राजधानी मुंबई : ऊर्जाकेंद्रांवर गंडांतर

मृणालिनी नानिवडेकर
Saturday, 11 April 2020

मुंबई, पुणे हे महाराष्ट्राच्या शिरपेचातले तुरे. उत्पन्न वाढवणारी ही केंद्रे आज आजारी आहेत, जर्जर. शासकीय रुग्णालयात पाय ठेवायला जागा नाही अन्‌ खासगी रुग्णालये संसर्गभीतीने कुणाला पाय ठेवू देत नाहीत. सारे काही कोरोनाग्रस्त. कुणी बापडा शिंकला तरी या श्रीमान भागांमध्ये घबराट पसरते आहे. समृद्धीचे टापू भीतीने गलितगात्र झाले आहेत. थोरथोर मंडळी घाबरली आहेत. रिमोट कंट्रोलने राजवट हलवणारे घर आता राज्याच्या प्रमुखाचे निवासस्थान झाले आहे.

मुंबईचे जगण्याचे स्पिरीट हा खरंतर अगतिकतेचा प्रतिशब्द आहे. यावेळी ते दाखवणारा सकल समाज गोठला आहे. एमएमआरडीए शांत आहे, लागण मोठी आहे, फैलाव प्रचंड आहे. पुणेही मागे नाही. उत्पन्न वाढवणारी ही केंद्रे आज आजारी आहेत...

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुंबई, पुणे हे महाराष्ट्राच्या शिरपेचातले तुरे. उत्पन्न वाढवणारी ही केंद्रे आज आजारी आहेत, जर्जर. शासकीय रुग्णालयात पाय ठेवायला जागा नाही अन्‌ खासगी रुग्णालये संसर्गभीतीने कुणाला पाय ठेवू देत नाहीत. सारे काही कोरोनाग्रस्त. कुणी बापडा शिंकला तरी या श्रीमान भागांमध्ये घबराट पसरते आहे. समृद्धीचे टापू भीतीने गलितगात्र झाले आहेत. थोरथोर मंडळी घाबरली आहेत. रिमोट कंट्रोलने राजवट हलवणारे घर आता राज्याच्या प्रमुखाचे निवासस्थान झाले आहे. तिथला चहावालाच संसर्गग्रस्त आहे. मरणभय सर्वत्र पसरले आहे. संशयित रुग्ण संसर्गग्रस्त म्हणून आढळण्याचे प्रमाण राज्यात सर्वाधिक आहे अन्‌ त्या रुग्णांच्या मृत्यूदराने चीनलाही मागे टाकले आहे. तेथे ४ टक्‍के कोरोनाग्रस्त रुग्ण दगावले.

महाराष्ट्रात ही टक्केवारी ७.१ टक्‍के एवढी आहे. कोरोनाची साथ येत्या तीन ते चार दिवसांत अधिक फैलावणार, असे प्रशासन सांगते आहे. इटालीच्या ११ टक्‍क्‍यांची बरोबरी न होवो यासाठी आरोग्ययंत्रणा सर्वशक्‍तीनिशी प्रयत्न करते आहे. धारावी तर सतत चर्चेत असलेला बकाल दारिद्य्राचे बहुचर्चित उदाहरण; मात्र महाविकास आघाडीतल्या मंत्री आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात वरळीत कोरोनाने पाय पसरले आहेत. कोळीवाडे, कामगारांना आश्रय देणाऱ्या बीडीडी चाळी, एवढेच नव्हे तर श्रीमंत वस्त्यांनाही रोगाने वेढले आहे. शासनप्रमुख उद्धव ठाकरेंना परिस्थितीचे भान असेलही; पण काही मंत्री विरोधात लिहिणाऱ्यांना बंगल्यावर बोलावून मारण्यात गुंतले आहेत. धनवानांना थंड हवेच्या ठिकाणी जाता यावे यासाठी पास देण्यात अधिकारी मग्न आहेत. असल्या प्रकारांना आवर घालता न येणे राज्याच्या प्रमुखांना परवडणारे नाही; पण कोरोना साथीचे राजकीय जमा-खर्च नंतर. 

तीन पक्षांच्या मेळ्याऐवजी दोघांची हिंदुत्ववादी युती जरी सरकारमध्ये असती तरी परिस्थिती वेगळी राहिली नसतीच. प्रशासन तेच अन्‌ प्रयत्न करणारे तेच अन्‌ सुविधांचा अभावही तोच. दुःखद, हृदयद्रावक. वस्तीवस्तीतले संशयित दवाखान्यात पोहोचताहेत. मुंबई काय, नवी मुंबई काय अन्‌ पुणे काय? अवस्था सारखीच. राज्यातले अन्य प्रदेश या दोघांच्या प्रगतीकडे कायम असूयेने पाहत. रोजगारनिर्मितीचे प्रमाण वाढते. दोघांचा तोरा अन्‌ सरासरी उत्पन्नातली झेप त्यांचा दिमाख वाढवी. आज हे सगळे आजारी आहे, अत्यवस्थ. चाचणी केंद्रांअभावी रुग्ण उपचारांसाठी उशिरा दाखल होताहेत. या महानगरांना मधुमेह, उच्चरक्तदाब या ‘श्रीमंत’ लाईफस्टाईल आजारांनी वेढले होतेच. प्रामुख्याने त्यातलेच लोक कोरोनाने मरताहेत. दीड-दोन मिनिटं हात धुवा अन्‌ कोरोनाला पळवा, हा साधा उपाय पाण्याच्या गॅलनमागे २५ रुपये मोजाव्या लागणाऱ्या धारावीसाठी प्रचंड महागडा आहे. हात धुवायचे म्हटले तर घरात जागा नाही अन्‌ सार्वजनिक शौचालयात जायचे ठरवले तर किमान २५ जण आधीच रांगेत. एकेका पन्नास बाय दोनशे फुटांच्या घरात १०, १२ डोकी राहताहेत. काहीकाही ठिकाणी तर अर्ध्या दिवसात वेगळी मंडळी राहतात अन्‌ अर्धा दिवस वेगळी. या धारावीचे अन्‌ बीडीडी चाळींचे पुनर्वसन करण्याचे प्रयत्न कमी का झाले? प्रत्येक सरकारने आपल्या सोयीचे बांधकाम व्यावसायिक आत आणले. करार तेवढे झाले, पण वस्ती बदलली नाहीच. 

आज देशाच्या अर्थव्यवस्थेत मोलाचे योगदान देणारी ही मंडळी आजारी आहेत. दूरवरच्या गरीब अभावग्रस्त गावाच्या कुशीत निघून जाण्याच्या प्रयत्नातले स्थलांतरित कुठेकुठे अडकले आहेत. त्यांना कसेबसे जेवण मिळतेय, पण त्यांना घरी जायचेय. ते बरे तरी आहेत; पण कोरोना संशयित तर ना खात्रीदायक आजारी आहेत ना बरे. कस्तुरबा रुग्णालय हे मुंबईतल्या चाचण्यांचे तसेच उपचारांचे महाकेंद्र. तेथे दिवसाला २०० कोरोना चाचण्या होऊ शकतात; पण नमुने जमा होताहेत ४००० ते ५०००. रांगेत लागले कटोरा घेऊन तर अन्न मिळते, पण चाचणीचे अहवाल? ते मिळणे शक्‍य नाही. ‘आप कतार में हो’ असे सांगायलाही कुणाला फुरसत नाही. वाईट वाटून घेण्याचे कारण नाहीच. कारण उपचार करण्यासाठी रात्रंदिवस खपणाऱ्या डॉक्‍टरांना, त्यांच्या सहायकांना तर स्वत:चे रक्षण करण्यासाठी आवश्‍यक असणारे कपडे नाहीत, मास्क नाहीत. संपन्न टापूंची ही हकिकत आहे. करुण. पण तरीही रडून भागणार नाही. कारण कोरोनाने मारले नाही तरी अर्थव्यवस्था छळेल. रोजगार हरवणार आहेत.

धनिकांनाही येत्या आठवड्यात किराण्याची चणचण भासू लागेल. माल पोहोचवणारे ट्रक बंद आहेत. रेशनवर ज्यांचे पोट आहे त्यांना दुकानात काहीही फारसे मिळत नाहीये. त्यांची असली-नसली क्रयशक्ती संपणार हे सरळ दिसते आहे. पण दुखणे लक्षात आले तरी लगेच उपचार करणे शक्‍य नाही. राज्याला उत्पन्नात चाळीस हजार कोटींची तूट सोसावी लागणार आहे. माथाडी गावी गेले आहेत, ते आल्याशिवाय माल वितरित करणे अशक्‍य आहे. संसर्गसंख्येने अधिकारी निराश झाले आहेत, मृत्यूदराच्या आकड्याने गोठले आहेत. रुग्णालयातील संसर्ग मृत्यूचे कारण ठरत असावा, अशी शंका घेतली जाते आहे.

कोरोना आधीचे आणि नंतरचे वास्तव कमालीचे वेगळे असेल. मुंबईचे जगण्याचे स्पिरीट हा खरंतर अगतिकतेचा प्रतिशब्द आहे. यावेळी ते दाखवणारा सकल समाज गोठला आहे. एमएमआरडीए शांत आहे, लागण मोठी आहे, फैलाव प्रचंड आहे. पुणेही मागे नाही. नेते फेसबुकवर बैठका करीत आहेत. निर्णयांचे मैदान अधिकाऱ्यांसाठी खुले करून. सरकारी सेवेतले डॉक्‍टर लढताहेत, खाजगींचे दवाखाने काही अपवाद सोडून बंद आहेत. माणसे उंदरांप्रमाणे घराच्या पिपात बिळात शिरली आहेत. ती न मरोत, पण आज मनुष्यवैराण सुनसान महानगर आपुले सामूहिक मरण अनुभवते आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article on Transfer of energy centers