
काँग्रेसने या पत्रावर स्वाक्षरी न करता स्वतंत्रपणे पण ‘आम आदमी पक्षा’चा नामोल्लेखही न करता, तीच भूमिका मांडली
वेगळं राह्यचंय आम्हाला!
दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना झालेल्या अटकेनंतर देशातील आठ विरोधी पक्षांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून विरोधी नेत्यांच्या विरोधात होत असलेल्या सरकारी यंत्रणांच्या गैरवापराकडे लक्ष वेधले, हे चांगले झाले.
या यंत्रणांचा अस्त्र म्हणून वापर करणे ही बाब गंभीरच आहे. पण हा निषेधाचा आवाज एकमुखी असायला हवा होता. पण भारतीय जनता पक्षाला आगामी निवडणुकीत पराभूत करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा त्याग करण्याची ग्वाही रायपूर येथील अधिवेशनात दिल्यानंतर दहा दिवसांतच काँग्रेसने आपला ‘स्वतंत्र बाणा’ दाखवून दिला!
काँग्रेसने या पत्रावर स्वाक्षरी न करता स्वतंत्रपणे पण ‘आम आदमी पक्षा’चा नामोल्लेखही न करता, तीच भूमिका मांडली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीतील विरोधकांच्या संभाव्य ऐक्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
पंतप्रधानांना हे पत्र लिहिणाऱ्या नेत्यांमध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे, फारुख अब्दुल्ला आदी बड्या नेत्यांबरोबरच बिगर-भाजप राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे. मोदी यांनीच संसदेत ‘विरोधकांना ‘ईडी’सारखी यंत्रणा एकत्र आणत आहे’, असे उपहासाने म्हटले. पण गैरवापराच्या आरोपाचे काय, यावर ते काहीच बोलले नाहीत.
पंतप्रधानांनी काढलेले विरोधकांविषयीचे कुत्सित उद््गार हे पत्रातील तक्रारीला पुष्टी देणारेच आहेत, असे म्हणावे लागेल. पंतप्रधानांचे कार्यालय या पत्रास केराची टोपली दाखवणार, हे या पत्रास ७२ तास उलटून गेल्यावरही या कार्यालयाने पाळलेल्या मौनामुळे स्पष्ट झाले आहे.
या पत्रामुळे विरोधी पक्षांच्या ऐक्याच्या दृष्टीने किमान एक पाऊल तरी उचलले गेले आहे. परंतु या समाधानाला काँग्रेसच्या अनुपस्थितीमुळे काहीसा तडा गेला आहे. याचे कारण या एका महत्त्वाच्या राजकीय कृतीसाठीदेखील विरोधकांमध्ये एकवाक्यता दिसत नाही, हे पुन्हा स्पष्ट झाले.
काँग्रेसने गेल्या दोन लोकसभा निवडणुकांत १८/१९ टक्के मते मिळवली आहेत. तो पक्षच जर एकत्रीकरणाच्या प्रक्रियेत नसेल तर परिणामकारक आणि प्रभावी फळी कशी तयार होणार, हा प्रश्न समोर येतो.

अर्थात, काँग्रेसच्या निर्णयासही मोठी पार्श्वभूमी आहे. सोनिया गांधी यांच्यावर ‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणी ‘ईडी’ने समन्स बजावले तेव्हा ‘आप’चे नेते मिठाची गुळणी घेऊन बसले होते, हे एक कारण झाले. मात्र, काँग्रेसचे खरे दुखणे वेगळेच आहे.
‘आप’ गेल्या आठ-दहा वर्षांत फक्त भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत असलेल्या राज्यांमध्येच आपले हातपाय पसरू पाहत आहे आणि त्यामुळे अनेकदा ‘आप’ची संभावना भाजपची ‘बी टीम’ अशी केली गेली आहे.
पंजाब आणि त्यापाठोपाठ गुजरात या दोन राज्यांत अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकांत त्याची प्रचीतीही आली आहे. त्यामुळेच सिसोदिया यांच्या अटकेनंतर अन्य बहुतेक पक्ष संतापून उठले असतानाही काँग्रेस पक्ष मुग्धच होता. एवढेच नव्हे तर काँग्रेसच्या दिल्ली शाखेने सिसोदिया यांच्या अटकेचे स्वागतही केले होते.
त्यामुळे आप आणि काँग्रेस यांच्यातील विळ्या-भोपळ्याचे नाते हाही या संभाव्य विरोधी ऐक्यातील मोठा अडसर ठरणार आहे. काँग्रेसला वगळून या ऐक्यात काही एक अर्थ ठरू शकत नाही, हे जसे खरे आहे; त्याचबरोबर याच ऐक्याच्या प्रक्रियेत ‘आप’ला दूर ठेवले गेले, तर त्याचाही मोठा फटका या संभाव्य आघाडीस बसू शकतो.
त्यामुळेच काँग्रेसपक्ष जर खऱ्या अर्थाने भाजपला पराभूत करण्यासाठी कोणत्याही त्यागाची तयारी दाखवत असला तरी या दोन पक्षांच्या परस्पर संबंधांचा सर्वांनाच फेरविचार करावा लागणार आहे. मात्र, तूर्तास तरी या पत्रामुळे चौकशी यंत्रणांच्या केंद्र सरकारच्या वापरावर झगझगीत प्रकाश पडला आहे.
या पत्रात, पांढऱ्या शेल्यात हात बांधून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांमागील चौकशीचा ससेमिरा कसा मंदावत गेला आहे, याचीही तपशीलवार उदाहरणे देण्यात आली आहेत. वानगीदाखल महाराष्ट्रातील नेते नारायण राणे यांचे एकच उदाहरण पुरेसे आहे.
मात्र, या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या ‘योग्य वेळ येताच भाजपविरोधात विरोधकांची मोट बांधली जाईल!’ या उद्गारांचा विचार करावा लागेल. गेल्या आठ वर्षांत अशा घोषणा अनेकदा झाल्या. कर्नाटकात कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखाली धर्मनिरपेक्ष जनता दल आणि काँग्रेस यांचे सरकार याच काळात आले तेव्हा त्यांच्या शपथविधीनंतर भाजपविरोधी सारे बडे नेते एका व्यासपीठावर आले होते.
मात्र, ‘उत्तम छायाचित्रा’ची एक संधी यापलीकडे पुढे काहीच झाले नाही. पवार यांनीही भाजपविरोधात बहुतेकांचे एकमत आहे; मात्र त्यापलीकडे त्यांच्यात काहीच हालचाली नाहीत, अशी कबुली कऱ्हाडमध्ये बोलताना रविवारी दिली आहे.
त्यामुळे केवळ पत्रापत्री करण्यापलीकडे जाऊन या बड्या नेत्यांनी एकत्र बसून, देशाला काही पर्यायी कार्यक्रम द्यायला हवा. तरच या ऐक्यासंबंधात काही क्रांतिकारी पाऊल उचलले गेल्याची जाणीव जनतेला होऊ शकेल. अन्यथा, ‘वेगळंच राह्यचंय आम्हाला!’ या पूर्वपरिचित नाटकाचा आणखी कितवा तरी प्रयोग लोकांना बघावा लागेल.
वैयक्तिक पातळीवरील अनन्यसाधारण गुणसंपदेपेक्षा परस्पर सहकार्य आणि कुशल हाताळणी विजयासाठी जास्त महत्त्वाची असते.
— युवाल नोआ हरारी, विचारवंत