राजधानी मुंबई : अडथळ्यांची शर्यत

Uddhav-Thackeray
Uddhav-Thackeray

निर्णयप्रक्रियेत सहभागी करून घेतले जात नसल्याची तक्रार करताना काँग्रेसने हा नाराजीनामा मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालण्याचे जाहीर केले आहे. जनता उपचारांअभावी तडफडत असताना सत्तेचे खेळ सुरू आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संकटे एकट्यादुकट्याने नव्हे, तर समुहाने येतात यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एव्हाना विश्वास बसला असेल. वैचारिक भिन्नता असलेले तीन पक्षांचे सरकार आकार घेत असताना ‘कोरोना’ जागतिक पटलावर अवतरला. त्यातच चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर आदळले आणि त्यात भर म्हणजे महाविकास आघाडीतील सहकारी पक्षांनीही आवाज काढायला सुरुवात केली. केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपचे राज्यात १०५ आमदार. ते केव्हाही महाराष्ट्राचा ‘मध्य प्रदेश’ करतील, या धास्तीने पछाडलेल्या महाविकास आघाडीला आजवर कोणत्याही सरकारच्या वाट्याला न आलेल्या संकटाला सामोरे जायचे आहे. सरकारचा घटक असलेला काँग्रेस पक्ष मात्र अस्वस्थ आहे. जनता उपचारांअभावी तडफडत असताना सत्तेचे खेळ सुरू आहेत. सोवळेपणाचा आव आणून विरोधी पक्षाला या प्रकाराचे राजकारण करायचे आहे आणि काँग्रेसने तर उघडपणे नाराजीनामा मुख्यमंत्री ठाकरेंच्या कानावर घालण्याचे जाहीर केले आहे. 

राज्यसभा व विधानपरिषदेच्या निवडणुकीत कमी जागा वाट्याला आल्या ही काँग्रेसची खंत. देशपातळीवर स्थान असलेले पृथ्वीराज चव्हाण सत्तेच्या परिघाबाहेर. खरे तर भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी तिन्ही पक्षांनी एक व्हावे ही मूळ कल्पना त्यांची; पण लोकानुनय करता येत नसल्याने ते आज दुर्लक्षित. मुख्यमंत्रिपद सांभाळलेल्या अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरातांकडे पक्षाची धुरा. अशोकरावांना ‘कोरोना’ने गाठले तेव्हा मुंबई गाठण्यासाठी विमान उपलब्ध झाले नाही. असे का झाले याची कल्पना नसल्याचे ते सांगतात; पण काँग्रेस या प्रकाराने दुखावली आहे. सत्तेला पाठिंबा दिल्याची किंमत आता वसूल केली जाणार, याची जाणीव करून दिली जाते आहे.

शिवसेनेतही नाराजी आहे. मुंबई आजवरच्या सर्वात मोठ्या आपत्तीचा सामना करत असताना मराठी माणसाला कायम मदतीचा हात देणारी शिवसेनेची शाखा बंद आहे. आमदार, खासदार आपापल्या परीने जनतेला मदत करत आहेत; पण पक्षाचे मंडळीकरण संपले असून, कंपनीकरण झाल्याने शिवसैनिक तसाही गेली दहा- पाच वर्षे नाराज आहेच. भाजपला भाव न देता पक्षप्रमुख मुख्यमंत्री झाल्याचे या सर्वसामान्य माणसाला कौतुक होते; पण आपले सरकार आले, या आनंदाचे प्रत्यक्ष फायदे व्हायच्या आधीच ‘कोरोना’ने विळखा घातला आहे. मुंबईकर रुग्णखाटांसाठी झगडतो आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनाही उपचारांअभावी प्राण सोडावे लागले आहेत. ऐंशी टक्के समाजकारण करणारी शिवसेना पूर्वी रुग्ण्वाहिका दौडवायची. आज ही समाजसेवेची गाडी सत्तेत रूतली आहे का, असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. मुंबईचे प्रश्न जटिल. भाजप या अनास्थेचा धूर्त वापर करते आहे. सोनू सूद हे या खेळात उभे केलेले प्यादे म्हणे. त्याच्यावर संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडल्यानंतर लगेचच हे कलाकार काँग्रेसमंत्री अस्लम शेखबरोबर ‘मातोश्री’वर हजर होतात, याला काय म्हणावे ?

तीन पायांच्या शर्यतीचे असे होत असावे. त्यातच सरकार नोकरशाही चालवते,अशी टीका होते आहे. मुख्य सचिव कारभार हाकतात. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांना दोषही देऊन उपयोगाचे नाही. ठाकरे राजकारणात नवे नसतील; पण प्रशासनात नवखे आहेत. योग्य वाटेल त्या अधिकाऱ्याकडे अशा वेळी कारभार सोपवला जातो. अजोय महेता हे कामांचा निपटारा गतीने करतात. ते ठाकरे यांचे विश्वासू. प्रत्येक बड्या नेत्याचा त्यांच्यावर भरवसा. पण त्यांची कारकीर्द लांबत चालल्याने त्यांचे कनिष्ठ नाराज आहेत. संजयकुमार यांची सेवाज्येष्ठता अधिक. सीताराम कुंटे तर ठाकरेंच्या विश्वासातले. प्रवीण परदेशींना मुंबईतील अनागोंदीमुळे बदलले गेले; पण आता तर अवघे राज्य ‘कोरोना’मय झाले.

विलासराव देशमुख म्हणत, ‘मी आघाडी सरकार चालवताना आधी डावीकडे पाहतो, मग उजवीकडे अन्‌ मग रस्ता ओलांडतो.’ उद्धव ठाकरे यांना वर केंद्राकडेही पाहावे लागणार आहे. निधी केंद्राकडून हवा आहे, मदतही हवी आहे. सदस्य विधान परिषदेवर पाठवायचे आहेत. तिन्ही पक्षांना समान वाटप हवे आहे. प्रस्ताव ५ :४ : ३ असा आहे. काँग्रेस तीन जागांवर समाधान मानणार नाही. आमदारसंख्या कमी असली तरी पाठिंब्याची किंमत वसूल करायची हीच ती वेळ असे त्यांना वाटते.

आपत्ती - नैसर्गिक अन् राजकीयही

  • काँग्रेस पक्षात अस्वस्थता.
  • रुग्णखाटांअभावी मुंबईकरांची परवड
  • मुख्य सचिवांच्या मुदतवाढीवरुन मतभेद.
  • राजकीय परिस्थितीचा फायदा उठवण्याचे भाजपचे प्रयत्न
  • राज्यपालनियुक्त आमदारांच्या जागेसाठी घटक पक्षांत रस्सीखेच.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com