प. बंगालचा महाराष्ट्रासाठी अन्वयार्थ

स्वातंत्र्यलढ्यातले योगदान, प्रखर वैचारिक भूमिका, संस्कृतीचा जाज्वल्य अभिमान, कलासक्त जीवन अशा अनेक गोष्टींत पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात साधर्म्य आहे.
devendra fadnavis
devendra fadnavisSakal

स्वातंत्र्यलढ्यातले योगदान, प्रखर वैचारिक भूमिका, संस्कृतीचा जाज्वल्य अभिमान, कलासक्त जीवन अशा अनेक गोष्टींत पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात साधर्म्य आहे. मात्र मराठी-वंग ऐक्याची ‍भूमिका आळवण्याचा सध्याच्या राजकारणात जो प्रयत्न होतो आहे, तो मात्र अस्थानी आहे. ममता बॅनर्जींचा विजय ही घटना राष्ट्रीय राजकारणात खचितच महत्त्वाची; पण महाराष्ट्रावर त्याचे कितपत परिणाम होतील? दोन मेच्या निकालांनंतर जिंकलेल्या भाजपचे वारू चौफेर उधळतील, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावली जाईल, असे कित्येकांना वाटे. तसे छातीठोकपणे बोलले जाई. या कित्येकात भाजपसमर्थक आणि विरोधकही सहभागी होत. तसे काही होईल, असे दिसत नाही. राष्ट्रपती राजवटीची शिफारस न्यायालयात टिकणारी नसते, हे भाजपची नेतेमंडळी जाणून असावीत. त्यामुळे आपले सरकार कोसळणार, या मानसिकतेतून बाहेर येणे महाविकास आघाडीच्या नेत्यांसाठी श्रेयस्कर. कोविड व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करणे उचित. शिवाय ममता बॅनर्जींचा विजय झाला म्हणजे आपलाही झाला, असे मानून स्वत:लाच चुचकारणे सपशेल चूक.

नव्या आघाडीची चर्चा

ममता बॅनर्जींच्या प्रचाराला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जाऊ शकले नाहीत. अन्यथा राष्ट्रीय राजकारणात नवी आघाडी उभी रहात असल्याचे संकेत या निवडणूक प्रचारातून मिळाले असते. ही आघाडी यथावकाश तयार झालीच, तर ती जशी भाजपविरोधात आहे, तशीच काँग्रेसविरोधात असेल का, हेही स्पष्ट होणे गरजेचे ठरेल. निकालांपूर्वी कोविड स्थितीमुळे माध्यमांवरील विश्लेषण कार्यक्रमात सहभागी होणार नाही, असे कळवणाऱ्या काँग्रेसने निकालांनंतर जी सक्रियता दाखवली, ती मजेदार वर्गात मोडणारी होती. प. बंगालमध्ये आपला पक्ष ममतादींदींच्या विरोधात होता, आपला एकही आमदार निवडून आलेला नाही, केरळ, आसाम, पुदुच्चेेरीतही कामगिरी खालावली, हे गावीही नसलेले महाराष्ट्रातले नेते जेत्याच्या आवेशात विधाने करीत होते. दुसऱ्याच्या यशाचा डिंडोरा पिटण्याचा देवेंद्र फडणवीसांचा टोमणा काँग्रेसजनांना समजला असावा. देशभरात काँग्रेसला उभारी आल्याशिवाय भाजपेतर आघाडीला अर्थ रहाणार नाही. देशात २० टक्के मते बाळगणाऱ्या काँग्रेसला वेळीच बदल करता आले नाहीत, तर प्रादेशिक पक्ष एकत्र आघाडी उभारून प्रमुख विरोधकाची जागा घेतील, हे या पक्षाला समजते आहे काय? प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रवक्त्यांच्या वाक्बाणांपेक्षा जमिनीवरील कृती महत्त्वाची असते, हे लक्षात घेतलेले बरे. काँग्रेसच्या हातातून काय काय गेले, याचा लेखाजोखा न मांडता भाजप विजयी न झाल्याने हर्षवायू झालेल्या काँग्रेसच्या वाचाळ नेत्यांचे देव भले करो. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चुका त्यांनी जरूर लक्षात आणून द्याव्यात; पण त्याचबरोबर कोविड व्यवस्थापनासाठी आपण काय काय केले, तेही सांगावे. सध्या महाराष्ट्रातील जनतेला अशा उपक्रमांचे अधिक कौतुक वाटेल.

राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का

राष्ट्रवादी काँग्रेससाठीही निकालाचा दिवस चांगला नव्हताच.पश्चिम महाराष्ट्राच्या बालेकिल्ल्यात चंद्रभागेकाठी पंढरपुरी कमळ फुलले तेही आमदाराच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत. हा धक्का मोठाच आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या निकालामागची कारणे नक्कीच खोलात जाऊन शोधत असतील. गाजावाजा न करता निवडणूक लढणे फायद्याचे असते, हे भाजपलाही समजले असेल. बाहेरच्या उमेदवाराला आपला मानून शक्ती देण्याचे हे प्रयोग भविष्यात यशस्वी ठरवण्याचे मनसुबे भाजप आता सर्वत्र आखत असेल.

अर्थात प. बंगालचा निकाल सर्वाधिक महत्त्वाचा आहे तो शिवसेनेसाठी. ममता बॅनर्जींशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. येथील गुंतवणूकदारांना प. बंगालात या, असे आवाहन करण्यास त्या मुंबईत आल्या, तेव्हा उद्धव ठाकरे आणि आदित्य त्यांना भेटण्यास गेले. ठाकरे कुटुंबाची अपेक्षा असते ती नेता कितीही मोठा असला तरी त्याने ‘मातोश्री’त यावे अशी. तो हट्ट दूर सारून ठाकरे हॉटेल ‘ताज’मध्ये दीदींना भेटायला गेले, यात काय ते आले. निकालांनंतर उद्धव यांनी ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन करणारे पत्रक काढले. पण त्या पत्रकात भाजपवर केलेली आगपाखड मर्यादित होती. यातून उद्धव ठाकरे यांनी आपण भाजपला, केंद्रातल्या त्यांच्या राजवटीला उठताबसता ललकारणार नाही, असा पवित्रा घेतलेला दिसतो. सध्या लढाई कोविडशी आहे, केंद्राची मदत आवश्यक आहे, हे त्यांना ठाऊक आहे. अर्थात, शिवसेनेचे पक्षप्रमुख या भूमिकेतून त्यांना निकालांकडे वेगळ्या नजरेने पहावे लागेल. देशात प्रादेशिक नेते शक्ती असेल तेथे विजयी झाले आहेत.

पण हे बहुतेक नेते सगळेच काँग्रेसच्या मंडपातून बाहेर पडलेले. उद्धव ठाकरेंचे तसे नाही. काही वेळा काँग्रेसची मदत घेतली असली, तरी शिवसेनेचे राजकारण हे मूलत: काँग्रेसविरोधाचे आहे. भाजपपासून दूर गेल्यानंतरचे आपले स्थान काय, हे शिवसेनेला येत्या लोकसभा निवडणुकीत शोधावे लागेल. काँग्रेस-‘राष्ट्रवादी’शी केलेली राजकीय तडजोड भाजपविरोधापोटी होती. ममता बॅनर्जी बंगालात स्वत:चे स्थान प्रयत्नपूर्वक मिळवत्या झाल्या. त्या आत्मनिर्भर आहेत. बंगाली आत्मसन्मान स्वबळावर उभा आहे. महाराष्ट्राचे तसे नाही. ‘मनसे’चे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ममतादीदींचे अभिनंदन करताना वंग-महाराष्ट्राची साम्यस्थळे आवर्जून लिहिली; पण मराठी मुलखासमोरची आव्हाने वेगळी आहेत हे शिवसेना पक्षप्रमुख जाणून असावेत. ममता बॅनर्जींना विजयाचे समीकरण माहीत होते. उद्धव ठाकरे यांना ते गवसले आहे का, हे पाहाणे उत्सुकतेचे आहे. येथे महाविकास आघाडीतले तिघे एकच उमेदवार देऊ शकतील का? महापालिका निवडणुकांचे घोडामैदान जवळ आहे. भाजपला रोखण्याचा यशस्वी सल्ला देऊ शकणाऱ्या प्रशांत किशोर यांना एव्हाना निमंत्रण पोहोचले असेलही. ते आडून सल्ला देतात का ते पहायचे. देशासाठी सर्वांत महत्त्वाच्या निवडणुका उत्तर प्रदेशाच्या आहेत, महाराष्ट्रात ते स्थान मुंबई आणि अन्य महापालिकेच्या मतदानाचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com