राजधानी मुंबई  : स्वबळाचा गजर

मृणालिनी नानिवडेकर
Saturday, 10 October 2020

गेले सहा महिने हे सरकार औटघटकेचे आहे, याच मनोवस्थेत वावरण्याची सवय भाजपच्या नेत्यांना जडली आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी स्वबळावर पुढील निवडणूक लढण्याची तयारी ठेवा, असे सांगून या नेत्यांना वास्तवाची जाणीव करून दिली.

गेले सहा महिने हे सरकार औटघटकेचे आहे, याच मनोवस्थेत वावरण्याची सवय भाजपच्या नेत्यांना जडली आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी स्वबळावर पुढील निवडणूक लढण्याची तयारी ठेवा, असे सांगून या नेत्यांना वास्तवाची जाणीव करून दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महाविकास आघाडी सरकारचे विसर्जन शक्‍य नाही, हे भारतीय जनता पक्षाच्या लक्षात आलेले दिसतेय किंवा निदान तसे वाटते. हे वाटणे आभासी की सत्य, असा प्रश्न नेत्यांना पडला असेलच, याचे कारण गेले सहा महिने हे सरकार औटघटकेचे आहे, ते केव्हाही पडेल, याच मनोवस्थेत वावरण्याची सवय बड्याबड्यांना झाली आहे. भाजपचा विरोध या एकमेव भावनेने जे सरकार तयार झाले, ते भाजप पुन्हा सत्तेत येण्यासाठी फुटेलच कसे? पण, तर्कशक्ती खुंटीला लावून गेले सहा-आठ महिने स्वत:लाच दिला जाणारा दिलासा कामाचा नाही, हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रसाद नड्डा यांनी राज्य कार्यकारिणीच्या लक्षात आणून दिले आहे. आता यापुढची निवडणूक भाजपला स्वबळावर लढायची असल्याने कामाला लागा, असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले आहे. ते नेत्यांना सांगितले असेलच. तसे समजावले असेल तर ते बरे. कोरोना संपले की सरकार पडेल, आता बिहार झाले की पडेल किंवा त्याआधीही पडू शकेल, अशी भाषा भाजपनेते कायम वापरत. विसरत की सत्ता तसाही फेव्हिकॉलचा जोड, तो तुटता तुटत नाही. 

भाजपचा साहसवाद
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा तीनपैकी एकाही पक्षातून दोनतृतीयांश सदस्य बाहेर पडण्याची शक्‍यता नाही. प्रत्येक पक्षातल्या सहा- सात सदस्यांनी बाहेर पडायचे ठरले तर अठरा-वीस ठिकाणी पोटनिवडणुका जनतेला मान्य होतील का? आमदार पुन्हा निवडणुकीसाठी पैसे खर्च करायला तयार होतील का, असे अनेक प्रश्न. मध्य प्रदेशात पोटनिवडणूक होते आहे; पण तेथील राजकारण द्विध्रुवीय. महाराष्ट्रात भाजपच्या साहसवादाला अटकाव करण्यासाठी त्या त्या मतदारसंघात दुखावलेल्या तिघांनी एकच संयुक्त उमेदवार उभा केला तर? एकुणात काय सर्व पर्यायांचा विचार केला, तरी नवी रचना प्रत्यक्षात येणे दुरापास्तच. सर्वाधिक जागा जिंकलेल्या पक्षाने अशा आडवाटेच्या ‘पतल्या गली’तून निघून जाण्याचा विचार न करता सरळ लढायचे असते. भाजपच्या नव्या अध्यक्षांनी थेट सामना करू, असे सांगितले असेल, ते पक्षात प्राण फुंकण्यासाठी. पंतप्रधान मोदींना चहावाला संबोधून दररोज त्यांना लाखोली वाहणाऱ्या एकेकाळच्या आपल्या शिवसेनेशी हातमिळवणी करणे भाजपच्या कार्यकर्त्यांना सोडाच; मतदारांना तरी रुचेल काय?

मुंबईत उत्तम पायाभूत उभ्या करू न शकणाऱ्या शिवसेनेला पर्याय उभा राहिला तर जनता नाकारते, हे गेल्या महापालिका निवडणुकीत भाजपने बरोबरीत जागा जिंकून अनुभवले होतेच. सत्तेच्या मांडवाखालून गेलेल्या अन् जिंकूनही विरोधी बाकांवर पोहोचलेल्या भाजपला ‘राष्ट्रवादी’ आपल्याकडे येईल, असेही वाटत असावे, असे दिसते. ज्या पक्षाला एकेकाळी भ्रष्टाचाराच्या आरोपावरून गुन्हेगार भासवण्यात धन्यता मानली, त्यांच्यासमवेत जाणेही मतदारांना आवडेल? सत्तातुरांणाम्‌... हे खरेच; तरीही ‘पार्टी विथ डिफरन्स’ला हे शोभेल काय? राज्यातल्या नेत्यांना या प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत की नाहीत, ते ठाऊक नाही. पण, राष्ट्रीय नेत्यांनी ती सांगितली असावीत, असे वाटते. जिंकूनही सत्तेपासून दूर फेकले जाणे, भाजपला अनुकूल लाट निर्माण करू शकेल. मात्र, त्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागेल. ‘राष्ट्रवादी’कडे उत्तम नेते आहेत, तर शिवसेनेकडे मराठी मतदार. भाजपकडे तुलनेने तयार नेते कमीच. नीचांकी जागा जिंकणाऱ्या काँग्रेसकडेही भाजपपेक्षा चांगले नेते आहेत.

बॅक टू बेसिक्‍स
कोरोनाच्या लढाईत भाजप काम करीत राहिली. पक्ष, संघपरिवार मदतकार्यात गुंतला. सरकार नेतृत्वाच्या नवखेपणामुळे प्रभाव पाडू शकले नाही. अशा स्थितीत डाव नव्याने मांडण्याची तयारी सर्वांत महत्त्वाची. ती सुरू करा, लढा, असे सांगत अध्यक्ष नड्डांनी संघटनेत प्राण तर फुंकले. आता बाहेरून आलेल्या नव्यांचे स्तोम मर्यादेबाहेर आडमाप वाढवणे थांबवून ‘बॅक टू बेसिक्‍स’ म्हणायची गरज आहे. आघाडीचे सरकार अंतर्विरोधामुळे तुटेल, हे वारंवार सांगणे भाजपने टाळावे. स्वबळावर जिंकू, असे निदान कार्यकर्त्यांमध्ये जोम येण्यासाठी तरी म्हणावे. युद्ध कार्यकर्त्यांच्या बळावर लढायचे असते. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article mrunalini naniwadekar