सर्वांत भयावह दशकाचा आढावा

अविश्वास ठरावाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या इतिहासातील दोन महत्त्वाच्या, वादग्रस्त आणि दुःखद घटनांचा उल्लेख केला
no-confidence motion PM Narendra Modi controversial and tragic events in history of India national security Mizoram airstrikes Operation Blue Star
no-confidence motion PM Narendra Modi controversial and tragic events in history of India national security Mizoram airstrikes Operation Blue Starsakal

- शेखर गुप्ता

स्वातंत्र्योत्तर भारतासाठी सर्वांत धोकादायक दशक कोणते होते? सर्वांत धोकादायक दशक म्हणून नेहमीच १९६० आणि १९८० मध्ये तुलना होते. पहिले दशक मिझोराम हवाई हल्ल्यांसाठी आणि दुसरे ऑपरेशन ब्लू स्टारसाठी ओळखले जाते.

अविश्वास ठरावाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या इतिहासातील दोन महत्त्वाच्या, वादग्रस्त आणि दुःखद घटनांचा उल्लेख केला. एक म्हणजे मार्च १९६६ मध्ये बंडखोरांवर कारवाई करण्यासाठी तेव्हाचे जिल्हा मुख्यालय आणि आताची मिझोरामची राजधानी ऐजॉलवर हवाई दलाच्या विमानातून केला गेलेला हल्ला आणि दुसरे म्हणजे ‘ऑपरेशन ब्लू स्टार’.

या कारवाईमुळे सुवर्ण मंदिरातील शीख धर्मीयांसाठी आध्यात्मिक महत्त्व असणाऱ्या अकाल तख्तला धक्का पोहोचला होता. आपली बाजू भक्कम करण्यासाठी पंतप्रधानांना इतिहासातील घटनांचे दाखले देण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे.

पण यामुळे, आपल्याला राष्ट्रीय सुरक्षेसंबंधी एक जुना प्रश्न विचारण्याची संधी उपलब्ध होते. तो प्रश्न म्हणजे, भारताच्या इतिहासातील सर्वांत धोकादायक दशक कोणते?

मी स्वतः १९६० च्या दशकाला सर्वांत त्रासदायक दशक समजतो. अर्थात १९८० च्या दशकातील संकटांना कुणीही कमी लेखू नये. या संकटांचा परिणाम नंतरच्या पिढ्यांना सोसावा लागला. पंजाबमध्ये कट्टरपंथीयांची बंडखोरी,

काश्मीरमधील दहशतवाद, दोन्ही राज्यांमधील हिंदूंच्या हत्या, ऑपरेशन ब्लू स्टार, लष्कराच्या शीख तुकडीतील धुसफूस, दिल्ली आणि इतर भागांतील शिखांचे हत्याकांड, भोपाळ वायुगळती, पाकिस्तानशी झालेले युद्ध,

‘सुमडोरोंग चू’च्या मुद्द्यावरून चीनशी झालेला संघर्ष, श्रीलंकेतील आयपीकेएफ ऑपरेशन आणि अस्थिर अंतर्गत राजकारण- विशेषतः बोफोर्सनंतर- या सर्व घटना या दशकात घडल्या. तथापि, १९६० च्या दशकात भारताची स्थिती अतिशय कमकुवत होती. त्या दशकाच्या मध्यातच मिझो बंडखोरीचा उदय झाला.

लालबहादूर शास्त्री यांचे ताश्कंद येथे जानेवारी १९६६ मध्ये निधन झाले. अननुभवी आणि पूर्वतयारी नसलेल्या इंदिरा गांधींनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच भारताला आर्थिकदृष्ट्या नुकसानकारक ठरेल असे युद्ध पाकिस्तानशी झाले होते आणि मिझो नॅशनल फ्रंटने सार्वभौमत्वाची घोषणा केली होती. शास्त्रींच्या निधनाला तीन महिनेच झाले असतील,

तेव्हा बंडखोरांनी ऐझॉलमधील आसाम रायफल्स बटालियनच्या मुख्यालयावर हल्ले केले. त्यानंतर काय झाले, हवाई दलाचा वापर कसा झाला हे आपण आधीच्या सदरात पाहिले आहे. त्यामुळे आपण परत त्याबद्दल बोलणार नाही. आपण या सर्व कालखंडाचा आढावा घेणार आहोत. कारण यात राष्ट्रीय सुरक्षेबाबतचे अनेक धडे आहेत. तसेच, तर आपल्या नेत्यांनी ती परिस्थिती कशी हाताळली तेही आहे.

नागांना चीनचा आश्रय

जवाहरलाल नेहरू सरकारला ब्रिटिशांकडून जो देश, सीमा आणि जे शेजारी मिळाले होते ते अस्थिर आणि धोकादायक होते. पाकिस्तान १९४७ पासून शत्रू होताच, पण चीनसुद्धा त्या दशकात सामरिक क्षितीजावर डोकवायला लागला होता.

१९५० च्या मध्यात नागा बंडखोरीने उचल खाल्ली होती. चर्चेने प्रश्न सुटेल या आशेवर राहून नेहरूंनी लष्कर पाठवायला बराच उशीर केला. त्यामुळे १९४७ ते ५२ या काळात संकटाला तोंड फुटले. १९५७ पर्यंत हा लढा सुरू होता.

खरे तर त्याच वेळी आदिवासी लोकांना दूरस्थ गावांमधून लष्करी तळाजवळील ‘सुरक्षित’ खेड्यांमध्ये स्थलांतरित करण्याचे काम सुरू झाले होते. ‘सुरक्षित आणि प्रगतिशील खेडे उभारण्याच्या नावाखाली हा अत्याचार होता. मानवी हक्कांचे उल्लंघन झाले, भयंकर अतिरेक झाला. चीनबरोबरचे संबंध बिघडल्याने दलाई लामा भारतात आले.

नागा बंडखोरांना चीनने आश्रय दिला आणि भारतीय सैन्य (सीआरपीएफ) व चिनी ‘पीएलए’ यांच्यात २१ ऑक्टोबर १९५९ मध्ये पहिली चकमक झाली. त्यातून येणाऱ्या दशकाचा अजेंडा निश्‍चित झाला. १९६० मध्ये नागा बंडखोर आणि भारतीय लष्करामध्ये गनिमी युद्ध सुरू होते.

पूर गावात गनिमी काव्याने लढणाऱ्या बंडखोरांनी वेढल्या गेलेल्या आसाम रायफल्सच्या तुकडीला हवाई दलाच्या डाकोटा विमानाद्वारे शस्त्रपुरवठा करणे हे या घडामोडींचे सर्वोच्च शिखर होते. अशाच एका धो-धो कोसळत्या पावसात वैमानिकाला भात शेतीतच विमान उतरवावे लागले. परिणामी बंडखोरांनी त्यातील सर्वांना कैद केले.

विमानातील पाच सैनिकांना लवकरच सोडण्यात आले; तर चार अधिकाऱ्यांना २१ महिने बंदिवासात ठेवण्यात आले. नागांची एवढी ताकद होती, की फ्लाईट लेफ्टनंट ए. एस. सिंघा यांच्या सहकाऱ्यांची मुलाखत घेण्यासाठी आलेल्या ब्रिटिश पत्रकार गेविन यंग यांचेही ते अपहरण करू शकत होते. यातील थोडीशी रंजक माहिती म्हणजे सिंघा हे बॉलिवूड अभिनेते देव आनंद यांचे मेहुणे होते.

लष्कर या अंतर्गत युद्धात गुंतलेले असताना आणि चीनचा धोका वाढलेला असताना नेहरूंनी पुढील वर्षीच्या डिसेंबरमध्ये गोवा मुक्ती संग्रामासाठी मोहीम सुरू केली. हे साल होते १९६१. चीनबरोबरचे युद्ध आणि पराभव १९६२ मध्ये झाला.

पराभव झाल्यामुळे भारत कमकुवत झाल्याचे पाहून पाकिस्तान काश्मीरमध्ये कुरापती करत होता. १९६३ मध्ये कथित हजरतबल घटनेने (पवित्र अवशेषांची चोरी) खोरे धुमसत होते. १९६४ मध्ये उत्तराधिकारी निवडण्याआधीच नेहरूंचे निधन झाले.

तडजोडीचे उमेदवार म्हणून शास्त्रींनी पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारला. त्यांना केवळ १९ महिन्यांचाच कार्यकाळ मिळाला, पण या वेळेत त्यांना तीन अविश्वास ठरावांना सामोरे जावे लागले. एप्रिल १९६५ मध्ये कच्छमध्ये संघर्ष उद्‍भवला. पुढे होणाऱ्या एका मोठ्या घटनेचा हा केवळ एक ट्रेलर होता. पुढील वर्षीच २२ दिवसांचे युद्ध काश्मीरमध्ये सुरू झाले आणि पंजाबमध्ये संपले.

फुटीरतेचे वारे

शास्त्री यांचे निधन १९६६ च्या सुरुवातीला झाले. त्या वेळी नागा बंडखोरी शिगेला पोहोचली होती. मिझो बंडखोरीला सुरुवात झाली होती आणि श्रीमती गांधी त्या मानाने कमकुवत दिसत होत्या. त्या वेळी राष्ट्रीय स्तरावर इतरही अनेक समस्या होत्या.

पंजाबी सुबा चळवळीला नेहमीच एक कट्टरपंथी झालर होती. १९६६ मध्ये तडजोड होऊन पंजाबचे भाषिक आधारावर विभाजन झाले, परंतु त्यासाठी मास्टर तारा सिंग आणि संत फतेह सिंग यांना (नंतरच्या काळात दर्शन सिंग फेरूमन) अनेक आंदोलने आणि उपोषणे करावी लागली. त्या काळात द्रविड राजकारणातही फुटीरतावादी प्रेरणा होत्या.

एम. करुणानिधी यांनी मला एनडीटीव्हीसाठी दिलेल्या मुलाखतीत याची कबुली दिली होती. १९६७ नंतर त्यात बदल झाला. याच दशकात अनेक दुष्काळ, पिकांचे नुकसान, आर्थिक मंदी आणि अमेरिकेकडून पीएल- ४८० द्वारे अन्नाच्या मदतीच्या नावावर झालेला अपमान या सर्व गोष्टी होत होत्या.

१९६७ मध्ये नथुला येथे चीनशी एक मोठी चकमक झाली. विशेष म्हणजे यात भारतीय लष्कराला चांगले यश आले. त्या वर्षीच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसला जबरदस्त फटका बसला. श्रीमती गांधी आणखीन कमकुवत झाल्या आणि राजकीय अस्थिरता निर्माण झाली. पुढच्याच वर्षी काँग्रेसमध्ये संकट उभे राहिले.

श्रीमती गांधींनी १९६९ मध्ये पक्षाचे विभाजन केले. त्यांनी अति डावे वळण स्वीकारले आणि एक प्रकारे त्या भयानक दशकाचा योग्य शेवट केला. अर्थात, पाकिस्तानमधील अंतर्गत राजकीय पेचप्रसंग आणि पूर्व पाकिस्तानातील गदारोळामुळे भारत पुढच्याच वर्षी युद्धाला सामोरा गेला.

त्या सर्व काळाचे चित्रण अमेरिकी राजकीय शास्त्रज्ञ सेलिग हॅरिसन यांनी त्यांच्या प्रसिद्ध (की कुप्रसिद्ध?) ‘इंडिया : द मोस्ट डेंजरस डिकेड’ या पुस्तकात केले आहे. १९६० मध्ये भारताची भविष्यवाणी वर्तविताना त्यांनी, हा देश वाढता दबाव,

बाह्य किंवा परिघावरील फुटीरतेला तोंड देण्यास सक्षम नसलेला आणि फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचे निरीक्षण मांडले. मागील सहा दशकांत आपण भारतीयांनी त्यांना केवळ चुकीचेच ठरवले नाही, तर या दशकांमध्ये आपण अधिक मजबूत झालो. मग ते १९६० चे दशक असो की १९८० चे दशक किंवा अगदी मार्च १९६६ मध्ये मिझोराममध्ये झालेल्या दुर्दैवी उठावासारख्या घडलेल्या इतर घटना असोत.

(अनुवाद : कौस्तुभ पटाईत)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com