'सांख्य’दर्शन : साक्षरता, संख्या नि संवाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'सांख्य’दर्शन : साक्षरता, संख्या नि संवाद

'सांख्य’दर्शन : साक्षरता, संख्या नि संवाद

आज जागतिक साक्षरता दिन. भारतामध्ये साक्षरतेचा विषय निघाला, की पहिले नाव समोर येते केरळचे. त्याबद्दल त्या राज्याचे कौतुक होते आणि अनेकांना हेवाही वाटतो. त्या राज्यात ९४ टक्के साक्षरता आहे. अँडोरा, ग्रीनलंड, उत्तर कोरिया आणि उझबेकिस्तान या चार देशांनी १०० टक्के साक्षरता करून दाखवली आहे! २०२१मध्ये तब्बल ३१ देशांनी ९९ टक्क्यांहून अधिक साक्षरता नोंदवली आहे. जागतिक पातळीवर १५ वर्षांवरील पुरुषांमध्ये सरासरी ९० टक्के तर महिलांमध्ये ८२.७ टक्के साक्षरता आढळून येते. अर्थातच, विकसित आणि विकसनशील देशांच्या साक्षरतेच्या दरात फरक दिसतो.

विकसनशील देशांमध्ये साक्षरतेचे प्रमाण कमी आहे; त्यात महिलांची साक्षरता हा दुर्लक्षित घटक आहे. आजही जगात ७७.३० कोटी मुलांना आणि युवकांना अगदी मूलभूत साक्षरतादेखील मिळालेली नाही. यापैकी बहुतांश मुले/युवा विकसनशील देशांतच आढळतात. २०२०-२१मध्ये कोविडची साथ आरोग्य या विषयाबरोबरच साक्षरतेकरताही अनेक आव्हाने देऊन गेली. कोविडच्या सुरवातीच्या भयावह काळात विकसनशील देशांनी जीव आणि जीविका वाचवण्यावर भर दिला. त्यावेळी साक्षरता हा मुद्दा चर्चेतही नव्हता. सगळ्या उपाययोजना लोकांपर्यंत अन्न आणि औषधे पोहोचवण्याबद्दल होत्या, नवयुवकांपर्यंत आपल्याला अक्षरे कशी पोहोचवता येतील, याचा संस्थात्मक पातळीवर विचार झाला नाही; संकटकालीन कामाच्या ओघात तो होऊच शकला नाही. साक्षरता दिनाच्या निमित्ताने या मुलांपर्यंत डिजिटल माध्यमातून शिक्षण कसे नेता येईल, याचा विचार ‘युनेस्को’ने मांडला आहे.

आधीच दारिद्र्याशी सामना करणाऱ्या कुटुंबाकडे वीज, मोबाईल, संगणक या सोयी नसतात. डिजिटल शिक्षणापासून या घरांमधील मुले दूर राहतात. (तक्ता पाहा.) यापैकी काही सोई सरकारने गावपातळीवर उपलब्ध करून दिल्या, तर प्रश्न सुटेल का? डिजिटल माध्यमातून शिक्षण घेण्याकरीताही एक किमान पातळीची साक्षरता लागते. इंटरनेटवर जाऊन मीटिंगमध्ये मिळणाऱ्या सूचनांप्रमाणे काम करणे, हेदेखील अनेक निरक्षरांसाठी मोठे आव्हान आहे. साक्षर असल्याशिवाय डिजिटल शिक्षण मिळू शकत नाही. यासंदर्भात कोविडकाळात झालेल्या प्रयोगांचे वेगळे महत्त्व आहे. अनेक देशांमध्ये नवीन शैक्षणिक प्रयोग करण्यात आले. त्यासंदर्भात युनेस्कोने निरीक्षणे मांडली आहेत. यापैकी पाच धडे भारताच्या सामाजिक-आर्थिक स्थितीतही लागू पडतात.

१) सर्वोत्तम तंत्रज्ञान तेच असते, जे आपल्याला माहीत असते. मुद्दाम घाईघाईत संगणकीकरण करायची गरज नाही! नेहेमीचेच रेडिओवरचे, टीव्हीवरचे कार्यक्रम अधिक रंजक, मुलांना आवडतील असे करावे! २) काय शिकवले आणि कसे शिकवले, हे शिक्षणाच्या माध्यमांपेक्षा जास्त महत्त्वाचे असते. अविचाराने तयार केलेला अभ्यासक्रम आणि अनुत्साही शिक्षक कुठल्याही माध्यमात अयशस्वीच ठरतो. ३) आधीच गंडलेल्या शैक्षणिक प्रणालीत तंत्रज्ञान आणले, की गाडी संपूर्णतः बिघडते! ४) डिजिटल शिक्षण बहुतेक वेळेला विषमता वाढवते. ५) डिजिटल शिक्षण प्रणालीमध्ये पाहिले अपयश चाखावेच लागते. प्रत्येक समुदायात स्थानिक प्रश्न निराळे असतात, त्यामुळे बाहेरून लादलेले डिजिटल शिक्षण अपयशीच ठरते. समुदायातील सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक बाबींमधून डिजिटल प्रणाली तयार होत गेली, तरच ती यशस्वी ठरते.

Web Title: International Literacy Day Writes Dr Mansi Fadake

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :India