विश्‍लेषण : छोट्या गोष्टीचा मोठा परिणाम...

घरात पती-पत्नीमध्ये वाद सुरू होता. वादाने टोक गाठले आणि पतीने पत्नीच्या कानशिलात लगावली. अशी कानशिलात लगावणे म्हणजे कौटुंबिक हिंसाचाराचाच भाग आहे, हे माहीत आहे का आपल्याला?
Domestic violance
Domestic violanceesakal
Summary

घरात पती-पत्नीमध्ये वाद सुरू होता. वादाने टोक गाठले आणि पतीने पत्नीच्या कानशिलात लगावली. अशी कानशिलात लगावणे म्हणजे कौटुंबिक हिंसाचाराचाच भाग आहे, हे माहीत आहे का आपल्याला?

घरात पती-पत्नीमध्ये वाद सुरू होता. वादाने टोक गाठले आणि पतीने पत्नीच्या कानशिलात लगावली. अशी कानशिलात लगावणे म्हणजे कौटुंबिक हिंसाचाराचाच भाग आहे, हे माहीत आहे का आपल्याला? एक मुलगा रस्त्यावरून जात होता. कोपऱ्यावर मुलांचे टोळके थांबले होते. त्यांनी रस्त्यावरून जाणाऱ्या मुलाची चेष्टामस्करी केली. त्या मुलाला अत्यंत घाणेरड्या नावाने चिडविले. मुलगा रडत घरी गेला; परंतु अशा पद्धतीने चुकीच्या नावाने चिडविणे हीसुद्धा मानवी हक्काची पायमल्ली करण्याचा कौटुंबिक हिंसाचाराचाच प्रकार आहे, हे लक्षात येते का?

ही दोन उदाहारणे प्रातिनिधिक आहेत, जी दररोज आपल्या आजूबाजूला अनेकदा घडताना पाहतो. यामध्ये अनेकदा हक्क आणि मानवी हक्क यांच्यात गल्लत होण्याची शक्यता अधिक असते. माणसाच्या जीवनात काही अधिकार जन्मतः मिळतात. ते अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. प्रश्न आहे तो या अधिकारांविषयी आपण किती जागरूक आहोत? जागरूक असूनही त्याचा उपयोग स्वतःसाठी, कुटुंबासाठी आणि समाजासाठी करतो काय याचा! मानवाधिकारांतर्गत जीवनातील दैनंदिन सर्वच गोष्टींचा समावेश होतो. ही संकल्पना प्राचीन असली तरी १९४८ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली. भारतात १९९३ मध्ये हा कायदा लागू झाला.

मानवी हक्कांचा विचार करीत असताना कोरोनानंतर कौटुंबिक हिंसाचाराच्‍या घटनांत वाढ झाल्याचे दिसते. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या दोन वर्षांच्या आकडेवारीवरून हे निदर्शनाला येते. ओळखीच्या किंवा जवळच्याच व्यक्तीकडून अधिक अत्याचार होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट दिसते. मानसिक आणि शारीरिक त्रास देणे म्हणजे कौटुंबिक हिंसाचार, असे कायदा सांगतो. यात बोलून अपमानित करणे, पती-पत्नीमध्ये जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवणे, नावावरून चिडविणे, मुलांसमोर अपमान करणे, पती-पत्नीमधील अनेक वाद, लहान मुलांचा सातत्याने अपमान होईल असे कृत्य करणे अशा विविध गोष्टींचा यात समावेश होतो.

आगामी वर्ष प्रतिष्ठा, स्वातंत्र्य आणि सर्वांसाठी न्याय या गोष्टींवर केंद्रित आहे. प्रतिष्ठा म्हणत असताना प्रत्येक माणसाची प्रतिष्ठा जपणे असे अभिप्रेत आहे. स्वातंत्र्य म्हणजे अगदी मोबाईलवर बोलण्याच्या स्वातंत्र्यापासून अनेक गोष्टींचा समावेश करता येईल. न्याय हा सर्वांसाठी एकसारखा हवा. या तिन्‍ही गोष्टींचा विचार केल्यास प्रत्येक व्यक्ती या तीन गोष्टींचा व्यक्तिगत, कुटुंब, संस्था, समाजाच्या पातळीवर किती योग्य समतोल साधते, यावर हे सारे अवलंबून आहे. सल्ले देणे खूप सोपे असते; पण कृती करणे खूप अवघड आहे. कारण आपण रोज कुठे ना कुठे तरी मानवी हक्कांचे उल्लंघन करीत असतो, त्याचा स्वतः विचार करून आपल्या कृतीत बदल करणे आवश्यक आहे. आपल्यापासून कोण घाबरून राहत असेल तर निश्चितच आपणाकडून काहीतरी बिघडले आहे, हे लक्षात घ्या.

हे कराच...

अत्याचार होत असेल किंवा झाला असेल, सहन करीत असाल तर निश्चित तुम्ही चुकीचे करीत आहात. अन्यायाविरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे. यासाठी झालेल्या अत्याचाराविरुद्ध तुम्ही बोलायला लागा. तुमच्या जवळच्या व्यक्तीजवळ किंवा विश्वासातील व्यक्‍ती‍जवळ जरूर बोला. मदत करणाऱ्या संस्थांशी बोला, पोलिसांशी संपर्क साधा. सल्लागार केंद्राचा सल्ला घ्या, हेल्पलाईनला कळवा... यापैकी कोणताही मार्ग निवडा आणि मोकळे व्हा! अनेकदा सामाजिक दबावही आपली समस्या सोडविण्यास खूप मदतकारक ठरू शकतो. पोलिसांकडे गेला किंवा कोणाची मदत मागितली तर पुरावे काय, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. अशा वेळी मोबाईलच्या माध्यमातून मारहाण झालेले छायाचित्र काढून ठेवा, बोलताना रेकॉर्डिंग करा, जेणेकरून तुमच्यावरील अन्यायाविषयी पुरावा मिळेल. घटनांची माहिती लिहून ठेवली तरी चालू शकते. समाज काय म्हणेल याचा विचार न करता आपल्या हक्कांचे काय होईल, याचा विचार करून वाटचाल करा. तरच प्रतिष्ठा, स्वातंत्र्य आणि सर्वांसाठी न्याय या त्रिसूत्रीनुसार तुम्हाला हक्क मिळण्यास मदत होईल. आत्मविश्वास ढळू न देणे, हा या त्रिसूत्रीचा मुख्य पाया आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com