म्याडम! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
गुरुवार, 11 ऑगस्ट 2016

"रिओत जा. सेल्ही काढा. हात हलवत अरत या...शी: काय हा वेळ आणि ऐश्‍यांचा अपव्यय?‘‘ सर्वच्या सर्व ओष्ठ्य उच्चारांना पहिल्याच फेरीत गारद करत ख्यातनाम स्तंभलेखिका म्याडम वाभा डे यांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवली, आणि आम्ही जागच्या जागी दिङमूढ झालो. प्रतिसादाखातर आम्ही फक्‍त "चुकचुक‘ असे केले. 

"रिओत जा. सेल्ही काढा. हात हलवत अरत या...शी: काय हा वेळ आणि ऐश्‍यांचा अपव्यय?‘‘ सर्वच्या सर्व ओष्ठ्य उच्चारांना पहिल्याच फेरीत गारद करत ख्यातनाम स्तंभलेखिका म्याडम वाभा डे यांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवली, आणि आम्ही जागच्या जागी दिङमूढ झालो. प्रतिसादाखातर आम्ही फक्‍त "चुकचुक‘ असे केले. 

"ऑलिंइकला जायचंच कशाला? सेल्ही काढायला?‘‘ लांबलचक नेत्ररेषांची हालचाल करत म्याडमनी विचारले. आम्ही खुळ्यासारखी मान हलवत "छे, भलतंच!‘ असे काहीसे म्हणणार होतो., तेवढ्यात पलिकडून "रिड्डिक्‍युलस...व्हाट अ वेस्ट!‘ असे उद्‌गार ऐकू आले. आम्ही पाठीमागे वळून पाहिले. ओष्ठकांडीचा योग्य विनियोग करणाऱ्या (आणखी एका) पुरंध्रीने ते उद्‌गार काढले होते. आम्ही तत्काळ दोन सूक्ष्म निरीक्षणे मनोमन नोंदवली. हल्ली उच्चभ्रू स्त्रिया पर्सीत चिमुकला आरसा ठेवीत नाहीत. मोबाइल फोनचा फ्रंट क्‍यामेरा चालू करून प्रसाधने करतात. दुसरे निरीक्षण म्हंजे, ओष्ठकांडीचा लालूस थर ओठांवर चढला, की ओष्ठ्य शब्दोच्चार संपुष्टात येतात. म्याडमची "सेल्ही‘ त्याच प्रकारची आहे, हे आम्ही वळखले!
तथापि, म्याडमनी एक ज्वलंत सवाल छेडला, यात काही शंका नाही.- माणसे रिओला का जातात? रिओ द जानिरो ही ब्राझीलची राजधानी असून, तेथे दरसाल दिलखेचक कार्निवल पार पडतो, तसेच तेथील विशाल समुद्रकिनाऱ्यांना खुल्या सौंदर्याची आणखी एक (फारच) चिंचोळी किनारपट्‌टी असत्ये, येवढे आम्ही ऐकून आहो. आम्ही काही अद्याप रिओला गेलो नाही. कारण अच्छे दिन आल्याखेरीज रिओला जाणे इंपॉसिबल असते. इथे गेल्या 18 महिन्यांचे किराणा बिल थकले आहे. "अच्छे दिन‘ आल्यावर देतो, असे शामळजीशेठला सांगून पाहिले, पण "अच्छे दिन‘ आल्यावरच या‘ असा उलट पवित्रा त्याने घेतल्याने आम्ही हात हलवत तेथून परत आलो. चालायचेच. रिओ नाही तर नाही; पण दुधाची तहान ताकावर भागविण्यासाठी गुदस्ता आम्ही गोव्याच्या कळंगुट किनाऱ्यावर खालमानेने एक राऊंड मारून आलो होतो, हेही थोडके नाही. पण ते एक असोच.
"रिओ जाओ, सेल्फी निकालो... खाली हात वापस आओ. "व्हाट अ वेस्ट ऑफ टाइम ऍण्ड मनी!‘ हे डे-वाक्‍य खरे तर "आरतीय ऑलिंइक सइति‘ने आपल्या मुख्यालयाच्या दर्शनी भिंतीवर कोरून ठेवावे, असे आमचे ठाम मत आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेत अखिल भारतीय क्रीडारसिकांची पिढ्यानपिढ्यांची वेदना मुखर झाली आहे, असे आम्हाला वाटते.
""माझ्या अतिक्रियेत पेन आहे...!‘‘ म्याडम पुढे म्हणाल्या.
अतिक्रियेत पेन? आम्ही दचकलोच. तशा प्रकारची पेन, याने की वेदना आम्हाला काही काळापूर्वी होत असे. त्या काळात आम्ही तबल्या-डग्ग्याच्या रिंगणउश्‍या घेऊन बसत असू व तिखट पदार्थ वर्ज्य असत. ओष्ठकांडीच्या प्रभावामुळे प्रतिक्रियेची "अतिक्रिया‘ झाल्याचे आमच्या झटक्‍यात ध्यानी आले.
...खेळांच्या नावाने रिओची वारी करायची आणि तेथे जाऊन सेल्फी काढून हात हलवत परत यावयाचे, हे सर्वथा गैर आहे, हे आमचेही प्रामाणिक मत आहे. आपल्या भारतीय खेळाडूंनी "ऑलिंइक‘ महाकुंभात हे येवढेच करावे? छे, छे! चांगली पाचपंचवीस किंवा शेदोनशे पदके गोळा करून आणावीत, हे खेळाडूंचे काम असते. तेथे जाऊन सेल्फीच काढायची, तर येवढी मेहनत करायची कशाला?
""मलाही वाटतं नं की आपल्या खेळाडूंनी तिथे पराक्रम गाजवावेत. पदकं आणावीत; पण हे फक्‍त सेल्फी काढून आणतात. सिंप्ली रिडिक्‍युलस आहे हे!‘‘ म्याडम म्हणाल्या. "ऍवसोल्युटली हं!‘ मागल्या बाजूला बसून आता (मोबाइल फ्रंट क्‍यामेऱ्यात पाहात) गालावरचा ठिपका पुसू पाहणाऱ्या पुरंध्रीने पुन्हा री ओढली.
डे म्याडम आणखीही बरेच बोलणार होत्या तेवढ्यात तेथे एक चिमुरडा आला. बराच वेळ बोलत असलेल्या म्याडमकडे पाहत थोड्या वेळाने म्हणाला...
""आंटी...लो, आज आप फिर दवाई लेना भूल गई ना?‘‘
त्याच्या बालवाक्‍यात साऱ्या क्रीडारसिकांची वेदना मुखर झाली आहे, असे आम्हाला राहून राहून वाटले. असो. 

Web Title: Madam