येणारच की अच्छे दिन! (ढिंग टांग!) 

ब्रिटिश नंदी 
सोमवार, 1 जानेवारी 2018

परवा फारा दिवसांनी घरी जुन्या डायरीत पाचशेची जुनी नोट सांपडली! सर्वच जुन्या गोष्टी सुखद भावना निर्माण करत नाहीत. हृदयात कळ आणि डोळ्यात पाणी एकाच वेळी आले. तुम्हालाही अश्‍या जुन्या नोटा न सांपडोत, ही प्रार्थना. 

नव्या वर्षाचे स्वागत आपण साऱ्यांनी खुल्या दिलाने आणि खुल्या हाताने केले पाहिजे. कां की गेले काही वर्षे ऐकिवात असलेले अच्छे दिन अखेर 2018 ह्या साली येणार आहेत. ही वावडी किंवा कुडमुडे भाकीत नसून शतप्रतिशत सत्य आहे. गिलास अर्धा भरलेला आहे की रिकामा? ह्या प्रश्‍नाचे उत्तर आम्ही "हा घ्या रिकामा' असे खळ्ळकन देत असू. पं. राहुलकुमार गांधी ह्यांनी (गुजराथेत) अर्धा भरलेला आहे, असे सांगितले. मा. नमोजी ह्यांच्या मते गिलास अर्धा पाण्याने आणि अर्धा हवेने भरलेला आहे!! येत्या वर्षी तो पूर्णपणे भरेल ह्याबद्दल आमच्या मनीं तरी अजिबात शंका नाही. आपणही ठेवू नये. कारणच तसे आहे... 

गेल्या वर्षभरात आमच्या जीवनशैलीत बरेच बदल झाले. पूर्वीच्या काळी आम्ही केशकर्तनालयात गेल्यावर दारातूनच डोकावत असू. गिऱ्हाईकाच्या दाढीला फेस काढण्यात निमग्न असलेला कारागीर थंडपणे "टाइम लगेगा, बाद में आव' असे सांगत असे. अनेक वेळा बाद में जाऊन आल्यावर एकदा कधीतरी हनुवटीवरून बोटे (निमुळती हं!!) फिरवीत घरी परतण्याचा योग येत असे. तसा अनुभव गेले वर्षभर एटीएममध्येही येत होता, पण तक्रार केली नाही. 

उधारी थकवल्याबद्दल चारचौघांत मोठ्ठ्या आवाजात बोलणाऱ्या शेठ. शामळदास अेंड सन्स (किराणा-भुसारवाले) ह्यांना आम्ही "हरेक के दिन आते हय' असे बाणेदारपणाने सुनावले होते, ते गेल्या वषींच. आमचे ते वाक्‍यही खरे ठरले. शेठ शामळदास आमच्याशी अचानक नम्र, नंब्र आणि नम्रपणे बोलू लागले. -हमकू उधारीने मारा, उनकू जीएसटीने!! हिसाब बराबर!! हल्ली आम्ही त्याच्या कौंटरला टेकून इज्जतीत "रवा घ्या चांगला एक किलो' असे ठणकावून सांगतो. तेव्हा औंदा आपल्याला एटीएममध्ये हव्या तितक्‍या नोटा, आणि दुकानात हवा तितका रवा मिळो, ही सदिच्छा. 

सरत्या वर्षाबद्दल मनात कमालीची कृतज्ञता आहे. सरलेल्या वर्षाने आपल्याला बरेच काही दिले. मुळात पैश्‍यावाचून काही अडत नाही, हे शिकवले. ""बघा, ते जनूभावजी, पीडब्लूडीत खोऱ्यानं ओढताहेत पैसा, नाहीतर तुम्ही...'' हा घरचा टोमणा आताशा बंद झाला आहे. कां की खुद्द जनूभावजीच हल्ली ओढघस्त पावलांनी घरी येऊन केविलवाणे हसत चहाची वाट पाहत सैपाकघराकडे पाहूं लागले. लग्नाला आहेराची पाकिटे नेण्याची कल्पना स्त्रीवर्गालाही दचकवू लागली. (क्‍याश? काय वेड लागलंय का?) नवे रंग ल्यायलेली नोट चुरगळून खिशात कोंबण्याचा प्रकार कंप्लीट बंद झाला. कुणी दोन हजाराची चुरगळलेली नोट पाहिली आहे का? नाही!! 

परवा फारा दिवसांनी घरी जुन्या डायरीत पाचशेची जुनी नोट सांपडली! सर्वच जुन्या गोष्टी सुखद भावना निर्माण करत नाहीत. हृदयात कळ आणि डोळ्यात पाणी एकाच वेळी आले. तुम्हालाही अश्‍या जुन्या नोटा न सांपडोत, ही प्रार्थना. 

औंदा आपणां सर्वांना जुन्या नोटा नाही, पण बख्खळ बिटकॉइन मिळोत ही मन:पूर्वक (व्हर्च्युअल नव्हे!!) शुभेच्छा. ह्या चलनामुळे अनेक लोक व्हर्च्युअली श्रीमंत होत असल्याच्या खबरा आहेत. पूर्वी दातावर मारावयास अडका मिळत नसे, आम्हाला अजून बिटकॉइन बघायलाही मिळालेले नाही. हाच तो बदल!! 

...घाबरू नका. धीर सोडू नका. हेही दिवस जातील! तुमने क्‍या पाया, जो तुमने खोया? यंदा अच्छे दिन येणार ह्याबद्दल खातरी बाळगा. आता सगळ्यांची चांदीच चांदी होणार आहे...आम्ही हे छातीठोकपणे सांगतो आहो, त्याला एक जबर्दस्त कारण आहे. कान इकडे करा!! 

...अहो, सर्वसाक्षी, सर्वशक्‍तिमान, सर्वव्यापी, सर्वआपका अपना सुपरस्टार रजनीकांत राजकारणात येतोय! आणखी काय हवे? बोला, हॅप्पी न्यू इयर!! 

 

Web Title: Marathi News Marathi Websites dhing tang Article