पोलिटिकल दहीहंडी! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
बुधवार, 16 ऑगस्ट 2017

स्थळ : विधिमंडळ आवार, बॉम्बे. 
वेळ : हंडी फोडण्याची. 
पात्रे : आपल्या आवडीची आमदार-नामदारे. 
............................ 

विनोदवीर तावडे मास्तर : (गुर्जीस्टाइलमध्ये) हे पहा, गेल्या आठवड्यात आपण इथं फुटबॉल खेळलो होतो की नाही? 
विधिमंडळ गोविंदा पथकाची मेंबरे : (एका सुरात) होऽऽऽ...गुर्जी! 
तावडेमास्तर : (बोट नाचवत) मज्जा आली होती की नै? 
वि. गो. प. में. : (पुन्हा एका सुरात) नाहीऽऽऽ...गुर्जी!! 

स्थळ : विधिमंडळ आवार, बॉम्बे. 
वेळ : हंडी फोडण्याची. 
पात्रे : आपल्या आवडीची आमदार-नामदारे. 
............................ 

विनोदवीर तावडे मास्तर : (गुर्जीस्टाइलमध्ये) हे पहा, गेल्या आठवड्यात आपण इथं फुटबॉल खेळलो होतो की नाही? 
विधिमंडळ गोविंदा पथकाची मेंबरे : (एका सुरात) होऽऽऽ...गुर्जी! 
तावडेमास्तर : (बोट नाचवत) मज्जा आली होती की नै? 
वि. गो. प. में. : (पुन्हा एका सुरात) नाहीऽऽऽ...गुर्जी!! 

तावडेमास्तर : (दुर्लक्ष करत) तसंच आज आपल्याला इथं दहीहंडी खेळायची आहे, बरं का मुलांनो!! सर्व पक्षांच्या मुलांनी ह्या दहीहंडीत सहभागी व्हायचं आहे! दहीहंडीला धाडसी खेळाचा दर्जा मिळाला असल्याने तुम्हालाही धाडशी व्हावं लागणार आहे!! धाडस हा माणसाचा फार मोठा गुण आहे, मुलांनो!! इथं राजकारण केल्यावर पुन्हा आपापल्या मतदारसंघात जायला धाडस लागतं की नाही? तुमचं ते धाडस कमी पडतं हल्ली, असं दिल्लीतल्या लोकांना वाटू लागलंय!! 

धनाजीराव मुंडे : (बाह्या सावरत) माझ्याइतका धाडशी माणूस आजवर कुणी पाहिलाय का? वाट्टेल ते काय बोलताय? आख्खं सेशन मी नेलंय दणादणा ओढत!! विचारा कुणालाही!! 

दादासाहेब ऊर्फ धाकले धनी : (नेहमीच्या घुश्‍श्‍यात) मग आम्ही काय बैदुलं खेळत होतो का धनाजीराव! म्हणे आख्खं सेशन ओढून नेलं!! भले!! (आणखी चिडून) ही दहीहंडीची काय भानगड काढली आता नवी? तुमच्या त्या कमळवाल्यांचं नवीन काही नाटक असेल तर आपण त्यात नाही, हे आधीच सांगून ठेवतोय!! 

बाबाजी चव्हाणसाहेब : (निक्षून सांगत) हे तेच आहे!! गुजराथेत गर्बा होतो, त्या धर्तीवर ह्यांना दहीहंडी करायची असणार!! मी खेळणार नाही!! 

चंदुदादा कोल्हापूरकर : (चष्म्यातून हसत) असं काही नाही हो! साधा खेळ तर आहे, काय हो नानासाहेब!! 

फडणवीसनाना : (घाईघाईने) हो हो तर...साधा खेळ तर आहे!! पण मी कामेंटरीच करीन! गेल्या वेळेला मी छान कामेंटरी केली होती!! 

तावडे मास्तर : (चिडवत) धनाजीराव, मागल्या वेळेला स्पोर्टशूज आणले नाहीत, म्हणून फुटबॉल खेळला नव्हता तुम्ही!! दहीहंडीला नाही लागत बूट!! 

सुभाषजी देसाई : (चुकीची दुरुस्ती करत) लागतो लागतो!! बूट लागतो, पण दुसऱ्याला!! 

बापटगुर्जी : (पुणेरी सुरात) विनोद होता वाटतं!! हहह!! 

धाकले धनी : (वरच्या हंडीकडे संशयानं बघत) त्या हंडीत काही ठिवलंय की नुसतीच रिकामी!! तुमच्या कर्जमाफीसारखी!! 

फडणवीसनाना : (चतुराईने) दहीहंडीसारख्या विषयात तरी राजकारण नको!! ही दहीहंडी फोडणाऱ्याला बंपर बक्षीस मिळणार आहे, बंपर!! ते बक्षीस त्या हंडीतच ठेवलेलं आहे... तेव्हा आता मागे हटू नका!! आपण सारे गुण्यागोविंदाने गोविंदाचा खेळ खेळू!! मी कामेंटरी करीन, तुम्ही मनोरे रचा!! 

सुभाषजी देसाई : (निरुद्योगी आवाजात) मी राजीनामा दिलाय! मी कसा भाग घेणार? 
तावडेमास्तर : (शिट्टी फुंकत) चला हो आता! भलते फाटे फोडू नका!! चला रे...मनोरा रचा...हर हर महादेव!! 

फडणवीसनाना : (बहारदार कामेंटरी करत) आणि खालच्या थराला काही मावळे उभे आहेत!! मधल्या थरावर काही कांग्रेसवाले दिसताहेत!! कमळवाल्यांचे गोविंदा जमेल त्याला आपल्या थरावर खेचत आहेत!! ज्यांना चान्स मिळालेला नाही, त्यांना चंदुदादा कोल्हापूरकर 'उद्या या, आपण बघू' असे सांगताहेत!!... ते पहा, धनाजीराव झराझरा चढले!! त्यांनी हंडी गाठली!! हंडी फोडली... अरे अरे अरे.... 

धाकले धनी : (संतापून) धनाजीराव हंडीत किती बक्षीस ठेवलंय? सांगा वरुनच!! 

धनाजीराव : (हंडीतून चिठ्ठी काढत) घात झाला, साहेऽऽब!! इथं फक्‍त चिठ्ठी आहे एक!! त्यात लिहिलंय...अभ्यास चालू आहे!!

Web Title: marathi news marathi websites mumbai news Dhing Tang British Nandi