भारतीय शोधनिबंध आणि प्रभाव

‘सायटेशन’ म्हणजे काय? त्याला एवढे महत्त्व का दिले जाते आणि आपण यात मागे का आहोत, या प्रश्नांचा मागोवा.
Indian Research Papers and Influences What is citation
Indian Research Papers and Influences What is citationsakal
Summary

‘सायटेशन’ म्हणजे काय? त्याला एवढे महत्त्व का दिले जाते आणि आपण यात मागे का आहोत, या प्रश्नांचा मागोवा.

- शुभदा नगरकर

संशोधनासंबंधीच्या एका पाहणीत भारतातील शोधनिबंधांची संख्या चांगली असली तरी सायटेशनच्या बाबतीत भारत अद्याप मागे असल्याचे आढळले. ‘सायटेशन’ म्हणजे काय? त्याला एवढे महत्त्व का दिले जाते आणि आपण यात मागे का आहोत, या प्रश्नांचा मागोवा.

संशोधनाच्या क्षेत्रात भारताचे स्थान नेमके कुठे आहे, याचे आपल्याला औत्सुक्य असते. वेगवेगळ्या पाहण्यांमधून त्याचा ढोबळ अंदाज येऊ शकतो. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार भारत संशोधनाच्या क्षेत्रात चौथ्या क्रमांकावर असून, सायटेशनच्या (उद्धरण) क्रमवारीत नवव्या स्थानावर आहे. हा फरक कशामुळे आहे?

‘क्यू एस’ कंपनीच्या अभ्यासावरून प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार भारताने २०१७ ते २०२२ दरम्यान १३ लाख, चीनने ४५ लाख, अमेरिकेने ४४ लाख, तर ब्रिटनने १४ लाख शोधनिबंध प्रसिद्ध केले आहेत. आपण लवकरच ब्रिटनला मागे टाकू, असा अंदाज आहे. परंतु सायटेशनच्या क्रमवारीत भारतीय संशोधन कमी पडते आहे.

सायटेशन म्हणजे संशोधनाचा प्रभाव मोजण्याची संख्यात्मक पद्धती. आधी प्रकाशित झालेल्या निबंधातील आशयाशी संबंधित संदर्भ जेव्हा दुसरा संशोधक आपल्या निबंधात देतो, तेव्हा ते त्याला मिळालेले एक ‘सायटेशन’.

साठीच्या दशकात युजिन गारफिल्ड या अमेरिकी भाषाशास्त्रज्ञाने त्याच्या शोधनिबंधात दिलेल्या संदर्भ यादीचा उपयोग करून ‘सायटेशन इंडेक्स’ बनवला. जितके जास्त संदर्भ तितका त्या निबंधाचा प्रभाव जास्त अशी समजूत आहे. गारफिल्ड यांच्या मते फक्त अशा संख्यात्मक मोजणीवरून एखाद्या संशोधकाची, संस्थेची अथवा देशाची संशोधनाची क्षमता ठरवणे योग्य नाही.

याचे कारण प्रत्येकाचा अभ्यास वेगळा असतो. त्यांनी संशोधनात संदर्भ कधी दिला जातो, यावर १५ मुद्दे दिले आहेत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एखाद्या विषयातील मूळ प्रकाशने ओळखणे. ज्यात मूळ संकल्पनेवर चर्चा केलेली असते. संदर्भ योग्य असणे महत्त्वाचे.

गारफिल्ड यांनी संदर्भ मोजता यावेत यासाठी तीन डेटाबेस आधी छापील आणि नंतर ई-माध्यमात प्रसिद्ध केले. ‘वेब ऑफ नॉलेज’ या नावाने क्लॅरिव्हेट अनॉलिटिक्स कंपनी प्रसिद्ध करते. यामध्ये सुमारे ११ हजार ते १४ हजार नियतकालिकांचा समावेश आहे. असाच दुसरा डेटाबेस ‘स्कोपस’ या नावाने ‘एलसीव्हीअर’ कंपनी प्रसिद्ध करते.

दोन्हीही डेटाबेसमध्ये मिळून जगभरातील सुमारे ३० ते ४० हजार नियतकालिके समाविष्ट आहेत. आजमितीला सुमारे तीन लाख नियतकालिके प्रसिद्ध होतात. परंतु या दोन डेटाबेसेसमध्ये समाविष्ट असलेल्या नियतकालिकांत प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधांवरुन आणि त्यांना मिळालेल्या संदर्भांवरून जगभरातील संशोधक, संस्था आणि देशांची संशोधनक्षमतेची क्रमवारी लावण्यात येते. तसेच या दोन्ही डेटाबेसेसमध्ये जास्तीत जास्त इंग्रजी भाषेतील नियतकालिके समाविष्ट केलेली आहेत.

भाषावैविध्यामुळे मर्यादा

भारत संशोधनात संख्यात्मकदृष्ट्या अग्रेसर असला तरी सायटेशनमध्ये मागे आहे, याची बरीच कारणे आहेत. नावीन्यपूर्ण संशोधन करण्यात भारतीय संशोधक कमी पडतात. अनेक संशोधन प्रकल्प राबवले जातात. बहुतेक वेळा ते कमी कालावधीचे असतात. त्यावर एक किंवा दोन निबंध प्रसिद्ध केले जातात.

त्या प्रकल्पाचा पाठपुरावा केला जात नाही. त्यानंतर नवीन प्रकल्प हाती घेतले जातात. त्यामुळे संशोधक अनेक विषयांत निबंध लिहितात. एकाच विषयात संशोधनासाठी दीर्घ काळ व्यतीत केला जात नाही. बऱ्याचवेळा निधीचा अभाव असणे, ग्रंथालयामध्ये पुरेसे संदर्भग्रंथ आणि नियतकालिके उपलब्ध नसणे, इंटरनेटवरून माहिती शोधण्याचे तंत्र माहीत नसणे इत्यादी. या सर्वांमुळे उत्तम कल्पना असूनही त्या प्रत्यक्षात येत नाहीत, असेही घडते.

भारतातील ज्या संशोधनाचे संदर्भ उद्‍धृत केले जातात, ते प्रामुख्याने इंग्रजी भाषेत लिहिलेले असतात. त्यामुळे आपोआपच त्या संख्येला एक मर्यादा येते. शिवाय जे संशोधन होते, त्यातदेखील नावीन्यपूर्णतेचे प्रमाण कमी आहे.

आधी प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधांचा आधार घेऊन नवे लिहिले जातात. यावर अनेक जणांनी भाष्य केले आहे. त्यामुळे निबंधांची संख्या वाढवण्यासाठी आधी प्रसिद्ध झालेल्या संशोधन पद्धतीचा नवीन डेटा वापरून संशोधन केले जाते. त्यात नावीन्यपूर्ण काहीच नसते.

ज्याची नोंद घेतली पाहिजे, असा मुद्दा म्हणजे भारतातील भाषांमधील विविधता. भारतातून इंग्रजीपेक्षा भारतीय भाषांमधून नियतकालिके प्रसिद्ध होतात. विशेषतः कला, भाषा आणि सामाजिक शास्र या विषयातील संशोधन स्थानिक भाषांमधून प्रसिद्ध होते. जगभरातूनदेखील भारतीय भाषांवर संशोधन चालते.

अशी नियतकालिके ‘आंतरराष्ट्रीय डेटाबेसेस’मध्ये समाविष्ट नसतात, याचे कारण इंग्रजीमध्ये त्यातील लेखांचे भाषांतर केले जात नाही. इतर भाषांमधील नियतकालिके या डेटाबेसेसमध्ये समाविष्ट करण्यासाठी निबंधांचा गोषवारा इंग्रजीत देतात.

तशी सोय आपल्याकडे नाही किंवा तसे करणे खूप कष्टाचे आहे. याचे कारण स्थानिक प्रकाशकांकडे तसा निधी नसतो आणि तसे भाषांतरकारही नसतात. विद्यापीठ अनुदान आयोगाने विविध भाषेतील उत्तम नियतकालिकांची संदर्भयादी बनवण्याचे काम आता हाती घेतले आहे.

अनैतिक प्रकार वाढले

अलीकडील काळात संशोधनाचा संबंध पदोन्नतीसाठी लावला गेल्यामुळे संशोधन आणि प्रकाशने यामध्ये अनेक अनैतिक प्रकार वाढले. निबंध फक्त त्यासाठीच ‘लिहिले’ जाऊ लागले. याचे कारण उत्तम प्रतीच्या नियतकालिकात निबंध प्रसिद्ध करण्यासाठी संशोधन उत्तम, नावीन्यपूर्ण असावे लागतेच. ते प्रकाशित करण्यासाठी बराच काळ लागतो.

यासाठी जिद्द, चिकाटी, सचोटी असावी लागते. संदर्भसंपन्नतेला अनन्यसाधारण महत्त्व देऊन प्रथितयश प्रकाशकांनी त्याचे व्यापारीकरण केलेले आहे. ‘संदर्भ’ मिळवण्यासाठी अनैतिक प्रकारही घडताना दिसतात. जसे गारफिल्ड यांच्या मते ‘सायटेशन्स सर्कल/रिंग’ तयार होतात. यामध्ये एका संशोधकांचा गट दुसऱ्या गटाच्या निबंधांचे सतत संदर्भ देतात.

त्यामुळे त्याची संदर्भसंख्या मुद्दाम फुगवलेली असते. संशोधकांनी एकमेकांचे शोधनिबंध बादरायण संबंध लावून संदर्भ यादीत द्यायला सुरवात केली. काही संपादकीय मंडळे त्यांच्या निबंधांचे संदर्भ उद्धृत करावेत, त्यांना सायटेशन द्यावे, असा आग्रह धरतात. त्याशिवाय ते निबंध स्वीकारत नाहीत. काही प्रकाशक विद्यार्थ्यांना पैसे देऊन ‘संदर्भ’ वाढवण्याचा प्रयत्न करतात.

शोधनिबंध लिहिताना संदर्भ कोणता कधी वापरायचा हे पूर्णतः मानवी वर्तणुकीवर अवलंबून असते. त्यामुळे फक्त संदर्भांच्या संख्येवरून संशोधनाची गुणवत्ता ठरवली जाऊ नये. पण हे जरी खरे असले तरीही सद्यःस्थितीत जगभरात उच्च शिक्षणाच्या नियामक संस्था संशोधनाची गुणवत्ता संदर्भांवर ठरवत आहेत.

त्याकरता मात्र भारतात याबाबत जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे. विद्यापीठे, संशोधनसंस्था, तसेच महाविद्यालयांमध्ये नवीन दीर्घ कालावधीचे संशोधन प्रकल्प राबवले गेले पाहिजेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने ‘संशोधन आणि प्रकाशन नीतिसंहिता’ (रिसर्च आणि पब्लिकेशन एथिक्स) हा दोन क्रेडिट कोर्स डॉक्टरेट करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य केला आहे. या अभ्यासक्रमात संशोधनाची गुणवत्ता तसेच शोधनिबंध लिहिण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. आगामी काळात याचे उत्तम परिणाम दिसतीलच.

भारतात पारंपरिक ज्ञानाला खूप महत्त्व आहे. ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाते. परंतु असे ज्ञान प्रकाशित होत नाही. भारतीय भाषांना नवीन शैक्षणिक धोरणात खूप महत्त्व दिले आहे. त्यामुळे या बाबतीतही विशेष लक्ष देऊन त्याला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. भारतातील संशोधनासाठी निधी देणाऱ्या संस्थांनी उत्तम, दर्जेदार संशोधन नियतकालिके प्रकाशित करण्यासाठी विद्यापीठांना निधी पुरवला आणि प्रशिक्षणही दिले पाहिजे. बनावट नियतकालिकांचे उच्चाटन झाले पाहिजे. तरच भारत जगातील संशोधनाचे उत्तम केंद्र बनेल, यात शंका नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com