ढिंग टांग : मी पुन्हा येईन!

Dhing Tang
Dhing Tang

"मी पुन्हा येईन, गावांना जलयुक्‍त करण्यासाठी, शहरांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी, माझ्या महाराष्ट्राला दुष्काळमुक्‍त करण्यासाठी, नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी...मी पुन्हा येईन, माझ्या युवामित्रांना अधिक सक्षम बनविण्यासाठी, माझ्या बळिराजाचे हात बळकट करण्यासाठी... मी पुन्हा येईन, ह्याच निर्धारात, ह्याच भूमिकेत, ह्याच ठिकाणी, प्रत्येक व्यक्‍तीची साथ घेत, त्याचा हात हातात घेत, माझ्या महाराष्ट्राला एक नवीन रूप देण्यासाठी, नवमहाराष्ट्र निर्मितीसाठी...मी पुन्हा येईन!!'' 

...वरील कविता वाचून आम्ही महाप्रचंड थरारलो. अंगावर रोमांच उभे राहिले. डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले...हे ओजस्वी शब्द कोणाचे बरे? सांगा पाहू? अर्थात आमचे परममित्र आणि अखिल महाराष्ट्राचे (आजवरचे) सर्वात लाडके मा. मु. नानासाहेब ऊर्फ कवी नमोरज ह्यांचे. 

कविला नवमहाराष्ट्राच्या निर्मितीच्या कळा लागल्या आहेत, हे तर कवितेत स्पष्ट दिसते आहे. ह्या कवितेत एक निखळ आशावाद आहे. आत्मविश्‍वास आहे आणि एक प्रकारचे ध्येयवादी भारलेपण आहे. जे नि:संशय अगदीच संसर्गजन्य असे आहे. 

'मी पुन्हा- येईन!' तीनच शब्द, पण त्यात केवढी जादू आहे? कवी नमोरजांची ही कविता वाचून आम्हाला ज्योत्स्ना भोळे ह्यांचे 'मी पुन्हा वनांतरी फिरेन हरिणीवाणी, ओठांत घोळवीन रामप्रीतीची गाणी' (नाटक : भूमिकन्या सीता) हे गीत आठवले! तसेच 'एकाच या जन्मू जणू फिरुनी नवी जन्मेन मी' हे चित्रपटगीतही बॅक टु बॅक आठवले. तथापि, कवी नमोरजांची ही कविता सर्वांवर कडी आहे, असे आमचे मत झाले आहे. ह्याला म्हंटात प्रतिभा! ह्याला म्हंटात काव्य! ह्याला म्हंटात आपले ते हे!! 

मागल्या खेपेला आम्ही येका सहकारी ब्यांकेचे कर्ज थकविले होते, तेव्हा वसुली एजंटाने आमच्या दारात येऊन अगदी अस्सेच उद्‌गार काढले होते, तेही आठवले!! पण ती दुखरी आठवण आम्ही मागे टाकून नव्या काव्याचा आस्वाद घेत आहो. असो. 
'मी पुन्हा येईन' ह्या एका पंक्‍तीत 'मी पुन्हा येईन आणि आणखी एक कविता करीन' हा ध्वन्यार्थ रसिकांना सहजच ऐकू येईल. पुन्हा पुन्हा कविता करणाऱ्या माणसापासून काही माणसे दूर पळतात. कोणे एके काळी आम्हीही जाम कविता करीत असू. एकेका दिवसाला बत्तीस बत्तीस कविता मारायचा आमचा सपाटा होता. पण आमचे वेगळे आणि कविवर्य नमोरज ह्यांची केस वेगळी. 

कविवर्य नमोरजांची वेगळी ओळख आम्ही काय सांगावी? नमो ह्या मंत्रभारल्या आदितत्त्वाचा रज:कण तो नमोरज! तो रज:कण असला तरी त्यात दिव्यतेज साकळले आहे, हे कोणीही सांगेल!! ह्याच तेज:पुंज अणूमध्ये स्फोटाची क्षमता असते, हे तर वैज्ञानिक सत्य नव्हे काय? 

सदरील कवितेतील 'मी पुन्हा येईन, माझ्या युवा मित्रांना सक्षम करण्यासाठी' ही पंक्‍ती अर्थपूर्ण तर आहेच, पण त्यात भविष्यातील बाळपावलांची चाहूल लागते आहे. युवा मित्रांना सक्षम करण्यासाठी पुन्हा येण्याचे प्रॉमिस करणाऱ्या कवीला लौकरच 'मातोश्री'वर बोलावून जेवू-खाऊ घातले जाईल ह्यात शंका ती काय? युवा मित्रांना सक्षम करणारा प्रत्येक जण हा महाराष्ट्राच्या गळ्यातील आपोआप ताईत होऊन जातो- मग तो कवी असला तरी बेहतर! असो!! 

मी पुन्हा येईन!...कुणाला ही धमकी वाटेल. कुणाला इशारा. कुणाला आश्‍वासन. पण आम्हाला मात्र ती अच्छे दिनांची नांदी वाटते. पुन्हा एकदा निवडणुका. पुन्हा एकदा पांच वर्षे. पुन्हा एकदा अच्छे दिन...पुन्हा एक कविता. कवीमाणसाला आणखी काय हवे? इति.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com