विरोधाचा सूर्य! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

''तुम्ही कितीही वीज घालवलीत तरी विरोधाचा सूर्य उगवायचा थांबणार नाही...समजलं?'' जळजळीत सुरात श्रीमान चुलतराजांनी आम्हाला सुनावले. 
आम्ही ''हो हो' म्हणालो. 

''हो हो काय?'' चुलतराज म्हणाले. 

''तुम्ही कितीही वीज घालवलीत तरी विरोधाचा सूर्य उगवायचा थांबणार नाही...समजलं?'' जळजळीत सुरात श्रीमान चुलतराजांनी आम्हाला सुनावले. 
आम्ही ''हो हो' म्हणालो. 

''हो हो काय?'' चुलतराज म्हणाले. 

श्रीमान चुलतराज ह्यांच्या ह्या बाणेदार उद्‌गारांचा नेमका अर्थ शोधण्यासाठी आम्ही पुरी रात्री कोजागिरी जागविली. रात्रभर डोळ्याला डोळा नाही की पापणीला पापणी नाही. सांप्रत आमचे नेत्र खदिरांगारासारखे पेटलेले (पक्षी : लालंलाल) असून मुखातून क्रोधाग्नीचे फुत्कार (पक्षी : आम्लपित्ताच्या ढेकरा!) बाहेर पडत आहेत. सदरील आक्‍टोबर हीट ही ओरिजिनल सूर्याची नसून विरोधाच्या सूर्याचीच ही तलखी आहे, हे आम्हांस आता पुरते पटले आहे. 

आता विरोधाचा सूर्य म्हणजे काय? हा तप्त सवाल अनेकांच्या मनात उगवला असेल. माशाल्ला आमच्याही मनात तो उगवलाच. त्यावरच आम्ही रात्रभर शारदेचे चांदणे पीत पीत विचार केला, त्या मंथनातून आलेले नवनीत आम्ही आपल्यासमोर ठेवत आहो. 

त्याचे असे आहे, की विरोधाचा सूर्य हा सूर्याचा एक प्रकार आहे हे उघड आहे. शिवाय तो दिवसातून एकदाच नव्हे, तर वारंवार उगवत असतो. इलेक्‍शनांची चाहूल लागली, की (इन्शाल्ला) त्याचे उगवणे हे ठरलेलेच. विरोधाचा सूर्य हा अधिक प्रखर, अधिक तेजस्वी आणि अधिक तापट असतो, हे तर सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. शिवाय हा सूर्य कधीही पूर्व दिशेला उगवत नाही. तेथे उगवतो तो प्राय: सत्तेचा सूर्य असतो. सत्तेच्या सूर्याबद्दल आम्ही चिक्‍कार ऐकून आहो, पण विरोधाचा सूर्य ही थोडी नवी कन्सेप्ट आहे, ह्याची आमच्या लाखो वाचकांनी कृपया नोंद घ्यावी. हा गंभीर मामला आहे. कृपया ह्यावर सोशल मीडियात भलभलते विनोद नकोत, असे आमचे आवाहन आहे. 

परवाच्या गुरवारी, उपवासाचा दिवस असल्याने गिरगावातील पणशीकरांकडे एक उपवास मिसळ, साबुदाणे खिचडी आणि राजगिरा पुरी असे काही मोजके अन्न सेवन करून आम्ही श्रीमान चुलतराजांनी अरेंज केलेल्या मेट्रोच्या चौकातील संताप मोर्चात सामील झालो. हे आमचे कर्तव्यच होते. कां की आम्हालाही भयंकर संताप आला होता, हे वर तपशीलात लिहिले आहेच. तथापि, कोंबडे कितीही झाकले तरी ओरिजिनल सूर्य कधीही उगवायचे सोडत नाही. तद्वतच विरोधाच्या सूर्याचे आहे. तो झांकणारे टोपले आजवर ब्रह्मांडात उपलब्ध नाही. तो उगवणारच. परंतु विरोधाच्या सूर्याचे दोन प्रॉब्लेम आहेत, तो म्हंजे सत्तेचा सूर्य उगवल्याशिवाय विरोधाचा सूर्य उगवू शकत नाही, आणि त्यास वारंवार ग्रहण लागते ते वेगळेच. 

ही दुहेरी समस्या आम्हाला डांचू लागल्याने आम्ही कोजागिरीच्या जाग्रणानंतरही सकाळी उठून श्रीमान चुलतराजांच्या दादर येथील 'कृष्णकुंज' निवासस्थानी गेलो. 
''आता कायॅय?,'' राजांनी आम्हाला प्रेमळपणाने ख्यालीखुशाली विचारली. चारचौघे सामान्य जन 'काय चाललंय सध्याऽऽ?'' असे विचारतात, राजांची तऱ्हाच न्यारी! असो. 

''कितीही लाइट घालवली तरी विरोधाचा सूर्य उगवल्याखेरीज राहणार नाही, असे आपण म्हणालात, परंतु त्यात एक मोठी अडचण आहे...,'' आम्ही थेट मुद्द्यालाच हात घातला. 

''किती वाजलेत आत्ता?'' राजांनी थंड सुरात विचारले. 

''बारा!'' आम्ही उत्तरलो. 

''ते दिसतंच आहे तुमच्या चेहऱ्यावर,'' श्रीमान चुलतराज म्हणाले, '' लक्षात ठेवा, विरोधाचा सूर्य 9 मार्च 2006 रोजी पहिल्यांदा उगवला! ग्रहणाचे म्हणाल तर दे दान सुटे गिराण!! कळलं? जय महाराष्ट्र.

Web Title: marathi news marathi websites Dhing Tang