

Remembering Bharat Kapoor: The Versatile Villain and Iconic Police Officer of Bollywood
Sakal
मनोरंजन क्षेत्रात काही कलाकार असे असतात, की ते छोट्या वा मोठ्या भूमिका सातत्याने करत असतात. त्या त्या भूमिकांमध्ये ते आपले अभिनयकौशल्य सिद्ध करीत असतात. भूमिका छोटी असो की मोठी, ते प्रत्येक भूमिकेत आपला वेगळा ठसा उमटवत असतात. अशाच कलाकारांपैकी एक शांत आणि सुस्वभावी कलाकार म्हणजे, ज्येष्ठ अभिनेते भरत कपूर. रंगभूमीपासून छोटा व मोठा पडदा अशी चार दशके त्यांनी चित्रपटसृष्टीत वाटचाल केली. विशेषकरून त्यांच्या खलनायकी भूमिका खूप गाजल्या. कधी खलनायक, कधी पोलिस अधिकारी; तर कधी वकील अशा विविध प्रकारच्या भूमिका त्यांनी समरसून केल्या. त्यांच्या प्रत्येक भूमिकेचा बाज वेगळा होता. प्रत्येक भूमिका साकारण्याची त्यांची लकब निराळी होती. भरत कपूर यांनी स्वकर्तृत्वावर आपली स्वतःची ओळख निर्माण केली.