आवाऽऽज बंद! (अर्थात सदू आणि दादू...)

dhing-tang-28
dhing-tang-28

सदू : (खट्याळपणाने फोन फिरवत) म्यांव म्यांव!! 
दादू : (पहिल्या रिंगलाच फोन उचलून) सदूराया, सदूराया...एवढा मोठा झालास तरी फोन करून लहान पोरांसारखे मांजराचे आवाज कसले काढतोस? 
सदू : (एक पॉज घेत) गंमत केली रे!! 
दादू : (खवचटपणाने) नुकताच महाबळेश्‍वरला जाऊन आलो! तुझी जाम आठवण आली!!..तिथंच मी आमच्या पार्टीचा नेता झालो ना!! तुझा तेव्हा उतरलेला चेहरा आठवतोय मला अजून! 
सदू : (तिरस्कारानं) मी भूतकाळाकडे बघत नाही, भविष्यकाळाकडे बघतो!..बाय द वे कशी झाली तुझी महाबळेश्‍वरची ट्रिप? 
दादू : (गोंधळून) जशी व्हायला हवी तशीच झाली!! 
सदू : (चौकसपणे) हवापालटासाठी जायचं तर चांगलं परदेशात जायचं की!! 
दादू : (सलगीने) हल्ली विमानाची तिकिटं फार महाग झाली आहेत! शिवाय आजकाल ते फॉग-बिग असतं ना!! म्हटलं रिस्क नको घ्यायला!! आपलं रस्त्यानं कुठं तरी जाऊन यावं! (आवाज खाली आणत) त्याचं काय झालं की बांदऱ्यात आमच्या घरासमोरच इतकं मोठं बांधकाम सुरू आहे की त्या आवाजाला पार कंटाळून गेलो होतो!! किती आवाज, किती आवाज...त्याला काही लिमिट? शेवटी संतापून मुन्शिपाल्टीत कळवलं की, बंद करा ते बांधकाम आधी! पण मुन्शिपाल्टीवाले अजिबात ऐकेनात. म्हणाले, ""साहेब, ते आपल्याच बंगल्याचं बांधकाम आहे''...मग काय? कंटाळून महाबळेश्‍वरला निघून गेलो! 
सदू : (खिजवल्यागत) ध्वनि प्रदूषणाचा त्रास झाला म्हणे? नेमकं काय झालं होतं? 
दादू : (वैतागलेल्या आवाजात) एक मिनिट डोळ्याला डोळा लागू दिला नाहीन त्या लोकांनी!! मी ऱ्हायलो होतो, त्याच्या जवळच हॉटेलात भयंकर डीजे लावून नाचबिच चाललेला!! लग्न होतं म्हणे कुणाचं तरी!! आता लग्नात एवढा आवाज कशाला करायचा? गपचूप लग्न लावावं आणि मोकळं व्हावं! पण वऱ्हाडातले लोक ऐकतील तर शपथ!! अस्सं वाटलं की एकेकाला कोपऱ्यात घेऊन *** ** * **!!! 
सदू : (कानात बोट घालत) खरखर आली तुझ्या बोलण्यात! ऐकू नाही आलं!! पुन्हा सांग!! 
दादू : (वरमून) काही नाही, मी म्हणत होतो की त्यांची जरा निराळ्या पद्धतीनं समजूत काढण्याची इच्छा होती!! पण समजूत काढायला गेलेल्या आमच्या माणसाला ते वऱ्हाडातले लोक म्हणाले की "डीजे काहून बंद करू बे? तुह्या बापाचं हाटिल आहो का?'' आमचा माणूस म्हणाला की "दादूसाहेबांना त्रास होतोय, लग्न करा, पण आवाज बंद करून करा!!' पण तरीही ऐकेनात! मग सरळ पर्यावरण मंत्र्यांना केला फोन आणि नोंदवली तक्रार!! म्हटलं हे ध्वनि प्रदूषण बंद करा ताबडतोब! अशानं महाबळेश्‍वरच्या निसर्गाचा तोल बिघडतो आहे... 
सदू : (चिडवत) निसर्गाचा तोल बिघडतोय, की दादूशेठ तुमचा? 
दादू : (बजावून सांगत) सद्याऽऽ..मला चिडीला आणू नकोस! 
सदू : (चिडवत) हॉटेल बंद करायला लावलंस त्याचं काय? बिचाऱ्या तिथल्या नोकरांच्या रोजगाराचं काय करणार? रस्त्यावर आले ते तुझ्यामुळे!! गरिबाच्या पोटावर पाय आणून काय मिळवलंस? इतकी माणुसकी सोडून वागलास? शोभलं का तुला? 
दादू : (चेवात येऊन) मी कोणाच्या पोटावर पाय दिलेला नाही!! तुझ्या कानाशी आणून लावतो डीजे!! मग कळेल तुला इंगा!! माझ्या एका चांगल्या कामाचं राजकारण करताय तुम्ही!! पाप लागेल तुम्हाला!! कानाशी डीजे लावतात लेकाचे!! हॅ:!! 
सदू : (हळू आवाजात) मला त्रास नाही होत डीजेचा, आणि त्यावर राजकारणही करत नाही मी!! त्यावर माझ्याकडे सोपा उपाय आहे. अगदी आठ आण्यात होणारा!! 
दादू : (आश्‍चर्यचकित होत) आठ आण्यात? ते कसं काय? 
सदू : (एक पॉज घेत) अरे, कानात कापसाचे बोळे घातले की झाऽऽलं!! आहे काय नि नाही काय!! 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com