्रकाशनांच्या माहितीसह जागतिक आरोग्य संघटनेलाही उपलब्ध केले जातील.  याविषयी संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांनीही नवी, महत्त्वाची माहिती मिळाली की त्वरित अन्य संशोधकांबरोबर तिची देवाणघेवाण करावी. त्यामुळे तिचे विश्‍लेषण लवकर होईल, असेही ‘नेचर’ने सुचविले आहे. चिनी प्रशासनाने या विषाणूच्या उद्रेकाविषयी योग्य वेळी पावले उचलली काय किंवा या विषाणूच्या उद्रेकाच्या प्रारंभी त्याची दखल घेतली काय, असे प्रश्‍न सध्या विचारले जात आहेत. चीनने या प्रश्‍नांची प्रामाणिकपणे उत्तरे दिली, तर अशा साथीच्या रोगांवर उपाय शोधण्यासाठी ते फायद्याचे ठरेल.

शोधपत्रिका महिन्याच्या विशिष्ट तारखेला प्रसिद्ध होतात. परंतु, त्यांची प्रक्रिया अव्याहतपणे चालू असते. त्यामुळे अनेक शोधनिबंध त्या विशिष्ट तारखेपर्यंत वाचकांच्या हाती पडत नाहीत. त्यामुळे ‘नेचर’ व अन्य प्रकाशकांनी ‘कोविद-१९’सारख्या साथीच्या रोगाच्या काळात अशा रोगाविषयीचे शोधनिबंध शोधपत्रिकेच्या प्रकाशनापूर्वी एकमेकांशी आदान-प्रदान करता येण्याविषयीची व्यवस्था करण्याचे ठरविले आहे. अर्थात, त्यासंबंधीचे नियम पाळून असे शोधनिबंध आंतरजालावरील प्रकाशनाच्या स्थानावरून (वेबसाइट) प्रसिद्ध करावेत, असेही नमूद केले आहे. ‘नेचर’च्या या दृष्टिकोनास व्यापक अर्थ व महत्त्व आहे व ‘नेचर’चे हे प्रशंसनीय पाऊल आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com