भरलंऽऽ धरऽऽण..! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

महाराष्ट्रातील जवळपास सर्व धरणे ऑलमोस्ट फुल्ल झाली असून बळिराजा आनंदित झाला आहे. शेतशिवारे ओलीचिंब होऊन सारे काही आबादानी झाले आहे. एकंदरीत औंदा पावसकाळ चांगला गेला. अनेक पावसाळे गेले, पण धरणे भरल्याच्या बातम्या छापण्याची संधी माध्यमांना मिळाली नव्हती. यंदा ती मिळाली, हे भाग्यच. 

महाराष्ट्रातील जवळपास सर्व धरणे ऑलमोस्ट फुल्ल झाली असून बळिराजा आनंदित झाला आहे. शेतशिवारे ओलीचिंब होऊन सारे काही आबादानी झाले आहे. एकंदरीत औंदा पावसकाळ चांगला गेला. अनेक पावसाळे गेले, पण धरणे भरल्याच्या बातम्या छापण्याची संधी माध्यमांना मिळाली नव्हती. यंदा ती मिळाली, हे भाग्यच. 

अचानक हा नैसर्गिक चमत्कार कसा बरे घडला? पाऊस न येण्याची कारणे जनलोक शोधून काढून त्यावर टीव्हीवरील प्यानल डिस्कशनेही होतात. पण पाऊस पडून धरणे फुल्ल नेमकी कां झाली? ह्याचा शोध घेताना कोणी दिसत नाही. अतएव आम्हीच त्या कामास लागलो. तत्पूर्वी, यासंदर्भात आम्ही महाराष्ट्रातील काही नामचीन पुढाऱ्यांशी संपर्क साधून प्रतिक्रिया हासिल केल्या. सर्वांना एकच प्रश्‍न विचारला. तो असा : महाराष्ट्रातील जवळपास सर्व धरणे ऑलमोस्ट फुल्ल कशी काय झाली? त्यावर विविध उत्तरे प्राप्त झाली, ती येणेप्रमाणे : 

कारभारी फडणवीसनाना : आमच्या मोदीजींमुळे हे शक्‍य होत आहे. गेले तीनेक वर्षं अथक परदेश दौरे करून त्यांनी परदेशी गुंतवणूक आणण्याचा विडा उचलला होता. आपला मान्सून हादेखील एक प्रकारे परदेशी गुंतवणूकच असते, हे इथे लक्षात घेतले पाहिजे. 'मेक इन इंडिया'च्या त्यांच्या आवाहनाला पर्जन्याने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने धरणे भरली, हेच तुमच्या प्रश्‍नाचे खरे उत्तर आहे. 

शिवाय आमच्या 'जलयुक्‍त शिवार योजने'चेही हे एक यश म्हणावे लागेल. शिवाय औंदा मी पंढरपूरला विठ्ठलाची पूजा करताना भरपूर पाऊस पडू दे, अशी प्रार्थना केलीच होती. ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे धरणे फुल्ल!! 

अर्थ-वनमंत्री सुधीर्जी मुनगंटीवारजी : चार कोटी झाडं लावले जी...चार कोटी!!...पाऊस नाही पडणार, तर काय होणार? कॉंग्रेसच्या राजवटीत जंगलं तुटले, डोंगरं उघडे बोडके होऊन गेले. वनराजी नष्ट झाली, पाऊस येईल कुठून? आम्ही चार कोट झाडं लावले, धरणं भरली!! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पुन्हा पुन्हा कर्जमाफी कशी देता येईल. कळलं? घ्या, खड्डा खणा आणि लावा झाडं!! 

उधोजीसाहेब : कुणी काहीही म्हणा, आम्ही पहिल्यापासून शेतकऱ्याच्या पाठीशी उभे आहोत. आम्ही पाठपुरावा केला म्हणून पाऊस आला आणि धरणं भरली. आता धरणं भरल्यानंतर पाणीवाटपाची अंमलबजावणी कशी होते, ह्याकडे आम्ही लक्ष देणार आहोत. जय महाराष्ट्र. 

चुलतराज : धरणं भरली म्हणजे काय झालं? त्याचा उपयोग काय? इथं रस्ते धड नाहीत, फूटपाथ नाहीत. मुलांना खेळायला बागा नाहीत. बागांमध्ये कारंजी नाहीत. कारंज्यात पाणी नाही!! आधी धरणातलं पाणी नीट खेळवून दाखवा, मग बघू!! धरणं भरली ह्या नुसत्या थापा आहेत, थापा!! 

बाबाजी चव्हाणसाहेब : धरणं फुगवलेली आहेत...आय मीन पाणीसाठ्याचे आकडे फुगवलेले आहेत. धरणं अशी भरत नाहीत. मी मुख्यमंत्री होतो, त्या काळात एकही धरण धड भरलेलं नव्हतं. आताच कशी भरली? आणि ही धरणं आमच्याच काळात बांधून झाली होती, हे लक्षात घ्या!! 

आणि लाष्ट- 

श्रीमान धाकले धनी ऊर्फ दादासाहेब बारामतीकर : काय? धरणं भरली? मग मला काय विचारता? थांब, लेका तुला आता ***!*** **!! **!! 

...शेवटच्या प्रतिक्रियेनंतर आम्ही अन्य कुणाकडे मुलाखतीस जाऊ शकलो नाही. तूर्त इस्पितळात सलाइनच्या पाण्यावर आहो व पाठीस पलिस्तर आहे. धरणे फुल्ल झाल्यामुळे आम्ही आडमिट झालो आहो. इति.

Web Title: marathi news marathi website Dhing Tang