चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका । संत तेथे विवेका, असणे की गा ।।— संत ज्ञानेश्वर महाराज.भाषा हा काही फक्त शब्दांचा खेळ नव्हे. भाषेचा उद्गम आणि प्रवाहाच्यामागे एक खूप मोठे सामाजिक, सांस्कृतिक संचित असते. जनबहुजनांच्या अफाट संवाद पसाऱ्यातून, आणि ज्ञानवंतांच्या बौद्धिक तपातून तावूनसुलाखून निघते, ती खरी भाषा. तिचे नाते थेट आपल्या गुणसूत्रांशी निगडित असते. ज्याला ‘पिंड’ म्हणतात, तो घडवते ती आपली भाषा. भाषा ही ज्ञानभाषाच असते. किंबहुना कुठलीच भाषा अज्ञानभाषा असू शकत नाही. भाषेचा जन्मच मुळी अभिव्यक्ती आणि अभिवृद्धीच्या ओढीने झाला. त्या अर्थाने मराठी भाषाही जन्मत:च ज्ञानभाषा आहे. तरीही सांप्रतकाळी मायमराठी तिच्याच घरात उपरेपण भोगते आहे. त्यामागे तिच्याच लेकरांच्या अनास्थेचा भाग अधिक! लोकधर्म, प्रथा- परंपरा अन् बोलीभाषा या बाबी आधुनिक मराठी जगताला बहुधा अडगळ वाटू लागल्या आहेत. कारण आपली भाषा हाच समृद्धीचा मार्ग ठरू शकतो, यावरचा नव्या पिढीचा विश्वास उडत चालला आहे. उत्कर्षाच्या हव्यासापोटी एकदा ‘शॉर्टकट’ मारण्याची सवय लागली की, अशी गफलत होणारच. मराठीच्या वापराऐवजी हिंदी, इंग्लिश अथवा अन्य ‘प्रगत’ भाषांचा वापर हा शॉर्टकटच आहे, आणि त्याची कडू फळे भविष्यात चाखावी लागणार आहेत, नव्हे, आत्ताच ती वेळ येऊन ठेपली आहे. पाठीशी तेजस्वी इतिहास आणि ज्ञानवंतांचा भरभक्कम वारसा असताना सांप्रतकाळी मराठी माणूस अन् त्याच्या भाषेचे इतके हाल होत आहेत. भाषा हा जसा अस्मितेचा प्रश्न आहे, तशीच ती आपल्या अस्तित्वाची ओळख आहे, हे विसरावे कसे? महाराष्ट्रदिनाच्या निमित्ताने मराठी भाषेच्या पडझडीमागल्या कारणमीमांसेचा नेमकेपणाने वेध घेऊन उत्तर शोधणे ही प्रत्येक मराठी माणसाची जबाबदारी आहे. हे काही फक्त सरकारचे काम नाही. वटहुकूम काढून, नियम-कायदे करुन मराठीचे भले होणार नाही. त्यासाठी आपण सर्वांनीच ही भाषा फुलासारखी उचलली पाहिजे..कृत्रिम प्रज्ञेच्या (एआय) प्रभावामुळे चौथ्या औद्योगिक क्रांतीचा (इंडस्ट्री ४.०) अनुभव आपण सारेच सध्या घेतो आहोत. या क्रांतीच्या पावलागणिक कार्यसंस्कृती बदलते आहे, गरजा बदलत आहेत आणि भाषिक संवादाच्या चौकटीही आमूलाग्र बदलत आहेत. ऑनलाइन जगतामध्ये चॅटिंगसाठी शब्दांना शॉर्टकट मारत ‘ईमोजी’चा पर्याय शोधला गेला, पण तोही सर्वार्थाने परिपूर्ण म्हणता येईल असे नाही. तांत्रिक प्रगती भाषिक संवादाची जागा घेऊ शकत नाही, हे सत्य विचारवंत वारंवार सांगत असले तरी मराठी माणसाच्या मनात त्याचा प्रकाश कधी पडणार, हा खरा प्रश्न आहे. मरणासन्न झालेल्या मराठी शाळा, आपल्याच प्रदेशात मातृभाषेत बोलण्यास कचरणाऱ्या भूमिपुत्रांच्या जिव्हा, उत्तरभारतीय सांस्कृतिक आणि राजकीय आक्रमणाला बळी पडलेले पुढारी…हे सगळे चित्र उद्विग्नता आणणारे आहे..महाराष्ट्रात आजवर अनेक परचक्रे आली, पण मराठी संस्कृती टिकून राहिली. उलटपक्षी मराठी भाषेने परभाषेतील शब्दही पोटात सामावून घेतले. यातून भाषाव्यवहार अधिक समृद्ध होत गेला, हिंदी, ऊर्दू, फारसी आणि अरबी, इतकेच नव्हे, तर शेजारच्या कानडी, तेलगू भाषेतले शब्दही मराठीने आपलेसे केले. या अनेक भाषांतील निवडक शब्दसंपदा मराठीच्या अंगणात आली अन् पुढे ती कालौघात मराठी होऊन गेली. अनेक बोलीभाषांचे वेल मराठीच्या परसबागेत फुलले. खरेतर मराठीचा महावृक्ष याच बोलीभाषांच्या वेल-पारंब्यांनी तोलून धरला, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. हेच खरे मराठीचे सौंदर्य आहे. या बोलीभाषांच्या प्रवाहीपणाला प्रमाण भाषेचा दुराग्रह रोखू शकलेला नाही. संस्कृतप्रेमामुळे या प्रदेशातील बहुजनांची बोली उपेक्षेची धनी ठरली. आज इंग्रजीप्रमाणेच इतर युरोपीय भाषांच्या विस्तारामागे तेथील भाषाप्रेमही कारणीभूत आहे. आज हे देश संपन्न असले तरी, जेव्हा काही नव्हते, तेव्हादेखील या देशांनी त्यांच्या मातृभाषेचे बोट सोडले नव्हते, हे विसरता कामा नये. एखादी भाषा संपते, तेव्हा केवळ शब्द लुप्त होत नसतात, तर एक संस्कृती मरण पावते. मराठी संस्कृती टिकवायची असेल, तर आता केवळ मराठीत बोलून भागणार नाही, तिला सामाजिक व्यवहारामध्ये तशी प्रतिष्ठाही मिळवून द्यावी लागेल. महाराष्ट्राच्या भूमीत येऊन स्वतःचा चरितार्थ चालविणाऱ्याला किमान मराठीत बोलता यायलाच हवे. रिक्षा-टॅक्सीवाले उद्या मराठी बोलतीलही, पण शहरभागातल्या उच्चभ्रूंच्या टॉवरमध्येही मराठीचाच आवाज बुलंद व्हायला हवा. तिथे राहणाऱ्या मम्मी-पप्पांनीही आता ‘अमराठीपणा’चा सोस सोडून स्वत्व जपायला हवे. उठता बसता इंग्लिश-हिंदी झाडणाऱ्यांना आता ‘मराठीत बोला’ असे ठणकावून, प्रसंगी ‘वाजवून’ सांगितले पाहिजे. चित्रपटसृष्टीचा जन्म ज्या भाषेत झाला, त्या मराठी भाषेलाच बॉलिवुडने काय वागणूक दिली? हिंदी सिनेमात मराठी व्यक्तिरेखा बव्हंशी मोलकरणी, नोकर आणि कॉमेडी पात्रापुरत्या वापरल्या गेल्या. ही प्रतिमा आपण कलात्मक स्वातंत्र्याखातर स्वीकारली. पण मुळात तशी प्रतिमा का निर्माण झाली, याच्या मुळाशी जायला हवे. रूपेरी पडद्यांपासून कार्पोरेटपर्यंत सगळीकडे मराठी ऐकू यायला हवी. मराठीत बोलणे ही गरज बनली पाहिजे. जेव्हा ती गरज बनेल, तेव्हा तिच्यामागे अर्थकारणदेखील उभे राहील. हे जेव्हा होईल, तेव्हाच ‘मराठी’लाही सोन्याचे दिवस येतील, आणि ‘महाराष्ट्रदिन’ही सार्थकी लागेल..मराठी असणे आणि मराठीत बोलणे ही गरज बनली पाहिजे. जेव्हा ती गरज बनेल तेव्हा तिच्या मागे आपसूकच अर्थकारणदेखील उभे राहील..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.