विश्लेषण : मर्दानी खेळाला द्या राजाश्रय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Masculine game

छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या ‘युद्धकले’ला ‘मर्दानी खेळ’ म्हणूनही ओळखले जाते. ‘शिवकालीन युद्धकला’ हे याला अलीकडे प्राप्त झालेले नाव.

विश्लेषण : मर्दानी खेळाला द्या राजाश्रय

छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या ‘युद्धकले’ला ‘मर्दानी खेळ’ म्हणूनही ओळखले जाते. ‘शिवकालीन युद्धकला’ हे याला अलीकडे प्राप्त झालेले नाव. या मर्दानी खेळावर आधारित दिग्दर्शक सचिन सूर्यवंशी यांनी ‘वारसा’ हा उत्तम माहितीपट बनवला असून, तो चर्चेत आहे आणि त्याला पुरस्कारही मिळाला. या माहितीपटातून मर्दानी खेळाचा वारसा त्यांनी मांडलाच; परंतु त्याचबरोबर यातून या खेळातील काही समस्याही समोर आल्या. शिवरायांचे नाव घेऊन सर्वच राज्यकर्ते राज्य करतात, परंतु ही कला जपण्यासाठी ठोस पावले उचलत नाहीत, ही खेदाची बाब आहे.

भारतात युद्धकलेची मोठी परंपरा आहे. ही परंपरा टिकवण्यासाठी देशातील अनेक राज्यांत विविध प्रयत्न सुरू आहेत. काही शासकीय पातळीवर, तर बहुतांश प्रयत्न हे व्यक्तिगत पातळीवर. अनेक वस्ताद, मंडळे या क्षेत्रात काम करत आहेत. याचाच एक भाग म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात भारतातील युद्धकलांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणारे केंद्रही सुरू झाले. त्याचबरोबर वस्ताद शामराव जाधव, आनंदराव ठोंबरे, निवृत्ती पोवार, बाबासाहेब तिबिले अशांनी हा वारसा सुरू ठेवला आणि आता त्यांची पुढची पिढीही तो वारसा पुढे घेऊन चालली आहे. अगदी मुलीही मोठ्या प्रमाणात येत आहेत, शिकत आहेत. ‘वारसा’ माहितीपटाच्या निमित्ताने एक बाब पुढे आली आहे, ‘ युद्धकले’चा वारसा राज्यातील प्रत्येक घराघरांत न्यायचा असल्यास या खेळाचा शालेय क्रीडा प्रकारात समावेश झाला पाहिजे.

छत्रपती शाहू महाराजांनी ही कला टिकवण्यासाठी पुढाकार घेतला होता. १९१७मध्ये यासाठी एक आदेश काढून या खेळाचा साहसी खेळ म्हणून अभ्यासक्रमात समावेश केला गेला. १९१८मध्ये आदेश काढून हा खेळ शिकवणाऱ्या शिक्षकांना पगारवाढ व बढती देण्यात आली. राजाश्रय मिळाल्याने ही ‘युद्धकला’ मर्दानी खेळ म्हणून मुलांमध्ये रुजली. त्यानंतर काही वर्षांनी त्यात खंड पडला आणि काळाबरोबर चालण्याच्या गोंडस नावाखाली आपला वारसा बाजूला सारून आपण पुढे आलो.

१९ सप्टेंबर २०२२मध्ये राज्यातील क्रीडा संचालनालयाने १४ ते १९ वयोगटातील मुलांसाठी क्रीडा स्पर्धेसाठी एक आदेश काढला. त्यामध्ये आपण परराज्यातील, परदेशातील अनेक खेळांचा समावेश केला. तमिळनाडूतील सिलंबम, व इतर भागातील थांग ता मार्शल आर्ट, सिकई मार्शल आर्ट, कुडो अशा विविध खेळांचा समावेश केला. सिलंबम हा खेळ तमिळनाडूतून १९९८-९९ ला आपल्याकडे आला, त्याचा समावेश यामध्ये केला; परंतु आपल्याकडील या मर्दानी खेळाला यामध्ये स्थान दिले नाही. परराज्यातील खेळप्रकारही आले; मग शिवकालीन खेळाचा हा प्रकार समाविष्ट करण्यात काय अडचणी होत्या?

शिवकालीन युद्धकला ही माणसाला माणूस म्हणून परिपूर्ण बनविणारी कला आहे. यात केवळ शस्त्र फिरवायची नसतात, तर ते करताना मानसशास्त्र, तर्कशास्त्र, आहारशास्त्र अशा विविध शास्त्रांचा समावेश होऊन ते परिपूर्ण बनते. पूर्वी लाठी-काठी-शास्त्र म्हणून हे शिकवले जात होते आणि आत्ताही तेच शास्त्र म्हणूनच शिकवले जाते. ही कला विकायची नसून द्यायची आहे, असे यातील अनेक वस्ताद सांगतात. कोल्हापुरातच ७०पेक्षा अधिक शिवकालीन प्रशिक्षण केंद्रे आहेत. यालाच मर्दानी खेळाचा आखाडा असेही म्हणतात. नऊ हजारांवर विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतले आहे, परंतु याला राज्य सरकारचा कोणताही राजाश्रय मिळत नाही. पुढे करिअरच्या संधी यात तयार होताना दिसत नाहीत. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हा वारसा टिकवण्याचा प्रयत्न सुरूच आहे आणि सुरूच राहील, प्रश्न आहे तो धोरणकर्त्यांच्या मानसिकतेचा.

पंतप्रधान नरेंद्र मोदीही देशातील देशी खेळांना प्रोत्साहन देत आहेत. राज्यातील सरकारही त्यांच्याच ध्येय धोरणानुसार चालणारे आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊनच कारभार करत असल्याच्या आणाभाका राज्यातील जनतेला देत आहे. त्यामुळे राज्यातील सरकारने या शिवकालीन या खेळाला राजाश्रय दिलाच पाहिजे. येत्या शिवजयंतीला त्यासंबंधी घोषणा केली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली गेली तर ती वावगी ठरणार नाही.

टॅग्स :Editorial Article