esakal | आव्हान सुरक्षेचे आणि चकमकफेम खंडणीखोरांचे  
sakal

बोलून बातमी शोधा

सचिन वाझे यांची मर्सिडिस कार

मुंबईतील २६ /११ च्या शौर्यगाथा कुणी कितीही गायल्या तरी पाकिस्तानी बोटीतून आलेले १० दहशतवादी मुंबईच्या रस्त्यावर अंदाधुंद गोळीबार करत मन:पूत हिंडले हे कराल वास्तव. राज्याला लाजिरवाणे. बेपर्वाईने झालेल्या अशा चुकांतून धडे घ्यायचे असतात.

आव्हान सुरक्षेचे आणि चकमकफेम खंडणीखोरांचे  

sakal_logo
By
मृणालिनी नानिवडेकर

मुंबईतील २६ /११ च्या शौर्यगाथा कुणी कितीही गायल्या तरी पाकिस्तानी बोटीतून आलेले १० दहशतवादी मुंबईच्या रस्त्यावर अंदाधुंद गोळीबार करत मन:पूत हिंडले हे कराल वास्तव. राज्याला लाजिरवाणे. बेपर्वाईने झालेल्या अशा चुकांतून धडे घ्यायचे असतात. भविष्यात असे काही घडू नये, यासाठी यंत्रणा उभी करायची असते. जनतेची काळजी घेणारे कर्मचारी-अधिकारी योग्य ठिकाणी नेमायचे असतात. त्यांच्या हाती कायदा- सुव्यवस्था राखली जाईल, याची द्वाही जनतेत फिरवण्यापूर्वी स्वत:शीच खातरजमा करून घ्यायची असते. महाविकास आघाडी सरकारला हे करता आलेले नाही. त्यामुळे सरकारला टीकेचे धनी व्हावे लागते आहे.

सचिन वाझे यांच्यावर कोठडीतील आरोपीला तेथेच मारून प्रेताची विल्हेवाट लावल्याचा आरोप होता. अशा अधिकाऱ्याला सेवेत परत घेण्याचा निर्णय घेतला गेला. ‘कोविड’चे कारण पुढे केले गेले. अवघे राज्य जगण्याच्या विवंचनेत असताना कुण्या अभिनेत्याच्या आत्महत्येचे प्रकरण राजकीय झाले. वाहिन्यांनी ते उचलले. खोटेनाटे आरोप चारित्र्यहननाच्या पातळीवर जात होते. मुंबई पोलिसांच्या प्रतिमेवरच प्रश्नचिन्हे निर्माण केली जात होती. अधिकारी मग कारवाईला पुढे सरसावले, अन् हिशेब चुकते होऊ लागले. हे सारेच भयावह होते. चकमकीतल्या रक्ताला चटावलेले अधिकारी सरसावले, अन् मग सगळेच अधिकार आपल्या हातात आल्यासारखे चेकाळले. उद्योगपतीच्या घरासमोर स्फोटके ठेवण्याची एका सर्वसामान्य पोलिस अधिकाऱ्याची हिंमत कशी होते, हा प्रश्न. हा प्रकारही भारतातल्या भोंगळ कारभारात खपून गेला असता; पण याच गुन्ह्यासंदर्भात मनसुख हिरेन यांचा खून झाला अन्् कारभाराचे वाभाडे निघू लागले. खंडणीखोरीच्या गुन्ह्यात वापरलेले वाहन पोलिस आयुक्तालयात उभे असते हे केवढे दुर्दैव. गुन्हे उलगडण्यासाठी वापरण्यात यावे ते वाहन गुन्हे करण्याच्या कामी पोलिस दलातील कर्मचारीच वापरत होते. गुन्हेशोध विभागाचे प्रमुखच या प्रकरणाचे म्होरके. खाकी वर्दीचा हा गैरवापर आता निवृत्त पोलिस अधिकारी ज्युलियो रिबेरो यांच्याही संतापाचा विषय झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भान का गमावले?
चकमकी करू शकणारे अधिकारी दलात आवश्यक असतीलही; पण त्यांच्यावर वचक असणारे अधिकारी आवश्यक असतात, हे रिबेरोंनी लक्षात आणून दिले आहे. कोणतेही किटाळ नसलेल्या अधिकारी- कर्मचाऱ्यांना महत्त्वाच्या पदी नेमण्याची साधी अपेक्षाही पूर्ण करण्याचे भान गमावले का गेले? २६ /‍१‍१ च्या घटनेत  हॅंडलर्स सीमेपलिकडून दहशतवाद्यांना सूचना देत होते अन्् देश बंदुकांच्या बारांनी विद्ध झाला होता. त्यानंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक राज्यकर्त्याने पोलिस दलाबद्दल, गृहखात्याबाबत कायम सावधान असायला हवे. सध्या घडतेय भलतेच. खंडणीखोरीसाठी वर्दीचा वापर केला जातो आहे. २६/११ ला तुकाराम ओंबाळेंच्या प्रसंगावधानाने कसाब हाती लागला. एका पोलिस हवालदाराचे प्रसंगावधान गृहखात्याच्या प्रतिमेला सावरणारे ठरले. इथे उलटे घडतेय. पोलिस उपनिरीक्षकामुळे प्रतिमा डागाळली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या सगळ्या घडमोडींच्या पार्श्वभूमीवर अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सरकारला सबुरीचा सल्ला द्यावा लागला आणि त्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेच्या तपासाला मदत केली जाईल, अशी भूमिका राज्य सरकारतर्फे घेतली गेली. केंद्र आणि राज्याचे संबंध किती ताणायचे याचेही काही भान बाळगावे लागतेच ना! 

वाझे यांच्याशी संबंध जोडला जातो आहे तो शिवसेनेचा. त्यामुळे या सरकारमधील अन््य दोन पक्ष आपण भरडले जात आहोत, अशी भावना बाळगून आहेत. एका हवालदाराने स्व.राजीव गांधी यांच्या घरासमोर पाळत ठेवली हे कारण देत कॉंग्रेसने चंद्रशेखर सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. आता पोलिस उपनिरीक्षकाने सरकार खिळखिळे होतेय काय अशी भीती राजकीय वर्तुळात व्यक्त होते आहे. सत्तेत रहाण्याचे लाभ तिघांनाही हवेसे वाटत असतील तर सरकारला काही होणारही नाही; पण प्रतिमा वादग्रस्त झाली हा डाग लागतोच.मुंबई पोलिस आयुक्तांची भूमिका माफ करण्यासारखी नव्हती, असे विधान तब्बल १५ दिवस उलटल्यानंतर गृहमंत्र्यांनी केले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य महाविकास आघाडीच्या नेत्यांना कळले नव्हते की दुर्लक्ष करीत वेळ मारून नेण्याकडे कल होता? चकमकफेम खंडणीखोरांना  राजकीय मंडळींचा आशीर्वाद होता काय? प्रश्न थरकाप उडवणारा आहे. विरोधी पक्षाला राजकीय धुरळा उडवायचा आहे, हे उघड दिसतेय. सुरक्षेचा प्रश्न त्याही पलीकडचा आहे.  

घाशीराम सत्ता धोक्यात आणत असतात. अस्तनीतले निखारे धोकादायक असतात; जीवघेणेही !!

Edited By - Prashant Patil

loading image