सर्च रिसर्च : व्यायामानंतर माऊथवॉश नकोच!

सुरेंद्र पाटसकर 
Tuesday, 2 June 2020

तोंडातील जीवाणू हे आपल्या रक्तवाहिन्या मोकळ्या ठेवण्यास किंवा रक्त प्रवाह सुरळीत राहण्यासाठी उपयोगी ठरतात हे स्पष्ट आहे.त्यामुळे याचाअभ्यास गरजेचा आहे

दूरचित्रवाणी वाहिन्यांवर माऊथवॉशच्या जाहिराती कित्येकदा आपण पाहिल्या असतील. माऊथवॉशनी तोंड धुतले की सगळे जंतू क्षणार्धात मरून जातात, आणि तोंडाचे आरोग्य राखले जाते, असे दाखविले जाते. परंतु, जेव्हा माऊशवॉशच्या माध्यमातून `जीवाणूरोधी रसायन` तोंडात घेतल्यानंतर नेमके घडते काय? आपल्या शरीरावर त्याचा काही परिणाम होतो का? आणि सर्वांत म्हत्त्वाचे म्हणजे आपल्या शरीराला आवश्यकत असणारे काही जीवाणूही प्रक्रियेत मरतात का? याचा अभ्यास शास्त्रज्ञांनी केला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ब्रिटनमधील प्लायमाऊथ विद्यापीठातील आणि स्पेनमधील शास्त्रज्ञांनी केलेल्या या अभ्यासाचे निष्कर्ष `फ्री रॅडिकल बायोलॉजी अँड मेडिसिन` या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. यातील सर्वांत महत्त्वाचा निष्कर्ष असा होता की व्यायामानंतर लगेच माऊथवॉशचा वापर केला, तर रक्तदाब कमी होत असल्याचे दिसून आले. व्यायामामुळे होणाऱ्या फायद्यांपैकी काही फायदे यामुळे नष्ट होत असल्याचेही दिसून आले. 

जेव्हा आपण व्यायाम करतो, त्यावेळी आपल्या शरीरात नायट्रिक अॅसिड तयार होते व त्यामुळे रक्त वाहिन्या प्रसरण पावतात. त्यांचा व्यास आकार काहीसा वाढतो. या प्रक्रियेला व्हॅसोडिलेशन असे म्हटले जाते. त्यामुळे स्नायूंपर्यंतचा रक्तपुरवठा वाढतो. व्यायामानंतर एवढीच प्रमुख क्रिया होत असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे होते. परंतु, आता नव्या संशोधनानुसार व्यायामानंतर शरीरात बरेच बदल होतात. रक्त पुरवठा वाढला म्हणजे रक्तदाब कमी होतो. त्याचबरोबर शरीरातील जीवाणूंचा नायट्रेटशी संपर्क येतो. त्यामुळे नायट्रिक ऑक्साईडचे प्रमाण कमी होते. ``लाळग्रंथींमध्ये नायट्रेट हे शोषून घेतले जाऊ शकते, आणि लाळेबरोबर ते तोंडात सोडले जाऊ शकते, असे आता संशोधनातून सिद्ध झाले आहे,`` अशी माहिती प्लायमाऊथ विद्यापीठातील संशोधक राऊल बेसकोस यांनी दिली. आपल्या तोंडातील काही जीवाणू नायट्रेटचे रुपांतर नायट्रिट मध्ये करतात. शरीरातील नायट्रिक ऑक्साईडच्या निर्मितीसाठई नायट्रिट हा महत्त्वाचा घटक आहे. तोंडात तयार झालेले नायट्रिट थुंकीबरोबर गिळले गेल्यानंतर ते रक्तात शोषून घेतले जाते.. त्यामुळे रक्तवाहिन्या `खुल्या` राहू शकतात, त्यामुळे रक्तदाब कमी राहतो, असेही बेसकोस यांनी सांगितले, 

व्यायामानंतर लगेच माऊथवॉशच्या वापरामुळे तोंडातील जीवाणूंची ही साखळी तुटते, असे संशोधकांना आढळून आले. यासाठी संशोधकांनी युवकांच्या एका गटाला ट्रेडमिलवर ३० मिनिटे व्यायाम करायला सांगितले. त्यानंतर त्यांना माऊथलॉशने किंवा प्लेसबोने तोंड धुण्यास सांगितले. व्यायामानंतर लगेच, ३० मिनिटांनी, ६० मिनिटांनी आणि ९० मिनिटांनी माऊथवॉश वापरण्यात आला. या सगळ्या दरम्यान त्यांचा रक्तदाबही तपासण्यात आला. तसेच विश्रांतीच्या स्थितीतील रक्तदाबही नोंदविण्यात आला. माऊथवॉशचा वापर करणाऱ्यांचा रक्तदाब (सिस्टोलिक ब्लड प्रेशर) हा प्लेसबोचा वापर करणाऱ्यांपेक्षा कमी झाल्याचे दिसून आले. हा बदल सुमारे ६० टक्के होता. 

वेगवेगळ्या कालावधीसाठी व्यायाम केल्यानंतर या नोंदी घेण्यात आला. माऊथवॉशच्या वापरामुळे आपल्या शरीराला आवश्यक असलेले जीवाणू नष्ट होत असल्याचे हे पहिलेच संशोधन असल्याचा शास्त्रज्ञांचा दावा आहे. एका गटावर हे प्रयोग करण्यात आले. त्यामुळे आणखी गटांवर व वेगवेगळ्या वातावरणात त्याचे प्रयोग केल्यानंतर निष्कर्ष ठामपणे सांगता येतील, असे संशोधकांचे म्हणणे आहे. तोंडातील जीवाणू हे आपल्या रक्तवाहिन्या मोकळ्या ठेवण्यास किंवा रक्त प्रवाह सुरळीत राहण्यासाठी उपयोगी ठरतात हे स्पष्ट आहे. त्यामुळे याचा अधिक अभ्यास गरजेचा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: surendra pataskar writes article about mouthwash after exercise

Tags
टॉपिकस
Topic Tags: