राजधानी मुंबई : फैलावाच्या दाहीदिशा...

Corona-Secure
Corona-Secure

जो बेघर है तूफान में, वो महज प्यादे है, महफूज सारे बादशाह, वजीर और शहजादे है... ही आहे सच्चाई आजची. महाराष्ट्राचा सन्मान असलेली महानगरे महामारीच्या विळख्यात सापडली होतीच. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे ही महाराष्ट्राची शान वाढवणारी नगरे. तिथे येणारे परदेशी प्रवासी संख्येने विपुल. त्यांचे विलगीकरण वेळीच केले असते, तर रोग फैफावला नसता. पाचशे रुग्ण सापडले तेव्हा त्यांच्या संपर्कात आलेल्या आठ- दहा जणांना जरी वस्तीतून बाहेर आणले असते, तरी घनदाट वस्तीची मुंबई न्यूयॉर्कच्या वाटेने गेली नसती. मरणभय पसरलेल्या भागांमधून लोकांचे लोंढे गावाकडे निघाले आहेत. ‘एमएमआर’मध्ये गेल्या दहा वर्षांत राज्यातून स्थलांतर होते आहे. आज ही मंडळी गावी पोहोचताच त्या त्या जिल्हयात रुग्णांची संख्या वाढली आहे. राज्यातले आकडे वाढताहेत. गावात स्वातंत्र्योत्तर काळात आरोग्यव्यवस्था पोहोचलीच नाही. त्यामुळे छोटया तालुक्‍यात उपचार कसे होणार, हा प्रश्न येत्या काही दिवसांत भडकू शकेल.

गावात रोजगार नाही, त्यामुळे भूकबळी वाढतील. पण भयभीत लोक गावी निघाले आहेत. कारण महानगरात आता बड्यांनाही रुग्णालयात प्रवेश मिळत नाही. दोन- अडीच कोटी लोकसंख्येच्या मुंबई प्राधिकरणात रुग्णालये बोटावर मोजण्याएवढी. सरकारी रुग्णालये कमी. बारा हजार रुग्णखाटांत सारा समाज बरा करायचा विडा राज्यकर्त्यांनी उचललेला. येथील माणसे म्हणजे यंत्रे नव्हेत. ती आजारी पडू नयेत यासाठी मोकळी मैदाने, रुग्णालये आवश्‍यक असतात ती उभारण्याची गरज किंवा भान कुणाला ? इंच इंच लढायचे ते ‘एफएसआय’साठी. परस्परांवर दुगाण्या झाडणारे इमारती उभ्या करण्यासाठी एकत्र. गल्ला गोळा करून देणारे अधिकारी मुंबईचे कारभारी होतात असा सामाजिक संस्थांचा, कामगार संघटनांचा आरोप. तर अशा नेपथ्यात महामारी प्रवेशली तर जे होईल तेच सध्या घडतेय. ‘कोरोना’ घरादाराच्या उंबरठयावर उभा आहे. हा रोग आपल्याला होईल काय या भीतीइतकीच प्याद्यांना, नागरिकांना  चिंता आहे ती आपल्याला  ‘कोरोना’  झालाच तर रुग्णालयात एक खाट तरी  मिळेल काय ही. मरण दारावर उभे असताना रुग्णालयात ना धनवानांना जागा मिळतेय, ना गरिबांना.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

महिन्याआधी जे करता आले असते ते आता सुरू आहे. ‘बीकेसी’त रुग्णालय उभारणार आहेत. मुंबईतल्या ऐतिहासिक जागा, नेहरू सेंटर असेल, महालक्ष्मी रेसकोर्स असेल, ताब्यात घेऊन, खाटा टाकून रुग्णांना दिलासा देण्याच्या मोहिमा हाती घेतल्या जात आहेत. उत्तम आहे. फक्त तिथे दाखल होण्याचा मुहूर्त कोणता त्याची माहिती जनतेला हवी आहे. 

शिवसेनेतले शहजादे, वजीर, बादशहा उपयोगी पडत नसल्याने संख्येत क्रमांक एकवर असलेला भारतीय जनता पक्ष सक्रिय झाला आहे. निवेदने, अर्ज, विनंत्यांना दाद दिली जात नसल्याने आता जाहीरपणे फलक उभारले गेले आहेत. लोक गोळा करण्याची नेहमीची धडपड यावेळी गरजेची नाही. कारण ‘हे अंगण हेच रणांगण’ आंदोलन आहे. ‘कोरोना’मुळे गर्दी जमवण्यावर बंधन आले आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी विरोधी पक्षांची मोट बांधून आंदोलन करीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या रूपाने भाजपने प्रत्युत्तर दिले, तर ‘सारेच हमाम में आहेत’ एवढेच म्हणावे लागेल. खरे तर भाजपने आघाडी सरकारला या मुद्यावर रोज पाच प्रश्‍न विचारायला हवे होते. जनतेच्या प्रश्‍नांना तशी वाचा फोडणे योग्य ठरले असते. आंदोलनाची ही वेळ नव्हे असे ऐकवणाऱ्यांना या प्रश्‍नांकडे पाहा, असे त्यांना सांगता आले असते. जनतेला मात्र या प्रकारांसाठी सध्या उसंत नाही. कारण आंदोलनांपेक्षा त्यांना जीव प्यारा आहे. वजिरांनी आपापल्या बादशहा, शहजाद्यांची भलामण न करता जरा आमच्याकडे पाहावे, अशी अपेक्षाही गरीब प्यादी आताशा बाळगत नाहीत. कारण त्यांना वजिरांची अर्थकारणे माहीत आहेत.

‘कोरोना’ग्रस्तांची गती अत्यंत वाईट आहे. रुग्णालयात जागा नसल्याने आता घरीच काळजी घ्या, असे सांगून पाठवणी केली जाते आहे. मुंबईतल्या तब्बल ७० डॉक्‍टरांना, राज्यातल्या ४०० पोलिसांना ‘कोरोना’ची लागण झाली आहे, तरीही तरुण- तरुणी जिवावर उदार होऊन उपचार करताहेत. खासगी डॉक्‍टर आधी जरा दूर होते, आता तेही या लढयात उतरले आहेत. नर्स, दाया अहोरात्र लढताहेत. सरकारी सेवेत कायम झालेल्या सर्व संघटनांशी संबंधित कर्मचारी मात्र दुरून कामावर यायचे कसे हा प्रश्न करताहेत. त्यांच्यासाठी लोकल सुरू करा, अशी महाविकास आघाडी सरकारची मागणी आहे. लोकल सुरू होईल तेव्हा होईल, आज सरकारने या कर्मचाऱ्यांची निवासव्यवस्था करून त्यांची उपस्थिती अनिवार्य करणे आवश्‍यक आहे. भाजपनेही या कामात सरकारला मदत करावी. भाजपच्या आंदोलनाचा महाविकास आघाडीने अपेक्षेप्रमाणे समाचार घेतला. हे करतानाच नागिरकांना दिलासा देणारी कामे सुरू केली तर बरे होईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंत्र्यांनी रोज मंत्रालयात हजर व्हावे, जनतेशी संवाद साधावा अशा सूचना दिल्या आहेत. त्याचे पालन ‘कोरोना’काळात होणे अपेक्षित आहे.

मुंबई परिसरातून महाराष्ट्रात विखुरलेले अभागी तेथील रोगमुक्त वातावरण बिघडण्यास हातभार लावत नाहीत ना, याकडे आता आरोग्य यंत्रणेने लक्ष द्यावे. महामुंबईचे वैभव सर्वदूर पसरले नाही, परदेशी रोग मात्र कानाकोपऱ्यात शिरेल अन्‌ मग सगळे राज्य आजारी पडेल. मालेगाव, नाशिक, नगर, पाठोपाठ मराठवाडयातील सिल्लोड, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोलीत संख्या वाढते आहे. आंदोलनांची भाषा ‘कोरोना’ला समजत नाही हे सगळ्याच राजकारण्यांनी समजून घेतलेले बरे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com